ध्वनीक्षेपकांचा उन्माद

मला एक आजपासून साधारण १५ वर्षांपुर्वीचा प्रसंग आठवतो. मी मेळघाटाच्या अंतर्भागातील एका बाह्यजगाशी गाडी रस्त्याचा थेट संपर्क नसलेल्या गावात गेलो होतो. जवळच्या जंगलात तिथल्या एका सहकाऱ्यासोबत फिरत असताना एक तरूण गुराखी गुरांसह फिरताना दिसला. आपला पावा वाजवण्यात दंग होता. पाव्याचे मंद सूर, गुरांच्या गळ्यातील वाजणाऱ्या घंटा आणि पार्श्वभुमीला होती जंगलाची स्वतःची निःशब्द शांतता. स्तब्ध होऊन तो प्रसंग जेवढा मनात साठवून घेता येईल तितका कमीच होता. साधारण ८ वर्षांनी मी मेळघाटात पुन्हा गेलो तेंव्हा काही गुराखी दिसले पण हातात पावा नव्हता. त्याची जागा मोबाईलने घेतली होती, मोबाईल टॉवर नसले तरीही. कुठली तरी ढींच्यॅक गाणी मोठ्या आवाजात ऐकत बसले होते. जंगलाची शांतता कुठेच जाणवली नाही. बाह्य जगाशी जसा तले बदल स्वीकारताना त्यांनी हे ही स्विकारले होते.

पाच वर्षापुर्वी मी जेंव्हा गावात येऊन स्थायिक झालो तेंव्हा एक नवीन ट्रेंड अनुभवायला मिळाला. आमच्या गावात हल्ली बारश्याच्या समारंभासाठी दिवसभर लाउडस्पीकरवर रेकॉर्डेड गाणी लावली जातात. बाळाचे कान जणू काही पाळण्यामध्येच ध्वनी प्रदुषणासाठी सज्ज केले जातात ह्या दिवशी. साधारण एखाद्या वाडीत तीस घरं असतील तर लग्नं, बारशी, सत्यनारायण पुजा, गृहप्रवेश असे सगळे कार्यक्रम मिळून वर्षात किमान २० वेळा जर लाऊडस्पीकर लावत असतील तर महिन्याला सरासरी १ ते २ वेळा तरी लोकांना आवाजाच्या धोकादायक पातळीला सामोरे जावे लागत असेल.

शहरांमध्ये वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये ध्वनीक्षेपकांचा वापर कठोर नियमांमुळे होत नसला तरी गोविंदा, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळीतले आवाजी फटाके, शिवजयंती आणि सार्वजनिक सत्यनारायण हे एकामागून एक येत असतात आणि गल्लोगल्लीत पसरलेली बहुतांश मंडळे हे सर्व ध्वनीक्षेपकांशिवाय हे साजरी करू शकत नाहीत. मशिदींवरचे अजान दिवसातून तीन ते पाच वेळा वर्षाचे ३६५ दिवस होत असतात. साधारण एक किलोमीटरच्या अंतरात तीन मशिदी असतील तर हेच आवाज एका परिसरात तीन वेळा होतात. त्यामध्ये शहरांमधल्या दिवसभर चालणाऱ्या वाहतुकीचे,  सतत वाजणाऱ्या हॉर्नचे आवाज मिळवले तर आपण एका जीवघेण्या ध्वनीप्रदुषणात राहत आहोत हे आपल्याला समजेल.  पण त्याच्या नियंत्रणासाठी आपली व्यवस्था थिटी पडते हे उघड सत्य आहे.

प्रमाणाबाहेरील मोठ्या आवाजाचे दुष्परिणाम बरेच आहेत. त्यामुळे बहिरेपणा वाढतो. अतिरक्तदाब, निद्रानाश ह्या सारख्या व्याधी उत्पन्न होत असतात त्यामुळे तुमची कार्यक्षमता कमी होत असते. गरोदर महिलांच्याच नव्हे तर गर्भाच्या प्रकृतीवरही त्याचे परीणाम होत असतात. हे बऱ्याच जणांना माहित असते पण त्याचा प्रभाव मेंदूवर, मज्जासंस्थेवर होत असतात व त्याचा तुमच्या बुध्दिमत्तेवर, विचारक्षमतेवर विपरीत परीणाम होत असतो असे आधुनिक संशोधनाने सिध्द झालेले आहे. तरीही मोठ्या आवाजाच्या आहारी लोक का जातात ह्याचे कारण जाणून घेण्यासारखे आहे.

उच्च आवाज मेंदूचा ताबा घेते आणि बाह्य जगातील गोष्टींची असलेली तुमची जाणीव कमी करते. मोठे आवाज मनाला उत्तेजित करत असतात त्यामुळे तुमच्या हालचाली जलद होतात. अधिक मोठ्या आवाजाची इच्छा उत्पन्न होते. त्यामुळे अधिक उत्तेजना प्राप्त होत असते. त्याचा परीणाम अल्कोहोल व अन्य मादक द्रव्यसेवनाची इच्छा तयार होऊ शकते. अश्याप्रकारे उन्मादी अवस्थेत असे उच्च डेसिबलचे आवाज हवेहवेसे वाटणाऱ्या व्यक्ती जात असतात. एकदा असे अनुभव घेतले की मोठ्या आवाजांचीही एक नशा उत्पन्न होते आणि हे वर्तन एक व्यसनासारखे परत परत केले जाते. ह्या सगळ्याला सामाजिक, सांस्कृतिक गरज, प्रतिष्ठा,  असे नको ते अवडंबर देऊन त्याला एक सामान्य वर्तन बनवले जात असते.

आपल्याला एक समाज म्हणून असा उन्माद हवा की निरामय आयुष्य? अचुक पर्याय निवडणे माणसाच्याच हातात आहे.

Comments

Popular posts from this blog

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी