आभासी माध्यमे
ऑर्कूट बुयुक्कोकटेन हा २००४ साली गूगलमध्ये काम करत होता
आणि त्याला दिलेल्या स्वतःच्या प्रोजेक्टवर काम करण्याच्या २०% वेळेमध्ये त्याने
एक समाजमाध्यम तयार केले ज्याचे नाव त्याच्या बॉसने ऑर्कूट असेच ठेवले. हे माध्यम वाढावे
म्हणून त्यांनी जोडल्या गेलेल्या सदस्यांना त्यांच्या संपर्कांना जोडण्यासाठी खास निमंत्रणाद्वारे
जोडता येत होते. साधारण २००७-८ च्या दरम्यानची माझ्यासारखे अनेक लोक नव्याने मिळत
असलेल्या इंटरनेटच्या सुविधेमुळे त्यांचे संपर्क जुने तुटलेले मित्रमैत्रीणी,
प्रियजन परत जोडण्याबद्दल खुप उत्साहात होते.
मी ऑर्कूटमध्ये सहभागी झाल्यानंतर साधारण एकाच वर्षानी एका
अमेरीकेत स्थायिक झालेल्या मैत्रीणीने तिच्या संपर्कातल्या सगळ्यांना मेसेज पाठवला
की ती आता फेसबूक जॉइन करते आहे आणि तिथेच आता कनेक्ट होऊया. मी काही फेसबूकवर
जाण्यात फारसा उत्साही नव्हतो. एक तर त्यावेळेला असलेले फोन अजुनही स्मार्ट नव्हते
आणि इंटरनेट फक्त ऑफीस आणि सायबर कॅफेमध्ये उपलब्ध हो्ते. २०१० मध्ये आफ्रीकेत काम
करत असताना बरोबरचे अनेक सहकारी ब्रिटन, अमेरीका, हॉलंड अश्या प्रगत देशामधले होते
आणि ते सर्व फेसबूक भरपूर वापरत होते. त्यांच्या बरोबर राहिल्यामुळे मीसुध्दा
फेसबूक जॉइन केले तोपर्यंत भारतामधले बरेचसे माझ्या संपर्कातले लोक तिथे आले होते
आणि परदेशी राहुन दुरच्या सर्व मित्र, नातेवाईकांबरोबर संपर्क ठेवण्याचे एक उत्तम
माध्यम म्हणून फेसबूकचा वापर होत होता.
२०११ मध्ये परत आलो तेंव्हा बऱ्याच गोष्टी झपाट्याने बदलत
चालल्या होत्या. फेसबूक आता जास्त स्मार्ट होत होते. लोक त्यांच्या स्टोरी, अपडेट वगैरे
अतीव उत्साहाने शेअर करत होते. त्यावर मिळणारे लाईक, कॉमेंट हे त्या अपडेटच्या
यशाचे मोजमाप बनले होते. बाकीची माध्यमे ब्लॉग, युट्युब, ऑनलाईन वर्तमानपत्र सर्वच
समाजमाध्यमांचा पॅटर्न वापरत होते. मीही ह्या सगळ्या विश्वात गढून जाऊन माझे त्या
त्या क्षणी फोटो, लेख, विचार, मते फेसबूकवर शेअर करत होतो. कोणी लाईक केलं की बरं
वाटत होतं आणि कोणी वाईट कॉमेंट केल्या किंवा टॅग करूनही कोणी दुर्लक्ष केले की
दुःख होत होतं. सगळ्या छोट्याश्या गोष्टी मेंदूत साठवल्या जात होत्या आणि जरी नको
असल्या तरी आठवणींच्या स्वरूपात परत वरही येत होत्या.
त्याची एक वेगळी बाजू म्हणजे लोकांना समजून चुकत होते की हे
माध्यम त्यांची मते आणि खऱ्या आयुष्यातील निवडले जाणारे पर्याय ह्या सर्वांवर
प्रभाव टाकत होते. राजकारणी तसेच विविध व्यवसाय माध्यमाचा वापर त्यांच्या फायद्यासाठी
करू लागले होते. मी स्वतः एक फेसबूक पेज बनवून माझी उत्पादनांची प्रसिध्दी
करण्यासाठी आणि विक्री करण्यासाठी वापर करत होतो. स्वतःच्या गोष्टी शेअर करण्यात, आलेल्या कॉमेंटना उत्तरे देण्यात आणि
इतरांच्या गोष्टी वाचण्यात बराच वेळ जात होता. एकदा मात्र साक्षात्कार झाला की
ह्या आभासी जगापेक्षा माझा आजुबाजुला असलेल्या प्रत्यक्ष जगाशी असलेला संपर्क कमी
होता. त्यावर कडी म्हणजे फेसबुक त्यांचे अतिस्मार्ट अल्गॉरिदम वापरून मी काय पाहू
शकत होतो आणि इतर माझ्याबद्दल काय पाहू शकत होते ह्याबाबीवरही नियंत्रण मिळवत
होते. निव्वळ संपर्कात राहण्याचे माध्यम न राहता, ते एका सुक्ष्म मानसिक पातळीवर
जाऊन त्याच्या वापरकर्त्यांचे नियंत्रण करत होते.
फक्त फेसबूकच नव्हे तर सर्वच डिजिटल
समाजमाध्यमांनी लोक कश्यापध्दतीने विचार करतात त्यात मुलभुत बदल घडवून आणले आहेत
आणि त्यांच्याबद्दल पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ह्या सर्व वेबसाईट,
अॅप आणि सर्च इंजिने आपल्याला फुकट आभासी स्पेस देत आहेत. आपण त्याची किंमत आपण
प्रत्यक्ष जगात काय खरेदी करतो, कोणाला मत देतो आणि असे अनेकविध प्रकारचे जे
निर्णय घेतो त्याच्या स्वरूपात चुकवत आहोत.
आपण ह्या ऑनलाईन माध्यमांमध्ये
सर्वप्रथम आलोच कसे हे आठवलं तर लक्षात येईल की आपल्या स्वतःच्या प्रत्यक्ष जगातील
संपर्कांच्या प्रभावामुळे आपण येथे खेचले गेलो होतो. त्या प्रत्यक्ष जगाचा संपर्क
जर आपण हरवला तर समस्या उद्भवणारच आहेत. आता ह्या आभासी जगापासून पुर्णतः दुर
जाण्याची वाट बंद झाली आहे पण त्यापासून थोडेसे बाजूला होण्यामुळे काही बंधनांपासून
काही क्षणांपुरतं तरी थोडंसं मोकळं वाटेल.
---------------------------------------------
Comments