मातीचे महत्व
आपल्या मराठी भाषेत माती खाल्ली हा वाक्प्रचार लोकप्रिय आहे. एखादी व्यक्ती अतिशय चांगल्या पध्दतीने पुढे जात असेल आणि त्यानी अशी काही घोडचूक केली आणि त्याच्या होत असणाऱ्या प्रगतीला खीळ बसली तर त्या परिस्थितीत हा वाक्प्रचार वापरला जात असतो. म्हणजे नेहमीचे चांगले जेवण जेवायच्याऐवजी माती खाल्ली असं त्यामध्ये अभिप्रेत असतं. परंतु आपण जे जेवण जेवतो ते खऱ्या अर्थाने पाहिलं तर खऱ्याखुऱ्या मातीतुनच उत्पन्न होत असतं हे आपण त्यावेळी विसरलेलो असतो. ह्या वाक्प्रचाराच्यामध्ये असलेला तात्कालिक उपहास सोडला तर खरंच आपण आपल्या मातीला विसरत आहोत का हा प्रश्न सध्याच्या काळात प्रत्येकाने स्वतःला विचारणं आता आवश्यक झालं आहे.
आपण दररोज जे जेवतो ते अन्नधान्य, भाजीपाला, दुधदुभतं इतकंच
नव्हे तर सर्व मांसाहारी पदार्थांचं मुळ मातीमध्येच आहे. त्यामुळेच आपल्या
साहित्यात, कथा, कविता आणि लोकगीतांमध्ये आपण ह्या मातीला आई म्हणून संबोधतो. अशी
घट्ट भावनिक वीण ज्या मातीशी आपली बांधली गेली आहे ती माती बनण्याची प्रक्रीया
आपल्या पृथ्वीवर गेली काही लाख वर्षे चालू आहे. वारा, ऊन, पाणी ह्या विविध
घटकांच्या प्रभावामुळे दगडांची झीज होते आणि माती बनते. अश्या रौद्र परिस्थितीत
तयार झालेल्या मातीमध्येच ही पृथ्वीवरची सजीव सृष्टी कशी बहरली आहे हे आपण आपल्या
शाळेच्या पुस्तकामध्ये शिकलेलो असतो. परंतु एकदा शाळा शिकून बाहेर पडले की
बहुसंख्य लोक मातीचे हे बहुमोल विसरून जातात.
निव्वळ आपल्या कोकणातीलच नव्हे तर जगाचा जरी विचार केला तरी
अजुनही बहुतांश शेती ही मातीतच होते. आणि ह्या शेतीतील ९० टक्के शेती पावसावर
अवलंबून आहे. हे पावसावर अवलंबून असणे म्हणजे एक प्रकारे मातीवर अवलंबून असणेच
असते कारण जे पावसाचे पाणी शेतातील माती धरून ठेवते तेच पिके वापरत असतात त्यामुळे
शेतीसाठी पाणी हे जसे समीकरण आहे तसेच दुसरे समीकरण पाण्यासाठी माती असेही आहे असे
म्हणायला पाहिजे.
तर बहुमोल अशी हि माती जर जमिनीवरून घालवून द्यायची असेल तर
निव्वळ काही दिवस पुरेसे ठरू शकतात. एखादा पुर, अतिपावसाचा दिवस, वादळ सुध्दा ही
माती आपल्याबरोबर वाहून नेऊ शकतो. इतकेच काय शेकडो वर्षे एखाद्या शेतात जपलेला सुपीक
मातीचा थर मोठमोठ्या यंत्रसामग्रीने काढून टाकायचा म्हटला तर काही तास पुरेसे
असतात हे आपण आधुनिक काळात नित्य पाहतच असतो. सध्या मातीची धुप हा खुप मोठा केवळ
स्थानिकच नव्हे तर जागतिक पातळीवरील प्रश्न बनला आहे. युनायटेड नेशन्सच्या एका
अहवालानुसार मातीच्या अश्या विविध कारणामुळे होणाऱ्या विनाशामुळे संपुर्ण जगात
साधारण ३२० कोटी लोक बाधित होत असतात.
माती वाहून जाण्यामुळेच आपले नुकसान होते असे नाही तर
मातीमध्ये असलेले सजीव व निर्जीव घटकांनाही विविध कारणांमुळे हानी पोचत असते आणि
त्याचा परिणाम अखेर मानवी जीवनावर होत असतो. आपल्याला नुसत्या डोळ्यांनी वरवर
दिसणारी माती म्हणजे निव्वळ दगडांची भुकटी नसते तर तो एक सजीव सृष्टीचा एक पाया
असतो हे आपण परत परत लक्षात घेतले पाहिजे. एक चमचाभर मातीमध्ये १० ते १०० कोटी
बॅक्टेरिया असू शकतात. हे बॅक्टेरीया जेंव्हा जिवंत व कार्यरत असतात तेंव्हा
त्यावर वाढणाऱ्या वनस्पतींच्या पोषणासाठीही मदत करत असतात. मातीमध्ये वनस्पतींना
लागणारी कितीही अन्नद्रव्ये खनिज स्वरूपात असली तरी जोपर्यंत ती वनस्पती शोषुन घेऊ
शकतील अश्या स्वरूपात उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत त्यांचा वनस्पतींना उपयोग होत
नसतो.
शेतीमध्ये होत असलेल्या रासायनिक खते व औषधांच्या
अतिवापरामुळे व मातीमध्ये असलेले सेंद्रीय कर्ब नष्ट होण्यामुळे ह्या जीवाणूंच्या
संख्येवर तसेच कार्यक्षमतेवर परिणाम होता आणि अंततः वनस्पतींच्या पोषणावरही
दुष्परिणाम होत असतात. ह्या कारणामुळेच सध्या आपल्या अन्नधान्यातील खनिजद्रव्ये व
जीवनसत्वांचे नैसर्गिक प्रमाण कमी झाले आहे. असे म्हणतात की पुर्वी एका संत्र्यामधून
जेवढे खनिज व जीवनसत्वे मिळत होती तेवढी आताच्या काळात एखाद्या व्यक्तीला
संत्र्यातून मिळवायची झाली तर सहापट संत्री खावी लागतील.
आपला भारत देश अजुनही कुपोषणाच्या समस्येनी ग्रस्त आहे. पाच
वर्षांखालील मुलांमध्ये अद्यापही जीवनसत्व अ, फोलिक अॅसिड ह्या बरोबर लोह, जस्त
आणि आयोडीन ह्या खनिजद्रव्यांची कमतरतेमुळे येणाऱ्या विविध आरोग्य समस्यांचा सामना
करावा लागतो. औषधी गोळ्या व सप्लिमेंट हा त्यावर कायमस्वरूपी उपाय होऊ शकत नाही.
त्यासाठी आपल्या दररोजच्या आहारात योग्य पोषक घटकांचे प्रमाण वाढवावे लागेल.
त्यासाठी आपण खात असलेले धान्य, भाजीपाला ह्याचे पोषणमुल्य चांगले कसे ठेवता येईल
हे पाहिले पाहिजे. आणि हे पोषण मुल्य जर वाढवायचे असेल तर ज्या जमिनीमध्ये ही पिके
घेतली जातात त्या जमिनी कश्याप्रकारे सशक्त करता येतील ते पाहिले पाहिजे.
शेतीमध्ये नैसर्गिक चक्र सुस्थापित करणाऱ्या विविध पध्दती तसेच सेंद्रीय खतांचा
वापर ह्यामुळे मातीमधील हा बिघडलेला समतोल परत साधायला आपल्याला मदत होईल.
=========================================================
हि लेखमाला मी पुर्वी एका रेडिओ कार्यक्रमासाठी
लिहिली होती. आता सोशल मिडीयावर शेअर करतोय. मुळ नावासह शेअर करायला हरकत नाही.
- सचिन पटवर्धन
माझा ब्लॉग: spaceforexpressions.blogspot.com
Comments
खूपच छान आणि मार्मिक व वास्तववादी लेख आपण मातीवर लिहिलेला आहे. मातीवर 1960-61 साली हरितक्रांती झाल्यापासून जे आजपर्यंत रासायनिक खते, रासायनिक बियाणं, अत्यन्त भयानक मानवाला दुष्परिणाम कीटकनाशक याच्यामुळे जमिनीचा पोत अत्यंत खालावला आहे म्हणजे सांगायचे झाल्यास जमीन अति बिमार आहे आयसीयू मध्ये आहे याला काढणं खूप गरजेचे आहे नाहीतर महाभयंकर रोगराई कॅन्सर सारखे आजार घरोघरी होतील आपल्या लेखाच्या निमित्ताने माती विषयी प्रेम जागृत झाले.
तर याचं उत्तर मी 'नाही' म्हणून असे देईन. मी गेली 10 वर्षे भु-सूक्ष्मजीव शास्त्राचा म्हणजेच जमिनीच्या सुपिकतेचा अभ्यास करतो आहे. स्वतः शेतात काम करतो आहे. रासायनिक खतांचा अचूक व प्रमाणबद्ध वापर करून शेती उत्तमरीत्या पिकवत आहे. त्याचप्रमाणे जमिनीची उत्पादकता सुद्धा वाढवत आहे.
रासायनिक खतांमुळे जमिनी खराब झाल्या या एकाच गोष्टीकडे सर्वजण बोट दाखवून रासायनिक खते किती वाईट आहेत म्हणून ती वापरू नका असे म्हणून रासायनिक खते बदनाम होत आहेत. नीट खोलात जाऊन विचार केला तर जमिनी कशामुळे खराब झाल्या याचं उत्तर मिळेल.
जमिनीची आडवी-उभी, खोलवर नांगरट करणे, भातशेती साठी करावी लागणारी चिखळणी, त्यासाठी वापरावे लागणारे ट्रॅक्टर, पॉवर टिलर सारख्या अवजड मशिन्स यांच्या अत्याचारामुळे जमिनीची सातत्याने धूप होत आहे. याविषयाकडे गांभीर्याने पाहणारे कोणी नाही. हा विचार सुद्धा आपल्या मनात येत नाही. नांगरणी म्हणजे काय तर शेतीची उत्तम मशागत. नांगरणी कशी फायदेशीर याचं शास्त्र आपण शेतकऱ्यांसमोर मांडलेत. परंतु नांगरणी मुळे नुकसान किती होतं याचा साधा उल्लेख सुद्धा कुठे होत नाही. दरवर्षी आपण भातशेती साठी नांगरणी चिखळणी करतो पण आपल्या शेतातून किती सुपीक माती चिखलाच्या स्वरूपात वाहून दवडतो याचा कधी आपण विचार केला आहे का? यासाठी यावर्षी मी ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील 5 तालुक्यात भातशेती च्या हंगामात 100 ठिकाणाहून चिखळणी मुळे वाहून जाणाऱ्या मातीचे नमुने जमा केले. त्यांच्याविषयी ची माहिती सोबत जोडली आहे. ते जरूर पाहावे. याचा निष्कर्ष मी इथे मांडत आहे.
चिखळणी साठी वापरली जाणारी औजारे व त्यांची प्रत्येकी जमा केलेली नमुने खालील प्रमाणे :
1. ट्रॅक्टर (53)
2. पॉवर टिलर (20)
3. लाकडी बैलाचा नांगर (23)
सदर प्रयोगातून असे निष्कर्ष निघाले की,
ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखळणी केली असता 15.21%
पॉवर टिलर 14.13%
लाकडी बैलाच्या नांगराने 3.31% मातीची धूप होते.
आज मी आपल्या समोर नांगरणीचे दुष्परिणाम मांडणार आहे..
जमिनीची सुपीकता ही जमिनीत असणाऱ्या सुक्ष्मजीवाणूंवर अवलंबून असते. हे शास्त्र आहे. नांगरणीमुळे सुक्ष्मजीवाणूंवर अत्याचार होतो त्यांचे आयुष्य संपुष्टात येते.
जसे सुक्ष्मजीवाणू आहे तसेच गांडूळ सुद्धा नांगरणीमुळे नष्ट होतात. जे आहेत ते आपण घालवून बसतो आणि ते पुन्हा आणण्यासाठी शेतकऱ्याला बाहेरून विकत व मेहनत करून शेणखत आणि गांडूळ खत टाकायची वेळ येते.
भातशेती साठी फक्त नांगरणीच नाही तर चिखळणी सुध्दा करावी लागते. पूर्वी लाकडी नांगर होते आता लोखंडी नांगर आले.
लाकडी नांगराने 2 ते 3 इंच जमीन नांगरली जायची त्यामुळे धूप होण्याचे प्रमाण त्यामानाने कमी होते. परंतु लोखंडी नांगराने जमिनीची फूटभर नांगरणी केली जाते. चिखल करण्यासाठी सुध्दा पॉवर टिलर सारखी मशीन आणून जमिनीचा नुसता लगदा केला जातो. ही सगळी प्रक्रिया अति पाऊस असतानाच केली जाते त्यामुळे जमिनीची प्रचंड प्रमाणात धूप होऊन जमिनीत आता खडे राहिले आहेत. आता मला सांगा, जे काही जमिनीत होतं ते आपण नांगरणी-चिखळणी ने घालवून बसलो. अशा जमिनीत नव्याने लावलेले पीक जास्त खताची मागणी करणार नाही तर काय करणार. "आडात असेल तर पोहऱ्यात येईल" जमिनीत सेंद्रिय पदार्थ आपण ठेवतच नाही तर ती जमीन उपजाऊ कशी काय होणार?
या विचाराकडे आपण सर्वांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. असलेली सर्व अन्नद्रव्ये व जीवणूसृष्टी आपण नांगरणी-चिखळणी मधून सुपीक माती शेताबाहेर वाहून दवडल्यावर बाहेरून रासायनिक खतांचा मारा करावाच लागेल. आपण मूळ प्रश्नाचं उत्तर शोधायचं टाकून रासायनिक खतांना बदनाम करून टाकलं. नुसते रासायनिक खते वाईट म्हणून चालणार नाही. त्यांचा अचूक व प्रमाणबद्ध वापर हाच शेतीला या काळात शाश्वत ठेवेल. नाहीतर भारताच्या शेतकऱ्यांची श्री लंकेच्या शेतकऱ्यांसारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही.
रासायनिक खतांवरील आलेली बंदी ही श्री लंकेच्या अधोगतीला कारणीभूत ठरली हे आपण उघड डोळ्यांनी पाहतो आहे.
मातीचे पुनरुज्जीवन हा एक महत्त्वाचा विषय आपण तातडीने हाताळला पाहिजे. जमीन नांगरणी करणे थांबले पाहिजे. शुन्य मशागत (Saguna Regenerative Technique) यांसारख्या शेती पध्दतीने हे शक्य आहे.
https://youtu.be/E__2-w6DI5w
जमिनीमध्ये अगोदरच्या पिकाचे अवशेष जागेलाच कुजले पाहिजे. जमिनीच्या सुपिकतेसाठी जमिनीत कुजण्याची प्रक्रिया होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे एकाच प्रकारची पिके सातत्याने न घेता पिकांची फेरपालट या गोष्टी सुध्दा जमिनीच्या सुपिकतेमध्ये महत्वाचे आहे.
अनिल निवळकर
शून्य मशागत शेती अभ्यासक
7788720272
anilnivalkar123@gmail.com
छान मुद्देसुद विश्लेषण व अनुभवाचे बोल मांडले आहेत .