२१ दिवसांच्या चॅलेंजच्या शेवटी

२० दिवसांपुर्वी मी एक लक्ष्य निश्चित केले होते की मी दररोज एक लेख लिहीन व वाचकांसोबत शेअर करेन. हे शेअर करण्याचा उद्देश हा होता कि त्यानिमीत्ताने माझा हा संकल्प दृढ होईल. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मी एकही शब्द लिहिला नव्हता आणि काही लोकांनी मेसेज पाठवले होते की ते माझ्या लेखाची वाट पहात आहेत. त्यामुळे लेख लिहिण्याच्या प्रक्रियेला चालना मिळाली. पहिला लेख लिहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की मी अजून काही साध्य करू शकतो, ते लोकांबरोबर शेअर करू शकतो आणि ह्या सर्वांचे एका सामाजिक प्रयोगात रुपांतर करू शकतो. आहारातील साखर कमी करणे, १०० सुर्यनमस्कार घालण्याची क्षमता विकसित करणे आणि मेडिटेशन करणे असे तीन अधिकचे संकल्प निश्चित केले. वाचकांकडून आणि आजुबाजूच्या लोकांकडून मिळालेला प्रतिसाद माझ्या अपेक्षेपेक्षा बराच जास्त होता.

माझे बरंचसं लेखन विविध विषयांवर झालं. बरेच लेख माझ्या कामाच्या कृषि, शेतकरी ह्या विषयांवर होते पण ह्या एकमेकांशी जोडलेल्या जगात मला वाटतं ह्या विषयांशी प्रत्येकाचा संबंध दुरान्वये तरी येतोच. हे चॅलेंजच्या स्वरूपात लेखन करण्याआधी काही विषय माझ्या डोक्यात घोळत होते पण त्यावर प्रत्यक्ष काम करण्याचा संबंध कधी आला नव्हता. लेखनाच्या निमित्ताने वैचारीक स्पष्टता निर्माण होण्यास मदत झाली. वाचकांनीही काही महत्वपूर्ण माहिती, त्यांचे स्वतःचे विचार, सुधारणेसाठी मुद्दे आणि पुढच्या कामासाठी सुचना दिल्या.

एका वेळेला १०० सुर्यनमस्कार घालण्यामध्ये एक वेगळे चॅलेंजही होते ते म्हणजे त्यासाठी मला लवकर उठावे लागत होते आणि त्यासाठी बऱ्यापैकी वेळ द्यावा लागत होता. जरी मी त्या लक्ष्यापर्यंत पोचू शकलो तरी मला वाटतं अजून बऱ्याच सरावाची आणि परिपूर्णतेची गरज आहे. त्यामुळे त्यावर पुढेही काम करत राहावे लागेल. ह्याचा एक मोठा परिणाम म्हणजे काही वाचकांनी स्वतः सुर्यनमस्कार घालण्यास सुरूवात केली. काही लोकांनी स्वतःचे व्यायामाचे संकल्प पक्के होण्यास मदत झाली असे कळवले. एका मैत्रिणीने असे कळवले की हा लेख दाखवून तिने तिच्या मुलाला सुर्यनमस्कार घालायला प्रवृत्त केले.

मला स्वतःला जे लक्ष्य कठीण वाटले होते ते म्हणजे साखर कमी करण्याचे. पण ते खुपच सोपे होते असे लक्षात आले. मी सध्या दिक्षित डाएट पध्दतीने दररोज दोनदाच जेवत असल्यामुळे अधलेमधले खाणे होतच नव्हते आणि ह्या दोन जेवणांमध्ये गोड पदार्थ टाळण्याची सवय करणे सहज शक्य झाले. कुठे बाहेर जाणे सध्याच्या बंधनांमुळे होत नसल्यामुळे आग्रह वगैरे गोष्टींना सामोरे जाण्याची वेळ आली नाही. एक छोटी समस्या मात्र झाली पण त्यावरही उपाय शोधून काढता आला. माझ्या बायकोने घरात लाडू केले. पण माझा ठाम नकार येणार हे माहित असल्यामुळे तिने माझ्यासाठी खास साखरविरहीत लाडू वळले. ते सध्या मी चटणीसोबत खातोय.

मेडिटेशन खुप कठीण ठरलं. मी मेडिटेशन करणे असा संकल्प ठरवला होता. पण ते किती वेळ करणार, कधी करणार आणि कसं करणार ह्याबद्दल काहीच ठरवले नव्हते. हा प्रक्रियेचा संकल्प आहे त्यामुळे एक विशिष्ट संख्येप्रत तुम्हाला पोचता येत नाही त्यामुळे हे सर्व मुद्दे ठरवणे महत्वाचे होते. आता मला ह्यावर अजुन काम करावे लागेल. मेडिटेशनचा एक महत्वाचा भाग असतो तो म्हणजे तुम्ही ज्या परिस्थितीत असता त्याकडे सतत लक्ष देणे व आकलन करत राहणे. मग तुम्ही कदाचित नुसते बसलेले असाल, काही पाहत असाल, खात असाल किंवा अन्य काही काम करत असाल. जेंव्हा तुम्ही श्वासावर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करता तेंव्हा भुतकाळासंबंधी किंवा भविष्यासंबंधी विचार येतात आणि त्या वर्तमान स्थितीचा कब्जा घेतात. ती स्थिती नेहमीच क्षणिक आणि सहज समजणार नाही अशी असते.

सध्याच्या प्रत्यक्ष अंतर ठेवण्याच्या दिवसात, लोक सामाजिक रित्या खुपच गुंतलेले आहेत. सगळीकडे व्हिडिओ चॅट जोरात आहेत. फोनच्या रिंगटोन आणि मेसेज सतत वाजत आहेत. घरी बसून बाहेरचे काम करण्याबरोबरच घरातले कामही लोक करत आहेत. हे सगळं आपल्या बॅटऱ्या संपवणारं आहे. तेंव्हा इतर लोक काय करत आहेत ते बघत बसण्यापेक्षा जरा वेळासाठी स्विच ऑफ करून आत डोकावून पाहणं फायद्याचं होईल.
---------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

A Psycho-financial Experiment

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी