ग्रामीण भागातील कचरा समस्या- १
उंच सह्यकडा आणि अरबी समुद्र ह्यांच्या मधला हिरवाईने नटलेला लाल मातीचा डोंगराळ असा आपला कोकण प्रदेश फार पुर्वीपासून मराठी साहित्यिकांचा फार आवडता विषय आहे. पण हे पुर्वीचं आपलं कोकण आता कधीच बदललंय. पुर्वी बोटींमधून, खाडीतल्या वल्ह्याच्या होड्यांमधून, बैलगाड्यांमधून लांबचे खडतर प्रवास करणारे आपले आजोबा, पणजोबांच्या सगळ्या गोष्टी, अनुभव आता इतिहासजमा झाल्या आहेत.
नारळ पोफळीच्या बागा,
भाताची खाचरे, समुद्राच्या लाटा, पाण्याचे झरे, गावातली निरव शांतता हे मात्र काही
प्रमाणात अजुनही टिकून आहेत. ह्या सर्व गोष्टींचं आकर्षण शहरात स्थायिक झालेल्या
चाकरमान्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनाच नव्हे तर देशभरातल्या अनेक पर्यटकांनाही
खेचून आणत असतं. आता इथला प्रवासही नवीन महामार्गांमुळे आणि रेल्वेमुळे सुकर झालाय.
बरीचशी गावं आता मोबाईलच्या जाळ्याने जोडली गेली आहेत त्यामुळे संपर्क साधणंही खुप
सोपं झालंय. आता मुंबईहुन सहजपणे जवळच फिरून यावं तसं वीकएण्डला, जोडून सुट्ट्या
आल्या की किंवा असंच मनात आलं तरीही रत्नागिरीला जाऊन येता येतं. बऱ्याच शहरी
लोकांनी गावागावात जमिनी विकत घेऊनही सेकंड होम बांधली आहेत. गावांमधली जु्नी
कौलारू देवस्थानंही आता सिमेंट स्लॅबची आधुनिक रंगरंगोटीची बनली आहेत. मागच्या ४०
वर्षापुर्वीच्या काळाशी तुलना केली तर गावातल्या लोकांकडे विविध मार्गाने येत
असलेल्या पैश्याचा ओघ वाढलाय आणि शहर आणि गावांदरम्यान असलेला सांस्कृतिक फरक कमी
होत चाललाय.
वाडीवस्तीवरच्या छोट्या
दुकानांमध्ये आता पुर्वी मिळणाऱ्या चिक्कीबरोबरच चिप्सच्या पाऊचचे रोल टांगलेले
असतात. पोरगं कटकट करायला लागलं तर किंवा कधीकधी कौतुकानेही आईबाप त्याला खाऊसाठी
पैसे देतात. मुलं उत्साहाने ती पाकिटं घेऊन येतात. चिप्स खातात आणि रिकामे पाऊच
कुठेतरी कोपऱ्यात टाकतात. दिवसभरातला घरातला कचरा असा जमा करून मग शहरात जसा
पुर्वी गल्लीच्या कोपऱ्यांवर टाकला जायचा तसा वस्तीपासून थोडासा दूर कुठेतरी टाकला
जातो. प्लास्टीक पिशव्या, पाऊच, घरातल्या समारंभात जमा झालेले डिस्पोझेबल द्रोण,
पत्रावळ्या, मुलांचे डायपर, सॅनिटरी नॅपकीन, घरातलं उष्टं असं बरंच काही ह्या
कचऱ्याच्या ढिगांमध्ये जमा होत असतं.
बऱ्याचश्या मोठ्या
शहरांमध्ये आता कचऱ्याच्या व्यवस्थापनासंबंधी बऱ्यापैकी कडक नियम व व्यवस्था आहेत.
कचरा साठून राहू नये म्हणून घंटागाड्यांची सोय निर्माण केली आहे पण विखुरलेल्या
वस्तीच्या कोकणातल्या गावांमध्ये असले कुठलेच नियम नाहीत आणि व्यवस्थाही नाही.
अश्या सर्व वाड्यांच्या कोपऱ्यावरच्या कचऱ्याच्या ढिगांचं नेमकं काय होतं. कुत्रे,
गाई गुरे, उंदीर, घुशी ह्या कचऱ्याभोवती जमा होतात. हे ढिग विस्कटले जातात. वाऱ्याबरोबर,
वाहत्या पाण्याबरोबर हा कचरा इतस्ततः पसरतो. हा कचरा मग फक्त भटक्याच नव्हे तर
गावामध्ये मुक्त संचार करणाऱ्या पाळीव प्राण्यांच्याही पोटात जातो. गावातले ओहोळ,
नद्यांमध्ये हा कचरा जमा होतो. कोकणातल्या मुसळधार पावसात पाण्याच्या प्रवाहाबरोबर
भातखाचरामध्येही हा कचरा साठू लागतो. आणि खाड्यांच्या आणि समुद्राच्या पुळणीवरही
जमा होतो.
हे झालं वाड्या
वस्त्यांचं पण ग्रामीण भागातून जाणाऱ्या रस्त्यांची, रेल्वेमार्गाची इतकंच काय पण
पाखाड्या आणि पायवाटांची अवस्था फार वेगळी नाही. बहुतांश पांथस्थांना आपल्या बरोबर
असलेला कचरा योग्य ठिकाणी टाकण्याचीही सवय नसते. आज कोकण रेल्वेने किंवा
महामार्गाने येताना हिरव्यागार डोंगरांचे विलोभनीय दृश्य दिसते आणि मन मोहून जाते
परंतु रस्त्याच्या आजुबाजुला खाली नजर गेली की मग मात्र मनाची ही अवस्था फार काळ
टिकत नाही कारण तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा कचरा इतस्ततः पडलेला दिसतो.
ह्याचे परिणाम फक्त अश्या
प्रदुषणापुरतेच मर्यादित नाहीत. अश्या कचऱ्यामुळे ग्रामीण भागातही भटक्या
कुत्र्यांची संख्या वाढली आहे. हे प्राणी माणसांवरही हल्ला करण्याचे प्रमाण वाढले
आहे. काही गावांमध्ये अश्या कुत्र्यांमुळे पारंपरिक अर्धबंदिस्त प्रकारात केले
जाणारे गावठी कोंबडी पालन बंद झाले आहे आणि गावकऱ्यांचे उत्पन्नाचे एक हमखास साधन
संपले आहे. भटक्या जनावरांमुळे बिबट्यासारखे प्राणी मानवी वस्तिमध्ये येण्याचे
प्रमाण वाढले आहे. उंदीर, घुशींना सतत खाद्य मिळत असल्याने त्यांचे प्रजनन वेगात
होऊन घरांना व शेतीला त्यांच्यामुळे होणारे नुकसान वाढले आहे. कचऱ्याच्या
ढिगांमध्ये सतत ओलावा राहत असल्यामुळे डासांची उत्पत्ती होते आणि रोगराईही वाढत
आहे.
Comments
गेले ते दिवस राहिल्या नुसतं त्या जुन्या आठवणी।।
जुने दिवस पुन्हा आणावे लागतील.
या झघमागतेच्या दुनियेत गाव पूर्ण नाहीसे तर होत आहेत ना असं वाटतंय।।
1 नंबर