बुंदेलखंडमधल्या भात खाचरांची न सांगितलेली गोष्ट
मी एका सामाजिक प्रकल्पांना मदत करणाऱ्या मोठ्या संस्थेत काम करत असे. माझ्याकडे बुंदेलखंड प्रदेशामधले काही शेती आधारीत गरीबी निर्मुलन प्रकल्प होते. बुंदेलखंड हा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश ह्या दोन राज्यांच्या सीमांवर पसरलेल्या १० जिल्ह्यांचा खुप मोठा प्रदेश आहे. तिथे एकही मोठे शहर नाही, भाग बराच दुष्काळी आहे, तिथे भुकबळीही होत असतात कधीकधी आणि कमालीची गरीबीही आहे. त्यात तिकडची सामाजिक विषमता आणि भ्रष्ट व्यवस्था मिळवली की परिस्थिती किती निराशादायी आहे ह्याचा अंदाज येतो. आमच्या प्रकल्पामधला एक कार्यक्रम होता शेतीचे बांध घालण्याचा. त्याद्वारे शेतामध्ये असणारे पाणी बाहेर जाण्यापासून रोखले जात होते व पाण्याची पिकाला उपलब्धता वाढत होती. पाण्याच्या जमीनीत मुरण्यामुळे भुजल पातळी सुधारणार होती. पण हे काम करताना एक वेगळीच समस्या उद्भवली. अतिपाऊस झाल्यावर शेतात बांधांमुळे पाणी साठत होते आणि शेतात त्यावेळी असणाऱ्या उडीद पिकाला ते नुकसानकारक होते. शेतकरी घातलेले बांध तोडत होते. आमचे प्रकल्प करत असलेल्या कामाला एक मुलभुत उद्देश होता, त्यासाठी लागलेले परिश्रम, तांत्रिक रचना आणि आर्थिक गुंतवणूक हे स...