मातीतले सेंद्रीय कर्ब

आपल्याला विविध माध्यमांद्वारे हवामान बदलाबद्दल बऱ्याच वेळा जागृत केले जात असते. हवामान बदलाचे वाईट परीणाम आपल्याला विविध प्रकारे सहन करायला लागत आहेत. काही तज्ज्ञ लोक सध्या होत असलेल्या करोना विषाणूच्या वाढत्या साथीचा संबंधही हवामान बदलाशी जोडत आहेत. सगळ्यात जाणवणारा आणि आपल्या दैनिक जीवनाशी निगडीत असलेला हवामान बदलाचा एक घटक म्हणजे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण. हवेतल्या वाढत्या धुरामुळे व अन्य प्रदुषणजन्य घटकांमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहेच. अजुन एका हवामान बदल घडवणाऱ्या घटकाकडे मात्र आपले फारसे लक्ष गेलेले नाही तो म्हणजे मातीतील सेंद्रीय कर्ब.

एका शास्त्रज्ञांच्या गटाने केलेल्या अंदाजानुसार आपल्या जगातल्या मातीमध्ये २७०० गिगाटन एवढा कार्बन साठवलेला असतो जो की हवेतल्या कर्बाच्या ३ पट आहे. हवेमधल्या कार्बनचे एक चक्र सतत चालू असते. वनस्पती प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेद्वारे हवेतला कार्बन डायऑक्साईड वापरून त्यांचे अन्न बनवत असतात. जेंव्हा मातीतल्या सेंद्रीय पदार्थांचे विघटन होते तेंव्हा हा कार्बन डायऑक्साईड परत हवेत जात असतो. असा हा मातीतला कार्बन जो सेंद्रीय स्वरूपात उपलब्ध असतो त्याला सेंद्रीय कार्बन म्हणतात. आपल्या पर्यावरणातील हे कार्बनचे चक्र विस्कळीत होत आहे त्यामुळे हवामान बदलाच्या प्रक्रीयेला ते सहाय्यकारक होत आहे. मातीतले सेंद्रीय कर्बाचे प्रमाण कमी होण्यासाठी शेतजमीनींचा अशाश्वत पध्दतीने होणारा वापर, जंगलांचा आणि पाणथळ क्षेत्रांचा होणारा ऱ्हास हे प्रामुख्याने कारणीभुत आहेत.

२०१५ साली केंद्र शासनाने मृदा आरोग्य कार्डाची योजना राबवली ज्यामध्ये वैयक्तिक शेतकऱ्याच्या जमीनींमधील मातीचे परीक्षण करून उपलब्ध पोषक घटकांचे मापन करण्यात आले. त्याद्वारे शेतकऱ्याला फायदा होणे आणि धोरणात्मक पातळीवर निर्णय घेणे अपेक्षित आहे. २०१६ चा भारताचा मृदा आरोग्य नकाशा हे दाखवतो की बऱ्याचश्या भागांमध्ये सेंद्रीय कर्बाचे प्रमाण कमी म्हणजे साधारण ०.३% च्या जवळ आहे जे कि अधिक म्हणजे ४% पर्यंत असले पाहिजे. सेंद्रीय कर्बाचे प्रमाण योग्य प्रमाणात असल्यास वनस्पतींची वाढ चांगली होते, त्यांचे आरोग्य चांगले राहते, त्यामुळे खते, किटकनाशके अश्या रसायनांचा वापरही खुप कमी होतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पिकांची सिंचनाची गरज अतिशय कमी होते.

जगात सर्वत्र वने, गवताळ प्रदेश आणि पाणथळ प्रदेश नवीन शेतजमीन करण्यासाठी आणि नागरी विकासासाठी नष्ट होत आहेत. अॅजमेझॉनच्या जंगलांच्या वणव्यांमुळे नष्ट होण्याची गोष्ट आता सर्वांनाच माहिती आहे. बंगलोरसारख्या वेगाने विकसित झालेल्या शहरामध्ये १९६० च्या दरम्यान असलेले ९२० तलाव, १९९३ मध्ये फक्त ५८० उरले होते. आजमितीचा आकडा त्याहुनही कमी असेल. आपल्या शहरांमधला आणि सध्याच्या ग्रामीण भागातला कचरा हि सुध्दा एक मोठी समस्या बनत चालली आहे आणि त्याच्या डंपिंगच्या जागाही प्रदुषण करत आहेत व ती प्रक्रीयाही जमिनीतील सेंद्रीय कर्ब कमी करत आहे. 

काही व्यक्ती आणि संस्थांनी ह्या समस्येवर आपापल्या पध्दतीने उपाय केले आहेत. वेंगुर्ला नगरपंचायतीने लोकसहभागातून सेंद्रीय तसेच असेंद्रीय कचऱ्याच्या वर्गीकरणाचा आणि पुनर्वापराचा प्रकल्प अतिशय चांगल्या प्रकारे चालवला आहे. उत्तर प्रदेशामधील अनेक शेतकरी सध्या शुन्य मशागत तंत्राने गव्हाची, कडधान्यांची शेती करत आहेत. त्यामुळे त्यांच्या जमीनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण तर वाढले आहेच परंतु खर्चामध्येही बचत झाली आहे. आसाममधील जादव पायेंग ह्या माणसाने एकट्याने १३६० एकरांवर तयार केलेल्या वनामुळे त्याचे नाव जगात प्रसिध्द झाले आहे. पण हे सर्व काही महासागरातल्या बेटांसारखे आहेत. जेंव्हा असे पर्यावरणाचा समतोल पुनर्स्थापित करणारे बदल सर्वसाधारण जननियम बनतील तो सुदिन असेल.
--------------------------

Comments

Popular posts from this blog

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी

ध्वनीक्षेपकांचा उन्माद