कोकणची माती – २

आमच्या लहानपणी आम्ही जेंव्हा आजोळी जात असू, तेंव्हा आमचे आजोबा, माझ्या आईचे वडील, आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगत. ह्यात त्यांच्या काळचे लोक, झाडे, डोंगर आणि भुतंखेतं ह्यांचाही समावेश असे. त्यामध्ये अनेकवेळा ते तरूणपणी त्यांच्या बैलगाडीतून बंदरावरच्या प्रवाश्यांना कसे त्यांच्या घरापर्यंत नेत असत त्याचे अनेक अनुभव असत. त्यामध्ये मग त्यांचा व्यवसाय कसा बंद पडला प्रवासी बोटी बंद पडल्यामुळे ते सांगत असत. ह्या दुरवर जाणाऱ्या प्रवासी बोटींची सेवा हे सांगताना खाड्या गाळाने कश्या भरल्या आणि बोट बंदरापर्यंत यायला प्रतिबंध कसा होऊ लागला त्याबद्दल सांगत असत.

 

फक्त प्रवासी बोटी नव्हे तर अनेक मालवाहू नौका कोकणात येत असत आणि येथील व्यापारी, ग्राहक, शेतकरी त्यांच्या वाटेकडे कसे डोळे लावून बसलेले असत ह्याचीही रसभरीत वर्णने आपल्याला जुन्या माणसांकडून ऐकायला मिळू शकतात. परंतु जसजशी हि पिढी काळाच्या पडद्याआड गेली तश्या आता त्यांच्या कथाही विस्मृतीत जात आहेत. पुर्वीच्या काळी येथे असलेल्या अनेक छोटया छोट्या बंदरांमधून खुप मोठा व्यापार चालत असे हे सांगितलं तर नवीन पिढीला पटकन विश्वास बसत नाही.

 

ज्या कोकणच्या किनाऱ्यावर देशोदेशींचे व्यापारी आपला माल घेऊन येत असत आणि ज्या किनाऱ्यावर मराठ्यांचं बलशाली आरमार उभं राहिलं तेथील हि सर्व बंदरे आता परत उर्जितावस्थेला आणायची म्हटलं तर एक खुप मोठा अडसर असेल गाळाने भरलेल्या खाड्यांचा. कित्येक शतके व्यवस्थित चालू असलेली बंदरे अचानक गाळाने कशी भरली असा प्रश्न आपल्याला पडणे सहज शक्य आहे.

 

जर आपण उघड्या डोळ्यांनी आजुबाजुला पाहिलं तर आपल्याला कोकणात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर जंगलांचा विनाश होताना दिसेल. ह्या विनाशाची कारणे अनेकविध असू शकतात. कोणाला नैसर्गिक जंगले तोडून त्यावर आंबा, काजू, रबर लावायचे असतात. कोणाला लाकूड विक्रीतुन पैसा कमावयचा असतो तर कोणाला बांधकामे करायची असतात किंवा खाणकाम करायचं असतं. पुर्वी केवळ मजुरांच्या सहायाने होत असलेली कामे कित्येकशे पटीने कमी वेळात व कमी मजुरांमध्ये विविध प्रकारची यंत्रे करत असतात. त्यामुळे काम सोपे झाले असले तरी जंगलाच्या विनाशाचा वेग प्रचंड वाढला आहे.

 

आज परिणामी माती वाहून जाऊन ती नदी खाडी पात्रात जमा झालेली आहे. एकदा नदीपात्रे उथळ झाली की पाणी नैसर्गिक नियमाप्रमाणे अन्य कुठे तरी पसरायला जागा शोधतेच. गेल्या दहा वर्षात कोकणात विविध ठिकाणी आलेले पुर आणि किनाऱ्यांची धुप त्याचीच साक्ष देत असतात. इतकेच नव्हे तर अनेक ठिकाणी खाड्यांची पात्रे उथळ झाल्यामुळे गोडे पाणी न थांबल्यामुळे त्याची जागा आज खारे पाणी घेत आहे. परिणामतः अनेक ठिकाणी नदी खाड्यांच्या किनारी असलेल्या विहिरींचे पाणी खारे झाले आहे. त्यामुळे सखल भागात राहूनही पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न खाडीकिनारी राहणाऱ्या लोकांना सहन करावा लागत आहे.

 

गेल्या काही वर्षात कोकणात खुप मोठ्या संकटाला आपल्याला सामोरे जायला लागत आहे ते म्हणजे दरड कोसळणे ह्याला. डोंगराचा एखादा कडा आपल्यासोबत अनेक मोठे छोटे दगड माती घेऊन खाली कोसळतो. अश्या घटनांचे प्रमाण, रस्ते खचण्याचे प्रमाण कोकणात वेगाने वाढत आहे. जिथे दरडी कोसळतात त्याच्या आजुबाजूच्या जमिनीवर त्यावरील विविध प्रकारचे गवत, वृक्ष, वनस्पतींचे आच्छादन सर्वप्रथम नष्ट होत असते. एकदा त्यातील माती वाहून जायला लागली व त्या दगडांना धरू्न ठेवणारा घटक कमकुवत झाला की दरड खाली येण्यास वेळ लागत नाही. रस्ता खचतानाही असंच काहीसं होत असतं. त्यासाठी महत्वाचा उपाय म्हणजे सर्व तीव्र स्वरूपाच्या डोंगर उतारांवर मग ती जमीन खाजगी असो किंवा शासकीय, गवत व अन्य वनस्पतींचे सजीव स्वरूपाचे आच्छादन ठेवणे बंधनकारक ठेवले पाहीजे.

 

गेल्या काही वर्षांत कोकणातील अनेक शहरांमध्ये पुराची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न झाले आणि होत आहेत. ह्यात शासकीय तसेच सामाजिक स्तरावर लोक काम करताना दिसतात. रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर ज्या गावांना पुराचा फटका दरवर्षी बसतो अश्या चिपळूण, खेड, राजापुर, संगमेश्वर ह्या शहरांबरोबरच साखरपा, देवरुख अश्याही काही शहरांमध्ये नद्यांमधील गाळ काढण्याचे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले दिसतात. साखरपा शहरात ह्या कामात आपला मोठा सहभाग देणाऱ्या सौ. मुग्धा सरदेशपांडे सांगतात की, काजळी नदीवर गावकऱ्यांच्या प्रयत्नाने तेथील गाळ काढण्याचे काम झाले परंतु ज्या आजुबाजुच्या प्रदेशातुन ह्या नदीचा प्रवाह येतो तेथे त्यासोबत येणारी माती थांबवणे व नदी गाळाने भरणे थांबवणे हे महत्वाचे आहे. प्रचंड भौगोलिक क्षेत्रांवर पसरलेल्या सह्याद्रीच्या डोंगर उतारांचे संरक्षण व एवढे खुप मोठ्या लोकवस्तीला त्याचे महत्व पटणे हे खुपच मोठे आव्हानात्मक काम आहेत.

=========================================================

हि लेखमाला मी पुर्वी एका रेडिओ कार्यक्रमासाठी लिहिली होती. आता सोशल मिडीयावर शेअर करतोय. मुळ नावासह शेअर करायला हरकत नाही.

-    सचिन पटवर्धन

माझा ब्लॉग: spaceforexpressions.blogspot.com

Comments

Unknown said…
Sachin, Great information....

Popular posts from this blog

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी

ध्वनीक्षेपकांचा उन्माद