ऑगस्टमध्ये पालेभाजीऐवजी कोबी विकत घेताना

तीस वर्षांपुर्वीचे आणि आताचे  विलेपार्ल्याचे रस्त्यावरचे भाजी मार्केट आहे तिथेच आहे पण त्यात बदल घडलाय. पुर्वीपेक्षा मार्केटमध्य़े भाजी, फळफळावळ ह्याची आकर्षकता आणि विविधता वाढली आहे. तिथे तुम्हाला जवळ जवळ सर्व प्रकार मिळतात ज्याच्यामध्ये वसई मधल्या स्थानिक भाज्यांपासून न्युझीलंडमधुन आयात किवीफ्रुटचा समावेश आहे. तिथे कुठल्या गोष्टी जास्त प्रमाणात मिळतात ह्यामध्ये मात्र बदलत्या काळानुसार बरेच बदल घडलेले आहेत. उदा. ऑगस्ट महिन्यात पुर्वी लाल माठ, हिरवा माठ, चवळी, अळू अश्या अनेक पालेभाज्या जास्त प्रमाणात येत असत पण आता कोबी जास्त प्रमाणात दिसतो. अर्थात ग्राहकांमध्येही हळूहळू बदल घडत गेला आहे. नऊवारी साड्यांच्या ऐवजी पाचवारी आणि त्याऐवजी पंजाबी ड्रेस असे बदल होत आताच्या नवीन जमान्यातील सगळ्य़ा ग्राहक महिला जीन्समध्ये असतात. त्या आता लाल माठाऐवजी कोबी घेणं पसंत करतात. आणि त्यामुळे परिणामतः बाजारात ऑगस्टमध्ये कोबी भरपुर असतो ह्यात समजून घेण्यासारखं काही विशेष नाही असं कुणालाही वाटेल.

पण ह्या आधुनिक मातांना आपल्या मुलांविषयी काळजी वाटते कारण त्यांनी शेतकरी कोबीवर जहाल किटकनाशक वापरतात ह्याबद्दल वाचलेलं असतं. ऑगस्ट महिन्यात तो कोबी विलेपार्ल्याच्या मार्केटमध्ये आलाच कसा ह्याबद्दल माहिती मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नसतो. आणि असंही आधीच पालेभाजीला हात न लावणाऱ्या हट्टी मुलांची समजुत काढणं इतकं कर्मकठीण काम असतं कि त्याच्यासाठी कामावरून आल्यावर वेळ काढणं शक्य नसतं. दुसरं म्हणजे स्वतःला न आवडणारी लाल पालेभाजी त्यांच्या लहानपणी आईनेही बळजबरीनेच खायला घातलेली असते.

आता कोबी ही भारतात हिवाळ्यात कमी तापमानात होणारी भाजी आहे. त्यामुळे कोबी जर भारताच्या मैदानी भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांना ऑगस्टमध्ये तयार करायचा झाला तर त्यावर येणाऱ्या अधिक किडींसाठी जास्त किटकनाशके वापरावी लागतात, पावसाळ्यात नैसर्गिकरित्या जास्त प्रमाणात वाढणाऱ्या तणांचा नायनाट करण्यासाठी तणनाशके वापरावी लागतात आणि पावसाळयात येऊ शकेल अश्या विशिष्ट जातीचे बियाणे अधिक किंमत देऊन खरेदी करावे लागते. ह्या सगळयामुळे खर्च वाढतो आणि कोबीची किंमतही वाढते. पण तरीही आधुनिक मातांना तेंव्हा कोबी हवा असतो. जर त्यांनी हा कोबी तयार होऊन मार्केटमध्ये कसा पोचला ह्याबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्यांनी भाजीचा वेगळा पर्याय निवडला असता. हे असे पर्याय निवडणे ऑगस्ट महिन्यातल्या कोबीपर्यंत मर्यादीत रहात नाही. ग्राहकांना फ़ेब्रुवारी महिन्यात आंबे हवे असतात आणि लांब दक्षिण अमेरीकेतून येणाऱ्या चिया सिड्सही हवे असतात कारण परदेशी वेबसाईटवर त्यांचे गुणगान केलेले असते. आणि असं बरंच काही हवं असतं.

फार पुर्वी शेतकरी त्यांच्या स्वतःच्या गरजा पुर्ण होतील अश्या पिकांची लागवड करत असत. ते दिवस कधीच इतिहासजमा झाले आहेत. आपल्या जगामध्ये शेतीवर अवलंबुन असलेल्या लोकांची संख्या गेल्या वीस वर्षांत ४३% वरून २८%वर आली आहे. मी हा संदर्भ अश्यासाठी देतो की आज भारतात आपण चीनमध्ये उगम असलेल्या करोना विषाणुशी सामना करत आहोत आणि त्याचवेळेला तुमच्या घरात केलेल्या झणझणीत आमटीमधले मसूर बहुदा कॅनडामधून आले असतील. कोकणातल्या दऱ्याखोऱ्यांपासून अमेरीकेतल्या ग्रेट प्लेन्स मधले सर्व शेतकरी जी पिके घेत आहेत ती बहुतांश जगातल्या विविध भागात पसरलेल्या ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आहेत. फक्त पिकांमधले रासायनिक अवशेषच नव्हे तर जमिनीची धुप, पाण्याचा अतिवापर, उर्जेची वाढलेली गरज आणि ज्याची आपल्याला सर्वात जास्त चिंता वाटते तो पृथ्वीवरच्या वनांचा विनाश अश्या बऱ्याच समस्या ग्राहकांच्या वाढत्या मागण्यांशी निगडीत आहेत.

ग्राहकांच्या मागण्या कश्याप्रकारे ठरवल्या जातात? ग्राहक योग्य पर्याय निवडत आहेत का? ह्या मागण्या पुरवताना शेतकरी शाश्वत पध्दतीने शेती करू शकतील का आणि त्याचवेळेला आपले आर्थिक उत्पन्न वाढवू शकतील का? अश्या मोठ्या प्रश्नांसाठी गहन विचार पाहिजे आणि  तेवढीच खुप मोठी कृतीही पाहिजे. 
--------------------------

Comments

Popular posts from this blog

A Psycho-financial Experiment

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी