उद्योग पळवण्याचा उद्योग

सध्या महाराष्ट्रातील विविध राजकीय विरोधक राज्यातील उद्योग अन्य राज्यात कसे पळवून नेले जात आहेत त्यावर राळ उठवत आहेत. दोन मिनिटात वीस ब्रेकिंग न्युज आणि स्वघोषित तज्ञांनी काढलेल्या एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या ह्यापलीकडे फारसं काही देऊ न शकणाऱ्या मीडियाला असली भडक वाक्यं घेऊन परत परत दाखवणं खुप सोपं असतं कारण कोणाला फारसे प्रश्न विचारून त्याचा तपशील घेऊन मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करण्याची तसदी घेण्याची गरज नसते. का, काय, कोणी, कुठे, कोणाला, कसे असे सहा प्रश्नार्थक शब्द आपल्या भाषेत आहेत. ते कुठल्याही घटनेच्या बाबतीत जर ते विचारता येत नसतील आणि सध्याची माध्यमे त्याबाबत माहिती पुरवण्यास असमर्थ असतील तर असल्या उपयोगहीन वस्तू व सेवांवर खर्च आणि वेळ कशाला खर्च करायचा हा मोठा प्रश्न आहे.

तसंच काहिसं उद्योगांचंही आहे. उद्योग, व्यवसाय म्हणजे लोकांच्या चरितार्थाचं साधन असतं. एखादी मुलं पळवणारी टोळी असते किंवा दरोडे घालून वस्तू चोरून नेता येतात तसे उद्योग पळवता येत नाहीत हे ज्ञान एखादा अल्पशिक्षित अल्पभुधारक शेतकरी किंवा रस्त्यावरचा निरक्षर फुगेवालाही बाळगतो. व्यवसायासाठी निव्वळ कच्च्या मालाची किंवा बाजाराची उपलब्धताच नव्हे तर त्यासाठी पोषक वातावरण, धोरणे, सोयी, कौशल्य ह्या गोष्टी लागतात. ज्या शिवछत्रपतींचा वारसा सध्याचा महाराष्ट्र सांगतो त्यांनी स्वराज्यात ह्या सर्व गोष्टी विकसित कश्या होतील त्यासाठी धोरणं राबवली होती हे सध्याचा मराठी माणूस विसरून जातो आणि नुसतेच अस्मितेचे ढोल बडवत राहतो. कोकणचाच विचार केला तरी किनारी भागातील किल्ले, आरमार उभारण्याबरोबरच विविध ठिकाणी त्यांनी व्यापार, उद्योग कसे उभे राहतील ते पाहिले होते आणि जिथे स्थानिक कौशल्य नव्हते त्यासाठी अन्य भागातून लोक आणून वसवले होते ह्याचे उल्लेख अनेक ऐतिहासिक दस्तावेजामध्ये सापडतात.

सध्याचे उद्योग पळवण्याचे आरोप मोदी शहा ह्या जोडगोळीबाबत होत आहेत. अमेरिकेचे भारतात एक राजदूत होते डेव्हिड सी. मुल्फोर्ड नावाचे २००४ ते २००९ ह्या कालावधीमध्ये. त्यांचे एक भाषण मध्यंतरी युट्युबवर पाहिले होते त्यात त्यांनी मोदींच्या गुजरातमधील सरकारबाबत त्यांचा अनुभव सांगितला आहे. (लिंक: https://youtu.be/Pn0GMJ0FnZQ) त्यावेळेला कॉंग्रेसचे सरकार होते आणि गुजरातमध्ये भाजपचे सरकार होते. अन्य राज्यांमध्ये होत नव्हती अशी एकच गोष्ट गुजरातचे सरकार करत होते ते म्हणजे उद्योजकांच्या समस्या व्यवस्थित समजून घेणे आणि त्या धोरण पातळीवर जाऊन सोडवणे. त्यासाठी त्यांनी एक कक्षच उघडला होता आणि येणाऱ्या प्रत्येक फोन कॉल, पत्राला उत्तर दिले जात होते आणि त्याची दखल घेतली जात होती. केंद्र सरकारमध्ये त्यांच्या पक्षाचे सरकार नसतानाही गुजरात सरकारने त्याकाळात भारतातील सर्वाधिक आर्थिक प्रगतीचा दर व सर्वाधिक परदेशी गुंतवणूक हे दोन्ही साध्य केले होते. जिथे स्वतःच्या राजकीय कार्यकर्त्यांचेच फोन कॉल घेतले जात नाहीत तिथे इतरांची काय बिशाद. उद्योग वगैरे तर दूरच राहतील. 

महाराष्ट्राला आतापर्यंत एका विशिष्ट भौगोलिक परिस्थितीचा फायदा मिळाला आहे त्यामुळे प्रामुख्याने उत्तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठमोठे उद्योग उभे राहिले आहेत. समुद्रावरील बंदरे जवळ असणे आणि अन्य राज्यांच्या तुलनेत पाणी, वीज पुरवठा चांगला असणे. जसजसे अन्य राज्यांमधील रस्ते चांगले होत आहेत तसतसे समुद्री बंदरांपासून असलेले अंतर ह्या मुद्द्याचे महत्व कमी होत जाईल. ज्याला ह्याची गरज असे मोबाईल निर्मिती उद्योग सुरूवातीपासूनच दिल्लीच्या जवळ उभे राहत आहेत. सध्या महाराष्ट्रामध्ये राज्याच्या गरजेपेक्षा वीज निर्मिती कमी होत आहेत. महाराष्ट्रामध्ये आधीच खुप मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मजूर स्थानिकांपेक्षा कमी दरामध्ये काम करत आहेत. हा वर्ग त्यांच्या मुळ राज्यांमध्ये सहज उपलब्ध होऊ शकेल जर त्या राज्यांमध्ये उद्योगाला पोषक वातावरण उभे राहिले तर नवीन उद्योग इथे येणार नाहितच परंतु इथे असलेले उद्योगही हलवले जातील ह्यात शंका नाही. 

केंद्र सरकारच्या इन्फ़्रास्ट्रक्चरसंबंधित दोन योजना एक म्हणजे गतिशक्ती मास्टर प्लॅन आणि नॅशनल लॉजिस्टिक्स पॉलिसी.  ह्या जर व्यवस्थित राबवल्या गेल्या अन्य राज्यांमध्ये प्रामुख्याने अंतर्भागामध्ये उद्योग वाढतील कारण तिथे कमी दरामध्ये उत्पादित केलेल्या वस्तू अन्य ठिकाणी वाहतुक करणे अधिक सोपे व स्वस्त होईल. महाराष्ट्राला पुर्वी अन्य राज्यांची जी स्पर्धा नव्हती ती प्रचंड प्रमाणात वाढणार आहे. त्या स्पर्धेला मराठी माणूस तयार आहे का हाच प्रश्न आहे. ज्यांना काम करायचं आहे आणि आपल्या कार्यक्षेत्रात काही साध्य करायचं आहे ते जिथे संधी आहेत तिथे जातात. सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यामधला दुष्काळाने बेरोजगारीने पिचलेला मजूर कामगार मराठी माणूस काम नाही म्हणून सुरत, अहमदाबादला जातो आणि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातला तंत्रज्ञान क्षेत्रातला उच्चशिक्षित मराठी माणूस चांगल्या संधी नाही म्हणून बंगलोर, नॉयडा, गुडगावला जातो. दोन्ही वर्गांना उद्योग बाहेर पळवले म्हणून तक्रार करत घरी बसणे परवडत नाही.
===================================
मुळ नावासह शेअर करायला हरकत नाही.
- सचिन पटवर्धन
माझा ब्लॉग: spaceforexpressions.blogspot.com

Comments

Unknown said…
उत्तम लेख,वाचायला थोडा वेळ झाला,
ग्राम पंचायतींनाही आता अशा विषयांची माहिती होणे आवश्यक आहे,गावांतील तरुण,साधन सामुग्री याचा विचार करून आपल्याला उद्योगाचा काही विचार करता येईल का हे समजून घेणे अगत्याचे आहे,धन्यवाद सर

Popular posts from this blog

A Psycho-financial Experiment

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी