शेतकरी भाताची शेती का करतात?

हा प्रश्न कदाचित शेतकरी मुळात शेतीच का करतात असा असू शकला असता पण तो मुद्दा इतका गुंतागुंतीचा आहे की मी फक्त साध्याश्या भातपीकाविषयी हा लेख मर्यादीत ठेवला आहे. भात हे भारतातले महत्वाचे पीक आहे आणि भारताच्या सर्व राज्यामध्ये घेतले जाते. माझे बरेचसे निरीक्षण आणि अभ्यास जेवढा आहे त्यावर आधारीत असे म्हणता येईल की भाताचे पीक अतिशय कष्टदायी आहे आणि कुटंब सदस्यांची मजूरीची किंमत लक्षात घेतली तर ते तोट्यात असते. हि परिस्थिती गेली २५ वर्षे बहुतांशी तशीच आहे. भारतातल्या शेतीवर अवलंबून असलेल्या आणि त्यातही धान्य पिकांच्या शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण कमी होत चालले असताना शेतकरी भातासारख्या पिकाची लागवड अजूनही करत असतात आणि बऱ्याचवेळ दुसरा पर्याय नाही म्हणून करत असतात. असे का? एक ग्रामीण परिस्थितीचा घेतलेला हा एक छोटासा शोध.

भाताची खरेदी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर केली जाते व त्यासाठी किमान आधारभुत किंमत दिली जाते. हि किमत पर्याप्त नसली तरी पंजाब, हरियाणासारख्या राज्यात मोठी जमीनधारणा असलेले शेतकरी यांत्रिक पध्दतीने भात शेती करतात. तसेच त्यांना तिथल्या शासनाकडून मोठ्या अनुदानावर वीज, खते आणि यंत्रसामुग्री मिळते. ह्या सर्व घटकांमुळे त्यांचा खर्च कमी असतो आणि भातपीक नफ्यात असते.

काही छोट्या शेतकऱ्यांसाठी जिथे शासकीय अनुदाने मोठ्याप्रमाणावर नाहीत तेथेही हि किमान आधारभुत किंमत फायदेशीर ठरते. हे शेतकरी त्यांचे भात १८ रु प्रति किलो दराने शासनाला विकतात आणि दारिद्र्यरेषेखाली असल्यामुळे रेशनवरचे तांदुळ २ र. प्रति किलो दराने विकत घेतात. हे जीवन फार काही चांगले नसते पण छत्तीसगड राज्यामध्ये बहुतांश अल्पभुधारक शेतकरी अश्याप्रकारे आपल्या निव्वळ पावसाळी भातपीकाच्या आणि इतर महिन्यात जंगलांच्या आधारावर दिवस काढतात.

बऱ्याच क्षेत्रावर पाणी मोठ्या प्रमाणावर साचून राहते आणि भातपीकाशिवाय अन्य कुठलेही पीक त्या परिस्थितीत घेता येत नाही. अतिपावसाच्या प्रदेशामध्ये किंवा डोंगरदऱ्यांमध्ये अशी परिस्थिती आढळते. मी एका मध्य प्रदेशातील कत्थिवाडा नावाच्या तालुक्याला भेट दिली होती. ह्याच्या सर्व बाजुंनी कमी पावसाचा मका पिकवणारा प्रदेश आहे पण ह्या आगळ्यावेगळ्या डोंगरी भागात २००० मिमी पाऊस पडतो आणि भाताचे पीक येथे मोठ्या प्रमाणावर घेण्यात येते. अशी परिस्थिती कधीकधी मानवी हस्तक्षेपामुळेही येते. काही धरणांच्या लाभक्षेत्रात भाताचे पीक घेण्यात येते त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याला भाताचे पिक लावायचे जरी नसेल तरी त्याच्या शेताच्या सर्व बाजूंनी इतके पाणी साचते की त्याला भाताचे पीक लावण्याशिवाय पर्याय नसतो. कर्जत, माणगाव, शहापुर ह्या तालुक्यांमध्ये अशी परिस्थिती पहायला मिळते.

आणि काही आमच्या रत्नागिरी शहराजवळील गावांसारखे भाग असतात जिथे जमीनीच्या किंमती खुप जास्त असतात आणि भातशेती करण्यापेक्षा अन्य वेगळ्या संधी उपलब्ध असतात. परंतु तरीही अनेक अल्पभुधारक शेतकरी भातशेती करत असतात. जमीन महसूल कार्यालयातील भ्रष्ट व्यवस्थेमुळे आणि वारसा हक्क सिध्द करण्याच्या गुंतागुंतीच्या प्रक्रीयेमुळे जमीनीवर हक्क शाबूत ठेवण्यासाठी तेथे शेती करत राहणे हा आपले हक्क कायम राखण्याचा मार्ग असतो. जर तसे केले नाही तर गावातले जमीन हिरावून घेणारे प्रभावशाली गावगुंड तयारच असतात.

अर्थात ह्या देशात असे शेतकरी आहेतच ज्यांना आपली स्वतःची अन्नसुरक्षा महत्वाची असते किंवा सरकारी मदतीवर अवलंबून राहणे योग्य वाटत नाही किंवा स्वतःसाठी विषमुक्त अन्न हवे असते किंवा ज्यांनी भातशेती शुद्ध नफ्यात आणली आहे.
---------------------------------

Comments

Popular posts from this blog

A Psycho-financial Experiment

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी