बुंदेलखंडमधल्या भात खाचरांची न सांगितलेली गोष्ट

मी एका सामाजिक प्रकल्पांना मदत करणाऱ्या मोठ्या संस्थेत काम करत असे. माझ्याकडे बुंदेलखंड प्रदेशामधले काही शेती आधारीत गरीबी निर्मुलन प्रकल्प होते. बुंदेलखंड हा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश ह्या दोन राज्यांच्या सीमांवर पसरलेल्या १० जिल्ह्यांचा खुप मोठा प्रदेश आहे. तिथे एकही मोठे शहर नाही, भाग बराच दुष्काळी आहे, तिथे भुकबळीही होत असतात कधीकधी आणि कमालीची गरीबीही आहे. त्यात तिकडची सामाजिक विषमता आणि भ्रष्ट व्यवस्था मिळवली की परिस्थिती किती निराशादायी आहे ह्याचा अंदाज येतो.

आमच्या प्रकल्पामधला एक कार्यक्रम होता शेतीचे बांध घालण्याचा. त्याद्वारे शेतामध्ये असणारे पाणी बाहेर जाण्यापासून रोखले जात होते व पाण्याची पिकाला उपलब्धता वाढत होती. पाण्याच्या जमीनीत मुरण्यामुळे भुजल पातळी सुधारणार होती. पण हे काम करताना एक वेगळीच समस्या उद्भवली. अतिपाऊस झाल्यावर शेतात बांधांमुळे पाणी साठत होते आणि शेतात त्यावेळी असणाऱ्या उडीद पिकाला ते नुकसानकारक होते. शेतकरी घातलेले बांध तोडत होते. आमचे प्रकल्प करत असलेल्या कामाला एक मुलभुत उद्देश होता, त्यासाठी लागलेले परिश्रम, तांत्रिक रचना आणि आर्थिक गुंतवणूक हे सगळंच ह्यामुळे धोक्यात येत होतं.

मला एक अशी कल्पना सुचली की ज्यामुळे शेतकरी बांध तोडणार नव्हते आणि सोबत शेतकऱ्याची अन्नधान्याची गरजही भागवली जाणार होती. शेतकऱ्यांनी जर बांधाजवळच्या पाणी साचणाऱ्या भागात भात आणि उर्वरीत भागात उडीद लावला असता तर काम होणार होते. ते लोक गहू खाणारे होते म्हणून एका शेतकऱ्याला विचारलं की जर शेतातून भात तयार झाला तर खाणार का? त्याचे उत्तर सरळसोत होतं, “माझ्या शेतात कुटंबाला पुरेल एवढे धान्य तयार होत नाही मग गहू आणि तांदुळ दोन्ही मला सारखंच.” त्या गावात ४० वर्षापुर्वी भाताची शेती होत होती हे ही त्याने सांगितलं.

आता माझी मर्यादा ही होती की मी मुंबईत बसणार होतो. उंटावरून शेळ्या हाकण्याचा उद्योग मला परवडणार नव्हता. काही प्रोजेक्ट पार्टनरसोबत बोललो पण त्यांनी फारसा उत्साह दाखवला नाही. एकाने मात्र सांगितलं, “एक बार कर के देखते है.” त्यांनी बऱ्याच मेहनतीने काही शेतकऱ्यांना राजी केलं आणि त्यांच्या सतत सोबत राहून भातपिक यशस्वी केलं. शेतकरी आपण ज्याचा विचारही केला नव्हता ते पीक घेऊ शकलो ह्याच्याच आनंदात होते. पुढच्या वर्षी शेतकऱ्यांची संख्या अधिक वाढली. प्रक्षेत्रातील मिळालेल्या कथा केलेल्या विचाराच्या पलीकडच्या होत्या. भातपीकामुळे शेतातील मातीत ओलावा वाढला होता. त्याचा पुढच्या पीकाला फायदा झाला होता. पुरेसे अन्नधान्य उपलब्ध झाल्यामुळे खर्चिक असे गव्हाचे पीक घेण्य़ाची गरज नव्हती व त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी आता दिल्लीला सहज जाता येणार होते.

मला आता समोर आमच्या सामाजिक विकास क्षेत्रातले आवाजी करणारे दिग्गज दिसत होते. त्यांची ह्या हटके स्टोरीवर काय प्रतिक्रीया असेल ह्याचा विचार करणे गरजेचे होते. “पण तुम्ही अश्या दुष्काळी क्षेत्रात भातासारखं पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करू शकत नाही.”, “ तुमच्या कडे आवश्यक सांख्यिकी माहिती आहे का?”, “आणि जरी तुम्ही शेतकऱ्याची अन्न सुरक्षा प्राप्त केलेली असली तरी स्थलांतर हे प्रादेशिक समस्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्तर असू शकत नाही.” केलेले काम अजुन पुढे विकसित करण्यासाठी असल्या काही प्रश्नांना उत्तरे तयार ठेवणे गरजेचे होते.

पण हे सगळे काम निरर्थक असल्याचे लवकरच लक्षात आले कारण आमच्या संस्थेने काही धोरणात्मक बदल केले होते. आमचे प्रोजेक्ट त्याच्याशी सुसंगत नसल्यामुळे पुढे वाढवले जाणार नव्हते. त्यांच्या फायली एक एक करून बंद केल्या गेल्या. काही महिन्यांनी मीसुद्धा नोकरी सोडली.

बुंदेलखंडामध्ये अजुनही भात लावला जातो का? त्यामुळे शेतीपध्दतीमध्ये काही बदल घडून आले आहेत का? त्याचा तिथल्या शेतकरी कुटंबांवर, त्यांच्या गावांवर काही परीणाम झाला आहे का?

कदाचित असेल किंवा नसेलही!
--------------------------

Comments

Popular posts from this blog

A Psycho-financial Experiment

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी