कृषिविविधतेचा स्वीकार

सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात ज्या कुटंबांकडे साधारण आर्थिक सुरक्षितता आहे ते पाकसिध्दीमध्ये मग्न आहेत. व्हॉट्सअॅ्पची स्टेटस सध्या खाद्यपदार्थांच्या फोटोंनी भरलेली आहेत. मुलं पोळ्या लाटायला शिकत आहेत. त्यांच्या आया घरातल्या सगळ्यांचा मूड छान रहावा म्हणून केक बनवत आहेत. लोकांना सध्या दुकानातली संपत जाणारी बिस्किटे, नुडल, पास्ता अश्या पदार्थांच्या स्टॉकची चिंता आहे. हे सगळं करत असताना कल्पना करा की असा लेख तुमच्या वाचनात आला की जगातली शेती नष्ट झाली आहे आणि मानवजातीला फक्त ५७ दिवस पुरेल इतकेच अन्न उपलब्ध आहे. तुमची भीतीग्रस्तता वाढेल आणि कदाचित मानवी जगाच्या अंताची तयारी करू लागाल कारण तुम्ही फक्त एका धान्यावर अवलंबून आहात ते म्हणजे गहू. 

आधी सांगितलेला लेख खरोखर इंटरनेटवर आहे आणि काल तो वाचताना मला काही भीतीग्रस्तता आली नाही कारण मी पोटभर फणसाचे गरे खाल्ले होते. त्या लेखामध्ये मांसउत्पादन, जैव इंधने, हवामानबदलाचे शेतीवर होणारे वाईट परिणाम ह्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हे सर्व प्रश्न नाकारता येत नाहीत पण त्या खाद्यसुरक्षेच्या शेवटच्या दिवसांचे मापन करताना त्यांनी ज्या सांख्यिकी माहितीचा आधार घेतला आहे त्यात जागतिक स्तरावरचे तीन महत्वाच्या धान्यांचे साठे लक्षात घेतले होते ते म्हणजे गहू, तांदुळ आणि मका. आपण भारताचा जरी विचार केला आणि त्याच्या लोकसंख्येला लागणाऱ्या पोषण पिरॅमीडचा पाया असलेल्या कर्बोदकांचा विचार केला तरी इथल्या संभाव्यता प्रचंड आहेत. पण जर हस्तिदंती मनोऱ्यातल्या धोरणकर्त्यांसारखा आणि तो लेख लिहिणाऱ्या चिंताग्रस्त लेखकासारखा विचार केला तर खरंच कदाचित आपण जीवंत नसू.

आपल्याला भारत नावाच्या ह्या विविधतेचा अभिमान आहे. ह्या देशात नियोजन आयोगाने निश्चित केलेले १५ कृषि हवामान प्रदेश आहेत. प्रत्येक प्रदेशात त्याच्या जमीन, हवामान अश्या घटकांमध्ये अनुरूप अशी पिके घेतली जातात. अन्नधान्यांचा विचार केला तर हिमालयाच्या उंच थंड प्रदेशात येणारी बार्ली आहे, पश्चिम मध्य भारतातल्या दुष्काळी प्रदेशात घेतले जाणाऱ्या ज्वारी, बाजरी आहेत. दक्षिण भारतात नियमीत पेरली जाणारी नाचणी आहे. बटाटे, रताळी, कणगर, शेवरकंद अशी कंदवर्गीय पिके भारतीय शेतकरी चांगल्या प्रकारे घेत आहेत. आणि आमच्या गावातली आज्या पणज्यांनी लावलेली फणसाची झाडे अजूनही कार्बोहायड्रेटचे भरपूर प्रमाण असलेली फळे भरभरून देत आहेत. ह्याच्या जोडीला आपल्या सरकारी गोदामांमध्ये असलेले तांदूळ आणि गव्हाचे साठे आहेत.

आता मुलभुत प्रश्न असा आहे की आपण ह्या विविधतेकडे लक्ष दिले आहे का. शेतकऱ्यांनी ह्या पिकाकडे सध्याच्या काळात बऱ्यापैकी दुर्लक्ष केले आहे.  मी नाशिक जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांसोबत एका अभ्यासादरम्यान तिथल्या पारंपरीक बाजरी पिकाविषयी चर्चा करत होतो. शेतकरी त्या पिकाच्या उत्पादनाविषयी फारसे उत्साही नव्हते. एकदा त्यांची गरज भागेल इतके उत्पन्न आले की त्यापुढे त्यांना प्रयत्न करण्याची गरज वाटत नव्हती. पण काही शोधक प्रवृत्तीच्या माहितगार शेतकऱ्यांशी बोलण्यातून सगळा निरुत्साह संपून जाईल अशी माहिती समोर आली. ह्या शेतकऱ्यांचे बाजरीचे उत्पादन खरीप हंगामात एकरी २४ क्विंटल होते. त्यासाठी त्यांना फक्त २ पाण्याच्या पाळ्या द्यायला लागल्या होत्या. बाकीची गरज पावसाने भागवली होती. अन्य शेतकरी त्याच गावांमध्ये गव्हाचे पीक रबी हंगामात घेत होते त्यासाठी त्यांना पाण्याच्या ६ पाळ्या द्यायला लागत होत्या आणि उत्पादन होते एकरी फक्त १२ क्विंटल.

आहार तज्ञ सांगतात त्याप्रमाणे आहारात विविधता कायम ठेवली पाहीजे पण त्याकडे बरेचसे ग्राहक दुर्लक्ष करतात आणि त्यांच्या आहारातील एकसूरीपणा वाढत चालला आहे. जर त्यांनी काही दिवस गव्हाच्या ऐवजी ह्या लोहाने समृध्द असलेल्या बाजरीची भाकरी खायला सुरूवात केली तर त्यांचा आर्थिक फायदा होईल. बाजरीचा उत्पादन खर्च कमी असल्यामुळे त्याची किंमत गव्हापेक्षा कमी असते. बाजारातील त्याची मागणी वाढेल. त्यामुळे वेगवेगळे व्यवसाय नव्याने उभे राहतील जसे की बाजरीचे धान्य साफ करणाऱ्या मिल किंवा त्याच्यावर प्रक्रीया करणारे खाद्यप्रक्रीया उद्योग इ. मागणी वाढली तर मॉलवाल्या कंपन्याही त्यांच्या दुकानांमध्ये बाजरी मोठ्या प्रमाणावर ठेवायला लागतील.

पण हे दुवे सध्या तरी अस्तित्वात नाहीत.
---------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी

ध्वनीक्षेपकांचा उन्माद