माती आणि पाणी
मराठी भाषेत पाणलोट हा शब्द आता सर्वांनाच माहितीचा आहे.
डोंगरमाथ्यावर पडणारे पावसाचे पाणी हे छोट्या ओघळींमधून नाल्यांमध्ये आणि त्यातून
नद्यांमध्ये वाहत येते आणि सरतेशेवटी समुद्राला मिळते. ह्या सर्व पाण्याच्या
प्रवासाला पाणलोट असं म्हणतात. ज्या क्षेत्रातुन हे पाणी वाहत जाते ते पाणलोट
क्षेत्र. ह्या क्षेत्राच्या व्यवस्थापनाचं एक लोकप्रिय सुत्र आहे ते म्हणजे
धावत्या पाण्याला चालायला शिकवायचं आणि चालत्या पाण्याला थांबायला शिकवायचं. परंतु
अनेक ठिकाणी पाणलोट क्षेत्राचे प्रयत्न आपल्याला अयशस्वी झालेले दिसतात. अनेक
प्रकारचे बंधारे बांधून, तळी बांधूनही पाण्याचे दुर्भिक्ष संपलेले दिसत नाही. काही
ठिकाणी सुरुवातीच्या वर्षांमध्ये पाण्याची उपलब्धता वाढते आणि काळ पुढे सरकतो तसे
हे बंधारे आणि तलाव गाळाने भरून जातात आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहात ते तुटून
तरी जातात किंवा त्यामध्ये पाण्याची जागा प्रवाहासोबत येणाऱ्या गाळानी घेतल्यामुळे
त्याची पाणी साठवण्याची क्षमता कमी होऊन जातो.
पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचं दुसरं महत्वाचं सुत्र म्हणजे
माथा ते पायथा हया क्रमाने काम करणे. पाणलोट क्षेत्रातील काम परिणामकारक न
होण्यामागे सर्वत्र हा क्रम चुकल्याचे बऱ्याच ठिकाणी दिसून येते. डोंगर उतारावर
असलेल्या जमिनीमध्ये सलग समतल चर, शेतजमिनींची बांध बदिस्ती, जमिनींवर पडणाऱ्या
घळींचे नियंत्रण अशी अनेक कामे सर्वप्रथम केली जातात. ह्याचा प्रमुख उद्देश
पाणलोटाच्या वरच्या भागांमध्ये असलेल्या मातीची सर्वप्रथम धुप थांबवणे हा असतो.
वृक्ष लागवड, गवताचे संवर्धन ह्यामुळेही जमिन ही सजीव पध्दतीने झाकली जाते आणि
पावसाच्या माऱ्यामुळे जमिनीची धुप होण्याचे प्रमाण कमी होते.
एकदा अश्या विविध पध्दतीने माती वाचवली कि पावसाचे पाणी
अर्थातच सर्वप्रथम ह्या मातीमध्ये शोषले जाते आणि सहजपणे वाहून जात नाही. चालणारे
पाणी थांबते ते ह्याच सुरूवातीच्या टप्प्यात. हे थांबलेले पाणी हळूहळू जमिनीत मुरत
जाते आणि जमिनीखालील मुरुमाच्या व खडकांमधील जागेत शोषले जाते आणि हळूहळू
जमिनीखाली साठवले जाते. हेच नंतर झऱ्यांच्या स्वरूपात उताराच्या खालच्या टप्प्यात
परत बाहेर येते. जिथे असा मातीचा थर अतिशय उथळ असतो किंवा अजिबात नसतो तेथे हे
पाणी जमिनीवर न थांबता पुढे निघून जाते आणि अर्थातच जमिनीमध्ये मुरत नाही. जिथे
असे होते तिथे आपल्याला दिसते की झरे, विहीरी पाऊस संपल्यावर लवकरच आटून जातात.
मराठवाड्यातील जालना शहरापासून केवळ १८ किलोमीटर अंतरावर
कडवंची हे गाव आहे. ह्या गावामध्ये पाणलोट क्षेत्र विकासाचे काम २००१ साली पुर्ण
झाले. मराठवाडा विभागातील दुष्काळ सर्वांना परिचित आहे. ह्या भागात सरासरी फक्त
४०० मिमी पाऊस पडतो. २०१२ साली येथे फक्त १८२ मिमी पाऊस पडला होता तरिही ह्या
गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर नेण्याची गरज पडली नाहीच आणि येथील
फळबागांनाही आवश्यक तेवढे पाणी उपलब्ध होते. ह्या कामात ज्यांनी पुढाकार घेतला
त्या विजयअण्णा बोराडे यांचा पाणलोट क्षेत्र विकासामधील सुक्ष्म अभ्यास फार उपयोगी
आहे. कडवंची गावाच्या पाणलोटाच्या यशस्वीतेचे खरे गमक ह्या भागात झालेल्या मातीसंरक्षणाला
ते देतात. ह्या मातीसंरक्षणामुळे शेतामध्ये मूळ ठिकाणी पाण्याचे संवर्धन झा्ले
तसेच नदी व नाल्यांमध्येही अनावश्यक गाळ न जमा झाल्यामुळे बंधाऱ्यांच्या
बांधकामाला कुठलाही धक्का लागत नाही.
जलसंपदा विभागाच्या एका अहवालानुसार महाराष्ट्र राज्यातील
धरणांच्या साठवण क्षमतेच्या १५% पर्यंत जागा गाळाने व्यापलेली आहे याचाच अर्थ ह्या
धरणांमध्ये येणारे पाणी आपल्याबरोबर लक्षावधी हेक्टर जमिनीवर सुपीक माती घेऊन
आलेली आहे. ही माती वाहून गेल्यामुळे शेतीचे आणि पर्यावरणाचे नुकसान तर झाले आहेच
परंतु धरणांची पाणी साठवण क्षमता कमी होऊन सिंचनासाठी व अन्य सर्व वापरासाठी
पाण्याची उपलब्धताही कमी झालेली आहे. हि एक समस्या जरी आपण पाहिली तरी महाराष्ट्र
राज्यासाठी मृद्संधारण हा किती अतिमहत्वाचा मुद्दा आहे हे आपल्या लक्षात येऊ शकेल.
हि समस्या केवळ राज्य पातळीवरच आहे का तर नाही ही खरंतर एक
जागतिक पातळीवरील समस्या आहे असेच म्हणावे लागेल अशी परिस्थिती आहे. युनायटेड
नेशन्सच्या अन्न आणि कृषि संस्थेने केलेल्या एका प्रदीर्घ अभ्यासात असे सिध्द झाले
आहे कि दर सेकंदाला आपल्या जगातील अर्धा एकर क्षेत्रावरील माती वाहून जात असते आणि
जगात एकूण ३२० कोटी लोक हे जमीन निकृष्ट होण्याच्या समस्येमुळे बाधित आहेत. माती
वाहून जाण्यामुळे अनेक ठिकाणी शेती उत्पादकता कमी होत आहे, पाण्याची उपलब्धता कमी
होत आहे. परिणामी आर्थिक उत्पन्नावरही परिणाम होत आहे. सध्याच्या आंतरराष्ट्रीय
राजकारणातही त्यामुळे अन्नधान्य पुरवठा व पाण्याची वाटणी हे मुद्दे कळीचे झालेले
दिसतात ते त्यामुळेच. मित्रांनो म्हणूनच म्हणावेसे वाटते की माती वाचवा जग वाचवा.
=========================================================
हि लेखमाला मी पुर्वी एका रेडिओ कार्यक्रमासाठी
लिहिली होती. आता सोशल मिडीयावर शेअर करतोय. मुळ नावासह शेअर करायला हरकत नाही.
- सचिन पटवर्धन
माझा ब्लॉग: spaceforexpressions.blogspot.com
Comments
👌👌👌