ग्रामीण भागातील कचरा समस्या- ४
काही वर्षांपुर्वी दिल्ली विमानतळावर मी बसलो होतो. माझ्यासमोर आई, वडील व त्यांची तरूण मुलगी असे एक जपानी कुटूंब बसले होते. जवळच काही अंतरावर कचऱ्यासाठी एक मोठा स्टिलचा डबा ठेवला होता. तिथे काही लोक येता जाता हातातला कचरा टाकत होते. त्या जपानी कुटूंबाचे डिस्पोझेबल डिशमधून जेवण चालू होते ते संपल्यावर एकेक जण उठून कचऱ्याच्या डब्याजवळ जाऊन टाकून येत होता पण त्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ लागत असल्याचे माझ्या निरीक्षणात आले म्हणून मी जवळ जाऊन त्यांचे नेमके काय चालू आहे ते बघितले. ते लोक डिशमधील सर्व उष्टे व्यवस्थित एकत्र करून ओल्या कचऱ्याच्या भागात टाकत होते आणि बरोबरच्या खाद्यपदार्थांचे रॅपर, पाऊचच्या आतमध्ये चिकटलेले कणही वेगळे करून टाकत होते. त्यांचे झाल्यानंतर मी कचऱ्याच्या डब्यात बघितले तर प्रत्यक्षात तिथे ओल्या व सुक्या कचऱ्याचे जरी दोन भाग असले तरी दोन्ही भागात मिश्र कचराच दिसत होता. मी न राहवून त्या जपानी माणसाला विचारलं कि त्या डब्यात बाकीच्या लोकांनी कचरा वेगळा न करता तसाच टाकला आहे तर तुम्ही तो स्वतंत्र करून का टाकलात. त्याने मला उत्तर दिलं की एक तर आमच्या देशात आम्ही हे नियम कडकपणे पाळतो आणि अख्ख्या जगाने ते पाळावेत असे आम्हा बहुतांश जपानी जनतेला वाटते. मी इथे येऊन तुम्हाला तुम्ही काय करावं त्याचे सल्ले देऊ शकत नाही पण किमान तुमच्याच व्यवस्थेचे नियम व्यवस्थित पाळू शकतो आणि मी तेवढंच करत आहे.
आपल्या देशातले आपलेच नियम आपण पाळायला टाळाटाळ करतो आणि त्यायोगे समस्या
निर्माण झाल्या की बऱ्याच वेळा शासनाला दोष देउन मोकळे होत असतो. माणूस हा सवयीचा
गुलाम आहे असं म्हणतात पण सवयी जश्या वाईट असू शकतात तश्या चांगल्याही असू शकतात.
रस्त्यावर दुचाकी चालवताना हेल्मेट डोक्यावर घालणे आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने
महत्वाचे असते परंतु बरेचजण अजुनही हेल्मेट न घालता दुचाकी चालवतात आणि रस्त्यात
वाहतुक पोलिस दिसले कि त्यांना चुकवण्याचा प्रयत्न करतात. जर आपण बाहेर पडतानाच
हेल्मेट बरोबर घेण्याची सवय लावली तर आपण रस्त्यावर दुचाकी चालवताना सुरक्षित तर
राहूच परंतु दंड भरण्याची वेळही आपल्यावर येणार नाही. सर्वच जण अश्या प्रकारे
वाहतुकीचे नियम व्यवस्थित पाळायला लागले तर रस्त्यावरचा प्रवास सुरक्षित होईल.
कचरा व्यवस्थापनाचेही तसेच आहे. कचऱ्याचे सुरुवातीलाच वर्गीकरण केले. कचरा
टाकतानाच सेंद्रिय विघटनशील ओला कचरा आणि अविघटनशील कचरा वेगळा जमा केला गेला की
पुढच्या बऱ्याच समस्या आपोआप सुटतात. अश्या कचऱ्याचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग
करणे शक्य होते हे आपण आधीच्या भागात समजून घेतलेच आहे. जर गावातल्या प्रत्येक
शेतकऱ्याने घरगुती सेन्द्रीय कचऱ्यापासून खत बनवायचे ठरवले तर गावांमधली शेतीसाठी
लागणाऱ्या खताची गरज बऱ्याच अंशी भागवली जाऊ शकेल व रासायनिक खतांवर होणार खर्च
वाचेल. आजमितीला असा कचरा निव्वळ प्लास्टीकबरोबर एकत्र होत असल्यामुळे त्याचे खत
बनवणे शक्य होत नाही. तसेच अश्या कचऱ्याच्या भोवती भटके प्राणी, डास वगैरे जमा होत
असल्यामुळे आरोग्याचाही खुप मोठा प्रश्न तयार होतो. आपली एक सवय बदलणे आपल्याला
अश्याप्रकारे खुप मोठा फायदा देऊ शकते.
बऱ्याचवेळा आपल्या मनात प्रश्न येत असतो की एक व्यक्ती म्हणून आपण बदलू शकतो
पण अख्ख्या वस्तीला, गावाला बदलणे कसे शक्य आहे? हा प्रश्न महत्वाचा असला तरी
त्याकडे पाहताना आपल्याला वेगळ्या पध्दतीने विचार करणे गरजेचे आहे. सामाजिक बदल
कधीही एका रात्रीत घडून येत नसतात हे आपल्याला वारंवार इतिहास दाखवून देत आलेला
आहे. महात्मा फुले असोत किंवा लोकमान्य टिळक त्यांच्या कार्याची सुरूवात ही लहानच
स्वरूपात झाली होती असे आपल्याला दिसून येईल. आपल्या जीवनात आवश्यक बदल घडवून
आणायचे असले तर अनेक छोटे छोटे बदलही मोठ्या आमूलाग्र बदलांकडे आपल्याला नेऊ
शकतात. एका सामाजिक शास्त्रज्ञाने एक अशी थिअरी मांडली आहे की जगामध्ये नवीन बदल
घडवून आणणारे लोक फक्त २.५ टक्के असतात आणि असे बदल थोडेसे सुरूवातीला कठीण वाटले
तरी स्वीकारणारे फक्त १० टक्के असतात. अर्थात हे स्वीकारणे आणि एखाद्या गोष्टीच्या
त्या व्यक्तीला वाटणाऱ्या महत्वाशी संबंधित आहे. कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत असे
बदल घडवून आणणाऱ्या काहीजणांबद्दल आपण पुढच्या भागात माहिती पाहू.
=========================================================
हि लेखमाला मी पुर्वी एका रेडिओ कार्यक्रमासाठी लिहिली होती. आता सोशल मिडीयावर शेअर करतोय. मुळ नावासह शेअर करायला हरकत नाही.
- - सचिन पटवर्धन
माझा ब्लॉग: spaceforexpressions.blogspot.com
Comments
आपल्या देशात कायदे आहेत ते फक्त पुस्तकात बंद आहेत.
जनतेनी त्याचे पालन केले तर आपण नक्की कायद्याचे पालन कर्ते होऊ.
खूप छान लेख लिहिला सर जी
💐💐💐💐💐💐