गोष्टी माती संरक्षणाच्या
तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यामध्ये नेखुंडी नावाचं एक गाव आहे. हा तामिळनाडूचा साधारण कमी पावसाचा दुष्काळग्रस्त मानला जाणारा भाग आहे. बराचसा डोंगराळ भाग असल्यामुळे पडणारा पाऊस जमिनीमध्ये थांबत नाही तर पुढे वाहत निघून जातो. साधारण ८०० मिमी पाऊस पडत असला तरी हलक्या मातीच्या जमिनी, उघडे बोडके डोंगर अश्या सर्व परिस्थितीमुळे विहिरींमध्येही पाणी फारसे नसते. जिथे प्यायच्या पाण्याचीच टंचाई असते तिथे सिंचनासाठी कुठून पाणी येणार.
ह्या नेखुंडी गावामध्ये पियुष मानुश नावाच्या एका उद्योजकाने
साधारण दिड एकर उताराची, शेतीसाठी निकृष्ट समजली जाणारी जमीन विकत घेतली. हा माणूस
जवळच्या सेलम शहरात राहत होता आणि त्याचा फर्निचरचा व्यवसाय होता. व्यवसायाला
उपयोगी होईल म्हणून त्याने ह्या जमिनीत काही फर्निचरला योग्य लाकूड देणाऱ्या वृक्षांची
लागवड केली. एक वर्षानंतर अतिशय खडतर वातावरणात कमी पाण्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात
बांबूची रोपे तग धरून राहिल्याचे लक्षात आले.
त्याचा हा प्रयोग पाहून त्याच्या काही मित्रांनीही ह्या
परिसरात त्याच्या शेजारीच काही जमिनीचे तुकडे विकत घेऊन एक गुंतवणूक म्हणून
बांबूची लागवड करायला सुरूवात केली. दुसऱ्या वर्षी ह्या सर्व मित्रांनी एकत्र येत
त्यांच्या जमिनीमधून जाणाऱ्या नाल्यावर बंधारा बांधला. ह्या बंधाऱ्यामुळे
लागवडीसाठी तर सहज पाणी मिळालेच परंतु पाणी जमिनीत मुरल्यामुळे नाल्याच्या खालच्या
भागातील पाण्याची पातळी वाढली. ह्या सर्व प्रयोगाचं यश पाहत अजुनही काही लोक
ह्यामध्ये सहभागी झाले. आज येथे जमीनधारकांची एक वन संवर्धन करणारी सहकारी संस्थाच
तयार झाली आहे.
२५० सदस्य जमीनधारकांच्या जमिनीवरून येणाऱ्या बांबू व अन्य
औषधी वनस्पतींवर प्रक्रीया करणारे उद्योग ही सहकारी संस्था चालवते. पुर्वीचे उघडे
बोडके डोंगर माती संरक्षण, वृक्ष लागवड आणि पाण्याचे संवर्धन ह्यामधून हिरवे गार
झाले आहेत आणि त्याचा आदर्श परिसरातील इतर गावकरीही घेत आहेत. गावचा पाण्याचा
प्रश्नही ह्यामधून सुटला आहे.
अशीच एक गोष्ट थोडी वेगळी परंतु परदेशातील पाहू.
इथियोपिया हा आफ्रिकेतील देश बराचसा डोंगराळ आहे. ह्या
देशात बऱ्याचवेळा दुष्काळ आणि भुकबळींच्या घटना काही वर्षांपुर्वी पर्यंत घडत असत.
इथल्या सरकारने वीस वर्षांपुर्वी आपल्या कृषि विभागामार्फत जागतिक बॅंकेच्या
सहायाने एक महत्वाकांक्षी प्रकल्प राबवला त्याचे नाव शाश्वत जमिन व्यवस्थापन
कार्यक्रम. तेथील ओरोमिया ह्या प्रदेशात त्यांनी आपल्या कृषि विभागाच्या
गावपातळीवरील कार्यकर्त्यांमार्फत सर्व गावांमध्ये प्रथम गावकऱ्यांच्या सभा घेऊन
गावपातळीवरील समस्यांचा सहभागी पध्दतीने अभ्यास केला. येथील शेतकऱ्यांची प्रमुख
समस्या शेतीची ही कमी उत्पादकता ही होतीच पण त्याचे मूळ कारण वेगळे आहे हे ह्या
गावपातळीवरील अभ्यासावरून लक्षात आले.
येथे गावकऱ्यांनी सर्व डोंगर उताराची जमिन तेथील वनस्पती,
वृक्ष तोडून टाकून उघडी बोडकी केली होती. गुरांच्या अनिर्बंध चराईमुळे येथे गवतही
वाढेनासे झाले होते. येथे गावातील नाल्यांमध्ये पाणी टिकत नव्हते.
प्रकल्पांअंतर्गत सर्वप्रथम प्रत्येक गावाच्या संपुर्ण परिसराचे सर्वेक्षण करून
त्याचे वरच्या भागातील डोंगर उतार, खालच्या भागातील डोंगर उतार व सखल भागातील
शेतीचा भाग असे तीन भाग केले. सर्वप्रथम प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीला
बांधबदिस्ती करुन त्यातून होणारी मातीची धुप थांबवली. शेतजमिन संरक्षित केल्यामुळे
जमिनीत पाणी थांबू लागले व पिकांना उपलब्ध होऊ लागले.
त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात खालच्या डोंगर उतारांवर जिथे
मातीची खोली जास्त होती अश्या ठिकाणी विविध प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आली.
त्याचे भटक्या गुरांपासून संरक्षण करण्यासाठी गावपातळीवर नियम करण्यात आले. तसेच
वरच्या भागातील डोंगर उतारावर, जिथे मातीची खोली उथळ आहे अश्या ठिकाणी जे नैसर्गिक
रित्या गवत उगवते त्याचे संरक्षण करण्यात आले. काही ठिकाणी नव्याने गवताची लागवडही
करण्यात आली. ह्या भागामध्ये काही वर्षांसाठी चराईबंदी लागू करण्यात आली. वाढलेले
गवत लोकांना कापून घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली.
अश्या प्रकारे मातीचे व जमिनींचे संरक्षण केल्यामुळे आपोआपच
पाण्याचे जमिनीत मुरणे वाढले आणि विहिरींमधील पाण्याची पातळीही वाढली. ह्या
विभागातील बऱ्याच नाल्यांमध्ये त्यामुळे वर्षभर पाणी राहण्याचे प्रमाण वाढले. ह्या
सर्वांमुळे बरीच मोठी शेतजमिनीला सिंचनाची सोय तर झालीच परंतु परिसरातील पर्यावरण
सुधारले. विविध पुर्वी नष्ट झालेल्या वनस्पती, किटक व प्राणीही परत त्या परिसरात आले.
ह्या एकूण प्रकल्पाचा फायदा तीन लाख हेक्टर क्षेत्राला झाला. जवळ जवळ अडिच लाख
घरांमध्ये विविध शेती व जोडधंदे ह्यांच्या झालेल्या सुधारणेमधून आर्थिक उत्पन्नात
वाढ झाली.
हे सर्व परिणाम आपल्याला दाखवून देतात की जर धोरणस्तरावर जर
आपण मातीचे संरक्षण जर आत्मसात केले आणि प्रत्यक्षात आणले तर निव्वळ एक कुटूंबच
नव्हे तर अख्ख्या देशाच्या प्रगतीच्या वाटा आपल्याला खुल्या होऊ शकतात.
=========================================================
हि लेखमाला मी पुर्वी एका रेडिओ कार्यक्रमासाठी
लिहिली होती. आता सोशल मिडीयावर शेअर करतोय. मुळ नावासह शेअर करायला हरकत नाही.
- सचिन पटवर्धन
माझा ब्लॉग: spaceforexpressions.blogspot.com
Comments