कोकणातले हापूस आंबे

ह्या वर्षी हापूस आंब्यांचे रत्नागिरीमधले उत्पादन आतापर्यंतचे सर्वात कमी आहे. आमच्याकडे आतापर्यंत असलेल्या सरासरीच्या फक्त १०% उत्पादन आहे. आंब्यावर आधारीत अर्थव्यवस्था सर्वात वाईट अवस्थेत आहे. असलेल्या थोड्याफार उत्पादनाची सध्या लॉकडाऊनमुळे विक्री करणेही कठीण होऊन बसले आहे. फक्त शेतकरीच नव्हे तर मजूर, कृषि सेवाकेंद्र चालक आणि वाहतुक व्यावसायिक अश्या सर्वांवरच अनिश्चिततेचे सावट आहे. जे काय थोडेसे पैसे हातात मिळतील ते पुढच्या वर्षीचा खर्च भागवण्यासाठी पुरेसे नसतील.

गेले ६० पेक्षा जास्त वर्ष कोकणातला हापूस आंबा ग्राहकांच्या गळ्यातला ताईत झाल्यासारखा आहे कारण त्याचा असलेला एकमेवाद्वितीय असा स्वाद, चव आणि सुवास. भारतातल्या कुठल्याही आंब्यापेक्षा हा आंबा विशेष वेगळा आहे. त्याच्या स्थानाशी हे वेगळेपण जोडले गेले आहे. लाल जांभ्या दगडाच्या जमिनी, सम हवामान, भरपूर मान्सूनचा पाऊस आणि सर्वात महत्वाचे म्हणजे समुद्रावरची दमट खारी हवा ह्या सर्वांचा कोकणातला म्हणून जो काही आहे हापूस तो बनवण्यात खास वाटा असतो. हे फक्त एक साधे आंब्याचे फळ नाही तर खवैय्यांसाठी असलेला तो आनंददायी अनुभव आहे. पण तरीही शेतकरी सध्या समस्येशी झगडत आहेत.

मला माझे मुंबईतले लहानपण आठवते. माझे आजोबा आमच्या मोठ्या एकत्र कुटूंबाचा एक व्यवसाय म्हणून गावाहून आंबे आणून जवळपासच्या ग्राहकांना विकत असत. लोक आमचे आंब्याचे पार्सल येईपर्यंत वाट पाहत असत. आम्हाला आजोबांना मदत म्हणून इमारतींच्या मजल्यावर आंब्याच्या पेट्या चढवणे, उतरवणे आणि ग्राहकांकडे पोच करणे ही कामे करावी लागत असत. ग्राहकांना थेट विक्री करण्याचा जो काही फायदा असतो तो आमच्या कुटूंबाला घेता येत होता. त्यावेळेला बरेचसे शेतकरी व्यापाऱ्यांना आंबा विकत असत पण ह्याचे फायदे जसे लोकांच्या लक्षात येत गेले तसे बऱ्याच लोकांनी थेट आंबा विक्री करण्यास सुरूवात केली. हापूस आंब्याला तसाही एक विशिष्ट खास ग्राहकवर्ग होता.

गेल्या ३० वर्षात अनेक शेतकऱ्यांनी नव्याने हापूसच्या बागा विकसित केल्या. शहरांमध्ये स्थायिक झालेल्या गाववासीयांना आपलीही स्वतःची अशी हापूसची बाग असावी असे वाटू लागले. बरेच मुळच्या कोकणातील नसलेल्या लोकांनाही आपली आंब्याची बाग हवीशी वाटू लागली. प्रामाणिक आणि भ्रष्ट असे दोन्ही मार्गाने मिळवलेले बरेचसे बिगरशेती उत्पन्न लोक शेतीमध्ये गुंतवू लागले. परंतू त्यात कोणी व्यावसायिक विचार फारसा केला नव्हता. पैसे जंगली झाडोरा साफ करण्यात, कुंपणे घालण्यात, पाणी देण्यात, मजुरीच्या खर्चात वापरले जात होते. आंब्याच्या फळांपेक्षा आपली स्वतःची अशी हिरव्यागार कोकणाच्या डोंगरांमध्ये बाग आहे ह्याच आनंदाने लोकांना समाधान मिळत होते.

कोकणातल्या हापूस आंब्याची नैसर्गिक उत्पादकता इतर सर्व आंब्याच्या जातींपेक्षा कायम कमी राहिली आहे. जी काही विशेष चव आहे ती झाडांना मिळत असलेल्या नैसर्गिक ताणाच्या परिस्थितीचा आणि योग्य वेळी काढल्या गेलेल्या फळांच्या अवस्थेचा परिणाम आहे.  जेंव्हा खुप मोठा जनसमुह अश्या कमी उत्पादकतेच्या पर्यायाकडे वळला तेंव्हा त्यांनी आंब्याच्या झाडांसाठी ताणदायक परिस्थिती निर्माण केली. त्यासाठी गवत आणि नैसर्गिक वनस्पती नष्ट केल्या आणि डोंगर उतार उजाड केले. प्रत्येक जमिनीचा तुकडा हापुसच्या लागवडीखाली गेल्याचा परिपाक म्हणून त्याच्यावरच्या रोग, किडी वाढल्या आणि रानटी माकडांमुळे नुकसान वाढले. त्यावर उपाय म्हणून शेतकरी विविध जहाल रसायने फवारू लागले आणि माकडांना पळवून लावण्यासाठी खास मजूर ठेवू लागले. बाजारात लवकर पोचणाऱ्या आंब्याला मिळणाऱ्या दराच्या मोहापायी संजीवकांचा वापर वाढला आणि वृक्ष कमजोर होऊ लागले.

ताणाखाली असलेल्या जमिनी, कमजोर झाडे आणि निराशाजनक अर्थव्यवस्था हे सर्व आता हवामान बदलाच्या परिस्थितीत ढासळू लागले आहेत. माझ्या आजोबांना व्यवसायाची विशेष समज होती. ते नेहमी रोख पैश्याचा सततचा ओघ आणि होत असलेल्या नफ्याचे खऱ्या अर्थाने उत्पादक व्यवस्थेमध्ये पुनर्गुंतवणूक ह्यावर भर देत असत. ते शहाणपण सध्या सापडत नाही.
---------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी

ध्वनीक्षेपकांचा उन्माद