परसबाग न करण्याची सहा कारणे
सर्वप्रथम परसबाग म्हणजे काय हे समजून घेउया. परसबाग म्हणजे तुमच्या घराजवळची किंवा तुमच्या शेतातील छोटी जागा जेथे स्वतःच्या गरजेपुरती प्रामुख्याने फळे व भाजीपाल्याची शेती केली जाते. काही ठिकाणी जेथे मुख्य निवास हा शेतजमीनीतच असतो तेथे व्यावसायिक पिके आणि परसबाग एकाच क्षेत्रात असतात. मला स्वतःला परसबाग ह्या विषयात काम करण्याची संधी दोन वेळा मिळाली आहे. एक म्हणजे आमच्या स्वतःच्या परसबागेत काम करताना आणि दुसरी म्हणजे काही सामाजिक प्रकल्पांमध्ये परसबाग हा विषय हाताळताना.
जर तुमच्याकडे आवश्यक अशी इच्छा असेल आणि शारिरीक क्षमता असेल तर तुम्ही स्वतःची परसबाग तयार करू शकता. तीन अत्यावश्यक घटक मात्र असे आहेत की ज्यांचा जर अभाव असेल तर परसबाग तयार करण्यामध्ये बाधा येऊ शकते. पहिला घटक म्हणजे जागा. फक्त शहरातच नव्हे तर भारतातील ग्रामीण भागांमध्ये सघन वस्ती असल्यामुळे परसबागेला आवश्यक अशी जागा नसते. दुसरा घटक म्हणजे पाणी. देशाच्या बऱ्याच भागात पेयजलाचेही दुर्भिक्ष असते तेथे झाडांसाठी पाणी मिळणे कठीण होऊन बसते. वेळ हा तिसरा घटक आहे. बऱ्याच जणांना अन्य कामांमुळे किंवा सतत घरापासून दूर रहावे लागत असल्यामुळे परसबागेकडे लक्ष देणे शक्य होत नाही. जिथे इच्छा आहे तेथे मार्ग असतो आणि थोडयाश्या कल्पक पध्दतीने विचार करून ह्या सर्व मर्यादांवर मात करता येणे शक्य आहे.
खाली अजुन काही बिनमहत्वाची कारणे देत आहे.
- बाजारात बऱ्याच गोष्टी सहज व स्वस्त मिळत असताना स्वतः त्याची लागवड करण्यात काही अर्थ नसतो. मला आठवतं एकदा माझ्या एका परसबाग प्रकल्पातुन मिळणारे अत्यल्प आर्थिक उत्पन्न पाहुन मला न्युनगंड निर्माण झाला होता. त्याचवेळेस इतरांचे व्यावसायिक शेतीआधारीत प्रकल्प शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लाखापर्यंत भर घालत होते. परंतु जेथे फळे भाजीपाल्यांचा पुरवठा सहज होत नाही किंवा आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत असते तेथे स्वतःची परसबाग असणे जास्त फायदेशीर ठरते. त्याचबरोबर विषमुक्त फळे भाजीपाला मिळणे ही एक सध्या चैनीची गोष्ट झाली आहे. परसबागेत काम केल्यामुळे स्वतःला शारिरीक दृष्ट्या फीट ठेवता येते आणि आरोग्य चांगले ठेवता येते. ह्या सर्व फायद्यांचे मोजमाप पैश्यांमध्ये करता येत नाही.
- बऱ्याच वेळा तुम्ही काय उगवू शकता आणि काय खाऊ शकता ह्यामध्ये फरक असतो कारण बरीच वर्षे बाजारांवर अवलंबून राहिल्यामुळे ज्या गोष्टी स्थानिक परिसरात पिकवू शकता ते खाण्याची सवय तुटलेली असते. आमच्या रत्नागिरीचाच विचार केला तर येथे कणगर हे कंदपीक उत्तम येते परंतु लोकांना बाहेरुन येणारे बटाटे खाण्याची सवय झालेली आहे. त्यामुळे जर एखाद्या परसबागेत समजा २० किलो कणगरे तयार झाली तरी त्यांचा बटाट्यांऐवजी वापर करता येत नसतो त्यामुळे ती पडून राहतात आणि परसबाग पिकवणाऱ्या व्यक्तीचा विरस होऊ शकतो.
- परसबागेसाठी योग्य अश्या बियाणी, हत्यारे आणि अन्य साहित्याची बऱ्याच ठिकाणी वानवा असते. मला हल्लीच एका नाशिक जिल्ह्यातील एका गावातल्या छोट्या किरकोळ मार्केटला दिलेली भेट आठवते. इथले बरेचसे विक्रेते आणि ग्राहक हे दोघेही भाजीपाला पिकवणारे शेतकरी होते. हे कसं काय ह्याचा शोध घेतला तेंव्हा समजलं की प्रत्येक शेतकरी एकाच पिकाची व्यावसायिक तत्वावर लागवड करतो त्यामुळे ज्याच्याकडे कोबी असतो त्याच्याकडे बऱ्याच वेळा वांगी नसतात. असं का बरं होत असावं ह्याचा अजुन शोध घेतला तेंव्हा समजलं की सर्व स्थानिक कृषि केंद्रांकडे परसबागेसाठी आवश्यक असलेली बियाण्यांची छोटी पाकिटे नव्हती. आणि शेतकरी बरेचसे संकरीत बियाणे लावत असल्यामुळे ते पुढच्या हंगामासाठी स्वतःकडचे बियाणे वापरू शकत नव्हते.
------------------------
Comments