कोकणची माती – १
कोकणच्या जमिनी ह्या जांभा ह्या खडकाने बनल्या आहेत. ह्या खडकापासून तयार झालेली मातीही लाल रंगाची आहे. ह्यातील विशिष्ट खनिजामुळे ही माती एकदा कपड्यावर लागली कि त्याचा लाल रंग कपड्याला दिल्याशिवाय निघत नाही. त्यामुळेच गंमतीने कोकणची माती एकदा माणसाला चिकटली कि ती जाऊ शकत नाही असं म्हटलं जातं. अर्थात दक्षिण कोकण विभागाचा म्हणजेच रायगडचा काही भाग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांच्या परिस्थितीचा विचार केला तर येथील पर्यावरणाचा माती हा खरंतर अतिशय संकटात असलेला घटक आहे. परंतु येथील लोक, स्वयंसेवी संस्था आणि शासन स्तरावर त्याचा तितक्या निकडीने विचार केला जात नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागते.
कोकणाच्या डोंगरांच्या माथ्यावर असलेल्या विस्तीर्ण पसरलेल्या भागाला सडा असे म्हणतात. हा सडा म्हणजे बऱ्याचवेळा सात बारावर बहुतांश पड किंवा पोटखराबा अशी नोंद केलेला असतो परंतु इथल्या पर्यावरण आणि स्थानिक लोकांच्या जीवनात हे सडे खुप मोठी भुमिका बजावत असतात. डोंगरमाथ्यावर असल्याने येथे एकुणच मातीची खोली कमी असते आणि मातीविरहीत उघडा खडकाळ परिसरच अधिक असतो. डोंगर उताराला तसेही पाणी साठून राहत नाही परंतु हे सडे त्यांच्या सपाट आकारामुळे आणि त्यावर असलेल्या थोड्याश्या मातीमध्ये पावसाचे पाणी शोषुन ते जमिनीखालच्या झऱ्यांना पुरवण्याची मोठी भुमिका पार पाडत असतात.
ह्या सड्यांवर सपाटीला काही सखल भाग असतात. ह्यांना बाऊळ असे म्हणतात. ह्या बावळांमध्ये बऱ्याचश्या ठिकाणी भातशेती केली जाते. बावळेतील भातशेती म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अजूनही एकप्रकारची उत्पन्न हमी मानली जाते. ह्या भागात पाणी कमी पडण्याचा धोका नसतो. वाहून आलेल्या गाळामुळे येथील माती नैसर्गिकरित्या सुपीक असते आणि भरपुर सुर्यप्रकाश पिकाला मिळतो. जिथे लोकांनी भातशेती विविध कारणांमुळे सोडून दिली आहे तिथे ह्या बावळांमध्ये अनेकविध नैसर्गिक गवतांची रेलचेल दिसून येते आणि त्याबरोबरच अनेक पक्ष्य़ांचाही अधिवास येथे तयार झालेला दिसतो.
दुसरा सड्यांचा भाग म्हणजे हलक्या उताराचे व मातीचा उथळ थर असलेला गवताळ प्रदेश. ह्या गवताच्या आधाराने गावातील गुरांना चारा कमी पडत नाही. पाचसहा वर्षांपुर्वीपर्यंत शेतकरी बैलाने नांगरणी करताना दिसत असत आणि शेतीचे काम झाले कि ही गुरे गावात मुक्त पणे चरत असत त्यांना ह्या सडयावरच्या गवताचा प्रामुख्याने आधार असे.
सध्याच्या काळात ह्या संपुर्ण परिसंस्थेलाच खुप मोठा धोका आहे. कोकणात सपाटीची मोठी जागा सड्यांवरच मिळत असल्यामुळे नागरी विकासाचे हे सडे म्हणजे केंद्रबिंदूच झाले आहेत. बऱ्याच सखल जागा भराव घालून उंच करण्यात येत आहेत त्यामुळे पाणी थांबण्याचे व मुरण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी होत आहे. काही ठिकाणी सड्यावरील ही माती सरळ उकरून विकण्याचेही प्रकार होत आहेत. गवताळ रानांमध्ये सध्या गुरांची संख्या कमी झाल्यामुळे गवत मोठ्या प्रमाणावर वाढणे आणि त्यामुळे वणवे लागून हे भाग नष्ट होत आहेत. एकदा हे गवत नष्ट झाले की त्यांची मातीला घट्ट पकडून ठेवणारी मुळेही जातात आणि पहिल्या पावसाबरोबर ह्यावरील मातीही वाहून जाते.
आंबा, काजू च्या अनेक बागा ह्या अश्या डोंगरमाथ्यांच्या नजीकच्या उताराला उथळ मातीच्या भागात तयार केल्या आहेत. येथे येणारे गवत नष्ट करण्यासाठी बरेच शेतकरी तणनाशक रसायनांचाही वापर करतात. त्यामुळे येथील गवत कायमचेही निघून जाते परंतु त्यामुळे जमिनींचे एक नैसर्गिक चिलखतच नाहीसे होते आणि त्यावरील माती उघडी पडून त्याची धुप होऊन जाते व परिणामी ह्या बागांमध्ये नैसर्गिक ओलावा राहत नाही व त्यांच्या नैसर्गिक उत्पादकतेवरही विपरीत परिणाम होताना दिसतो. वातावरणात सध्या होत असलेल्या बदलांना व वाढत्या तापमानाला हि पिके टक्कर देऊ शकत नाहीत व विविध किडी, रोगांना सहज बळी पडू लागतात.
एकदा ही डोंगरमाथ्यावरील माती नष्ट झाली की त्याचे परिणाम आपल्याला डोंगरांच्या खालच्या भागातही लगेच दिसू लागतातच. सर्वप्रथम विहीरी व झऱ्यांमध्ये असलेल्या पाण्याची उपलब्धता कमी होते. जे पाण्याचे स्रोत पुर्वी पुर्ण वर्षभर चालत असत ते आता उन्हाळ्याचे काही महिने आटून जातात असे कोकणातील अनेक गावात दिसून येत आहे. पिण्याला, घरगुती वापराला व शेती बागायतीला पाणी मिळत नसल्यामुळे लोकांचे जीवन खडतर बनत जाते. पाणी आणण्याचे काम बहुतांश वेळा घरातील स्त्रियांना करावे लागते व त्यासाठी त्यांना बराच वेळ व श्रम खर्च करावे लागतात. कोकणातील वस्ती अनेक ठिकाणी विखुरलेली व विरळ असल्यामुळे बऱ्याच घरांपर्यंत सामुदायिक पाणीपुरवठा व्यवस्था पोचत नाहीत आणि अश्या काहींना घरापर्यंत महागडा वाहतूक खर्च सोसून पाणी विकतही आणावे लागते.
ह्या विषयाचे अजुनही काही मुद्दे आपण पुढील भागात पाहू.
=========================================================
हि लेखमाला मी पुर्वी एका रेडिओ कार्यक्रमासाठी लिहिली होती. आता सोशल मिडीयावर शेअर करतोय. मुळ नावासह शेअर करायला हरकत नाही.
- सचिन पटवर्धन
माझा ब्लॉग: spaceforexpressions.blogspot.com
Comments