इंग्रजी कि मराठी

अमरची मातृभाषा कानडी आहे. त्याला त्याशिवाय इंग्रजी, मराठी, हिंदी आणि त्याच्या पुर्वजांची चित्पावनी भाषाही येते. ह्या भाषा तो फक्त बोलूच नव्हे तर वाचू आणि काही प्रमाणात लिहूही शकतो. भारतातले विविध राज्यांमधले लोक भाषिक मुद्द्यांवरून भांडत असताना, अमर म्हणजे अशी एक व्यक्ती आहे जी आपल्याला भाषा ह्या संवादाचे पूल कसे असतात ते दाखवू शकते. त्याच्याकडून तो विविध भाषा कश्या आणि कधी वापरतो ते जाणून घेणे बरेच शिकवून गेले. कुठल्या व्यक्ती असतात, संभाषणाचे संदर्भ कसे असतात त्यावर भाषेची निवड ठरते असे तो सांगतो.

सध्या चालू असलेल्या २१ दिवसांच्या चॅलेंजचा भाग म्हणून एकच लेख दोन भाषांमध्ये लिहितोय. हा बराचसा अनुवाद आहे परंतु तो करताना वाचकांचा सांस्कृतिक संदर्भ लक्षात ठेवून तो करतोय. इंग्रजीच्या वाचकांचे सांस्कृतिक संदर्भ बरेच विस्तीर्ण असतात. पुर्वीही मी दोन्ही भाषांमध्ये परंतु वेगवेगळे लिखाण करत होतो. त्याच्या वाचकांच्या मराठी आणि इंग्रजीच्या दोन स्वतंत्र याद्या होत्या ज्यांना त्याप्रमाणे लिखाण शेअर करत होतो. ह्या दोन याद्यांमध्ये काही वाचक समान आहेत ज्यांना सध्याचे दोन्ही भाषांमधील लेख जात आहेत.

मी दोन्ही भाषांमधले लेख ज्यांना मिळतात आणि नियमीत वाचतात अश्या १० वाचकांचे एक छोटे सर्वेक्षण केले. काही जणांचे भाषा निवडण्याचे कारण वैयक्तिक स्वरूपाचे होते. ह्या सर्व लोकांशी आतापर्यंत एक मित्र किंवा नातेवाईक म्हणून मराठीतच संवाद झाल्यामुळे माझे लेखन अन्य भाषेत वाचणे त्यांना दुराव्याचे वाटले. काही लोकांना इंग्रजी तांत्रिक क्लिष्ट विषय समजून घेण्यासाठी योग्य वाटते पण वैचारिक व ललित स्वरूपाचे लिखाण मराठीत वाचणे आवडते. एकाने सांगितले की मराठीत खुप वेगाने वाचता येते आणि मोबाईलवर ते सोयिस्कर होते. दहा पैकी नऊ जणांनी मराठीचा पर्याय निवडला होता आणि त्यासाठी आपली लहानपणापासून जी भाषा आत्मसात केली आणि शालेय अभ्यासक्रमात वापरली त्याच्याशी जोडून घेणे सोपे होते असे सांगितले. आपले मेंदू, मज्जारज्जूंची जोडणी भाषिक बाबतीत कशी काम करते त्याबद्दल हा अनुभव सांगून जातो.

सध्या दोन्ही भाषेत लिहिताना, मी एक प्रयोग केला. काही लेख प्रथम इंग्रजीमध्ये लिहिले आणि नंतर त्याचे मराठीकरण केले आणि काही लेख त्याच्या उलट पध्दतीने लिहिले. दोन्ही बाबतीत काही परिणाम सारखेच आले. A4 आकाराच्या एका कागदावर इंग्रजीचे ६०० शब्द बसत होते. तेच लिखाण कुठलाही अर्थामध्ये बदल न होता फक्त ५०० शब्दात मराठीत मांडता आले. इंग्रजी भाषेमध्ये शब्दसंख्या प्रचंड असल्यामुळे नेमके शब्द निवडणे त्या भाषेत सोपे होत होते आणि लेख हे खुप प्रचूर वाटतात परंतु मराठीत एकूणच शब्दसंख्या कमी असल्यामुळे ते लिखाण तितकंस प्रचूर वाटत नाही. परंतु मराठी भाषा विषय पोचवण्याचे काम अतिशय थेटपणे करते असेही लक्षात आले. ह्याच्यावर भाषाशास्त्रज्ञ कदाचित अधिक प्रकाश टाकू शकतील.

भाषा ह्या खरंतर लोकांना जोडणारे सेतू आहेत. भाषेची उपयुक्तता हा ही एक पैलू आहे. आपण महाराष्ट्रातील मुळचे मराठी भाषिक नेहमी तक्रार करत असतो की बाकीच्या भागातून येणारे अन्य भाषिक मराठी आत्मसात करत नाहीत. परंतु साधारण लोकव्यवहारासाठी खुद्द महाराष्ट्रातच मराठी भाषेचा वापर कमी करतात. ग्रामीण तसेच शहरी मुळ मराठी भाषिकांनी खुप मोठ्या संख्येने आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घातले आहे कारण त्यांना आपल्या पाल्याची “प्रगती” झालेली बघायची आहे. फार कमी लोकांनी मराठी भाषेतल्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न केला. हे करताना त्यांनी स्वभाषेच्या भाषिक सेतू आणि उपयुक्तता ह्या दोन्ही अंगांना धक्का पोचवला आहे.
---------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी

ध्वनीक्षेपकांचा उन्माद