ग्रामीण भागातील कचरा समस्या- ६

 मावलिन्नॉंग हे मेघालय राज्यातील एक साधारण ५०० लोकवस्ती असलेलं गाव आहे. डोंगराळ भाग आणि सुपारीच्या बागा असं कोकणासारखंच वातावरण असलेल्या ह्या गावात ३० वर्षांपुर्वी काविळीची साथ आली आणि काही गावकऱ्यांचा त्यात मृत्यूही झाला. ह्या घटनेनंतर गावकऱ्यांनी गाव पुर्णतः स्वच्छ करण्याचा वसा घेतला तो कायमचा. गावकऱ्यांनी त्यांच्या सवयी कायमच्या बदलून टाकल्या आहेत. गावात कुठेही उघड्यावर सार्वजनिक जागी कचरा टाकण्यास बंदी आहे. प्लास्टिकचा कोरडा कचरा रस्त्यावर विवक्षित ठिकाणी ठेवलेल्या बांबूच्या कुंड्यांमध्ये जमा केला जातो. घरांच्या आसपासचा पन्नास मीटरपर्यंतचा परिसर गावकरी नियमीत स्वेच्छेने साफ करतात व प्रत्येक घराच्या समोर एक सुंदर बाग केलेली असते. आज हे गाव आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखले जाते आणि अनेक पर्यटक फार दुरून येथे येतात. बऱ्याच घरांमध्ये होमस्टे व घरगुती खानावळी सुरू झाल्या आहेत. पर्यटकांकडूनही गाव स्वच्छ राखले जाईल ह्याची काळजी गावकरी घेतात. आज ह्या स्वच्छतेचा फायदा चांगल्या आरोग्याबरोबर पर्यटनाद्वारे स्थानिक रोजगारनिर्मितीमध्ये झाला आहे.

 

अजुन एक विशेष उदाहरण केरळ राज्यातील मीननगाडी ह्या गावाचे देता येते. वायनाड जिल्ह्यातील हे गाव भात, सुपारी, कॉफी अश्या पिके घेणारे बहुतांश शेतीआधारीत अर्थव्यवस्था असलेले गाव आहे. ह्या हवामान बदलाचे होणारे परिणाम पाहून आपला परिसर कार्बन न्युट्रल म्हणजे जेवढा कार्बन हवेत आपल्या परिसरात सोडला जाईल तेवढा सर्व आपल्या परिसरातच शोषला जाईल ह्या दृष्टिने प्रयत्न करायला सुरूवात केली. वृक्ष लागवड, सेंद्रीय शेती ह्याबरोबरच गावामधले घन कचऱ्याचे व्यवस्थापन हा मुद्दा सुद्धा विशेष लक्ष देऊन सुधारण्यात आला आहे. आज गावामध्ये कचऱ्याच्या घर किंवा मुळ स्थानावर विलगीकरण केल्यानंतर प्लास्टिक एका ठिकाणी जमा करून त्याचा मशीनद्वारे भुगा केला जातो आणि प्लास्टीक वर प्रक्रीया करणाऱ्या कारखान्याला पाठवला जातो. कचरा पुर्णतः कोरडा असल्याने त्यामध्ये काम करणाऱ्यांना धोकादायक, विषारी वायुंना सामोरे जावे लागत नाही व गावातीलच महिलांना ह्या कामामध्ये रोजगार मिळाला आहे.

 

हि झाली काही कोकणासारखा प्रदेश असलेल्या अन्य राज्यांमधील उदाहरणे परंतु आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असे काही काम सर्व समाजाला बरोबर घेऊन चालू आहे का ह्याचा शोध घेत असताना एक उल्लेखनीय उदाहरण सापडले ते एका जिल्हा परिषद शाळेचे.

 

संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे ह्या गावी असलेल्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ ने एक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. ह्या शाळेतील विद्यार्थ्यांची एक संघटना तयार करण्यात आली आहे. ह्या विद्यार्थ्यांनी एक नियम घेतला तो म्हणजे रोजची दहा मिनिटे गावाच्या पर्यावरणासाठी. हा नियम स्वीकारल्यावर एकच छोटा बदल स्वतः मध्ये घडवून आणला तो म्हणजे दररोज शाळेत येताना हे प्राथमिक शाळेतील छोटे हरीत सैनिक रस्त्यातला टाकाऊ प्लास्टिक कचरा गोळा करतात व शाळेत आणतात. तोरणे, माईक, झुंबर अश्या घरात वापरता येतील अश्या वस्तू ह्या कचऱ्यापासून तयार केल्या आहेत.

 

ह्या छोट्या मुलांकडे पाहून गावातील मोठ्या माणसांमध्येही बरेच बदल घडून आले आहेत व गाव स्वच्छ राखण्यासाठी ते विशेष प्रयत्न घेत असतात. गणपती उत्सवादरम्यान तसेच शिमग्याला गावाची वस्ती नेहमीपेक्षा वाढते कारण मुंबईत असलेले चाकरमानी घरी आलेले असतात. वाढलेल्या वस्ती बरोबर अर्थातच कचराही वाढतो. परंतु गावात राहणाऱ्या लोकांचे हे स्वच्छतेचे प्रयत्न बाहेरून येणाऱ्या ह्या लोकांवरही आपसूकच बिंबवले जातात व तेही ह्या मुलांच्या उपक्रमात सहभागी होत असतात.

 

ह्या शाळेच्या प्रयत्नांची दखल शासन स्तरावर घेण्यात आली असून शाळेला तसेच मुलांना विशेष प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनीही शाळेला भेट देऊन गावातील स्वच्छता, कचरा पुनर्वापराचे उपक्रम समजवून घेतले आहेत.

 

शाळेचा हा उपक्रम सुरू करण्यामध्ये पुढाकार घेणारे शिक्षक श्री. पंडीतराव ढवळे सांगतात की फक्त अश्या वस्तू तयार करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये झाले असे नाही तर सर्वात महत्वाचे म्हणजे आपला परिसर स्वच्छ करण्याच व वस्तुंचा पुनर्वापर करण्याची सवय ह्या मुलांमध्ये निर्माण झाली. अशी जाणीव विकसित झालेले विद्यार्थी जेंव्हा मोठे होतील तेंव्हा अर्थातच स्वच्छतेची, पर्यावरणाबद्दल जाणीव असलेला एक चांगला समाज घटक बनण्याकडे त्यांची वाटचाल झालेली असेल.

=========================================================

हि लेखमाला मी पुर्वी एका रेडिओ कार्यक्रमासाठी लिहिली होती. आता सोशल मिडीयावर शेअर करतोय. मुळ नावासह शेअर करायला हरकत नाही.

-    सचिन पटवर्धन

माझा ब्लॉग: spaceforexpressions.blogspot.com

 

Comments

Pratiksha said…
खूप छान लेखमाला
सचिन पटवर्धन सर तुम्ही खूप लेख छान लिहिलेत व जनजागृती आपल्या लेखा मधून झाली.
लोकानी पुढे येऊन कचऱ्याचे व्यवस्थापण करणे गरजेचे आहे.
💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌
Vineel said…
कचरा व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करण्याचे प्रयत्न जिथे जिथे होत आहेत, त्यांना योग्य ती प्रसिद्धी आणि प्रसार देणे आवश्यक आहे. या लेखात उल्लेख केलेली उदाहरणे प्रेरणादायक आहेत. धन्यवाद!

Popular posts from this blog

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी

ध्वनीक्षेपकांचा उन्माद