ग्रामीण भागातील कचरा समस्या- ५

दापोली शहरात श्री प्रशांत परांजपे हे कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात बरेच वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या निवेदिता प्रतिष्ठान ह्या संस्थेतर्फे कचऱ्याच्या समस्येवर अनेक नावीन्यपूर्ण उपाय प्रचलित केले आहेत. त्यांच्याशी चर्चा करताना अनेक नविन कार्यपध्दतीविषयी समजते. कोकणाच्या परिस्थितीत काय केले पाहिजे त्याच्याबद्दल ते उपायही सुचवतात.

 

त्यांनी असे अनुभवले आहे की दापोली सारख्या शहरात जर ५० लोकांनी सलग ३० मिनिटे फक्त ५०० मीटरच्या परिघातील इतस्ततः पसरलेला कचरा जमा केला तर १५ पोती प्लास्टिक जमा होते. त्यांचे असे गणित आहे की एखाद्या गावाने ठरवले व सर्व लोकांनी सहभाग दिला तर ते गाव फक्त तीन महिन्यात पूर्ण स्वच्छ होऊ शकते. कोकणाच्या विखुरलेल्या वस्तीच्या परिस्थितीत एखादी वाडी वस्तीही स्वतःसाठी हे चॅलेंज घेऊ शकते. एखाद्या वस्तीने श्रमदानाने परिसर स्वच्छ करायचा ठरवला तर इतक्या कमी वेळात स्वच्छता करणे शक्य आहे. आफ्रिकेतील रवांडा ह्या एकेकाळी वांशिक युध्दाने ग्रासलेल्या देशात आज प्रत्येक नागरीकाला दर रविवारी दोन तास देशाच्या स्वच्छतेसाठी काम करणे सक्तीचे असते. एकदा ह्या सक्तीचे चांगले परिणाम लक्षात आल्यानंतर ह्या देशाचे बहुसंख्य नागरीक हे काम आता स्वेच्छेने करत असतात. हा देश त्यामुळे एका वर्षातच आफ्रिकेतील सर्वात स्वच्छ देश म्हणून नावाजला गेला आहे.

 

श्री. परांजपे ह्यांनी जालगाव, ता. दापोली येथील श्री सिध्दिविनायक सोसायटी ह्या वसाहतीमध्ये लोकांच्या सहायाने एक प्रयोग केला. ह्या वसाहतीतील सर्व बावीस घरांमध्ये जमा होणारा ओला घरगुती कचरा एकत्र करून त्याचे स्वतःकडे खत बनवले. ह्या खतावर सध्या ह्या सर्व बावीस घरांना पु्रून अधिक विक्रीही करता येईल इतके भाजीपाल्याचे उत्पादन अन्य कुठल्याही अधिक निविष्ठा न वापरता व पुर्णतः सेंद्रीय पध्दतीने घेणे त्यांनी शक्य करून दाखवले आहे. तसेच ह्यामध्ये मातीविरहीत शेतीचेही प्रयोग यशस्वी झाले आहेत. सध्या वसाहतीच्या सांडपाण्याच्या पुनर्वापराबाबत काम चालू आहे. एक कचरामुक्त सोसायटी बनावी म्हणून ह्या वस्तीची वाटचाल चालू आहे. रत्नागिरीच्या किनारी परिसरात सड्यावर जिथे मातीची कमतरता असते तेथे हे प्रयोग उपयोगी व अनुकरणीय ठरतील हे निश्चित.

 

ओल्या कचऱ्याचे स्थानिक पातळीवर सहज खत बनवून पुनर्वापर करता येतो. तसे अन्य कचऱ्याचे होत नाही. त्यासाठीच्या प्रक्रीया थोड्या क्लिष्ट असतात व त्यासाठी व्यवस्थापन व्यवस्थित लागते. पुणे तसेच अन्य काही शहरात प्लास्टिक कचऱ्यापासून चांगल्या प्रतिचे इंधन बनवण्याचे प्रकल्प आहेत. सध्या दापोली तसेच रायगड जिल्ह्यातील काही नागरी भागातून गोळा केलेला सुका प्लास्टिक कचरा एकत्र करून पुण्याच्या अश्या प्रकल्पांमध्ये पाठवण्याचे काम निवेदिता प्रतिष्ठान त्यांच्या स्वतःच्या अखत्यारीमध्ये छोट्या प्रमाणात करत आहे परंतु हे काम स्थानिक पातळीवर करणे सहज शक्य आहे असे श्री. परांजपे सांगतात. सध्या साधारण १०-१२००० वस्तीसाठी असा छोटा प्रकल्प साधारण १५ लाख रुपयांच्या भांडवलामध्ये उभारता येतो. त्यामुळे ग्रामपंचायती, नगर पंचायती तसेच विविध नागरीक संस्थांनी त्यामध्ये पुढाकार घेतला तर हे काम सहज शक्य आहे असे मत श्री. परांजपे व्यक्त करतात. दापोली तालुक्यातील कोळथरे ह्या छोट्या गावानेही प्लास्टिक कचऱ्याचे एकत्रिकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याचे वेगळे मॉडेल तयार केले आहे. त्यांनी एका स्थानिक रिसॉर्टमध्ये प्लास्टिक गॅसिफायर बसवून त्याची लागणारी उर्जेची गरज भागवली आहे व ग्रामपंचायतीला कचरा जमा करण्याचा खर्चही कमी येत आहे.

 

ओल्या व प्लास्टिकच्या कचऱ्याचा असा पुनर्वापर केल्यानंतर बराचसा प्रश्न मिटू शकतो. काच, कागद, धातू जर व्यवस्थित वेगळे ठेवले तर सध्याचे भंगार व्यावसायिक ते विकत घेत असतात. एक नवीन प्रश्न सध्या निर्माण होत आहे तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचा. जुने नादुरूस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू बऱ्याच वेळा त्यातल्या गुंतागुंतीच्या रचनेमुळे दुरूस्त करून किंवा त्याचे भाग सुटे करून वापरता येत नाहीत व फेकून द्याव्या लागतात. तसेच नवनवीन मॉडेल येत असल्याने बऱ्याच वेळा ह्या वस्तू काम करत असल्या तरी लवकर कालबाह्य होताना दिसतात. मोबाईल, कॉम्प्युटर, टिव्हि इ वस्तूंचा कचरा त्यातील विविध विषारी घटकांमुळे घातक असतो व त्याची विल्हेवात शास्त्रीय पध्दतीने लावणे महत्वाचे असते. हे गावांमध्ये व छोट्या शहरांमध्ये शक्य होतेच असे नाही. अश्या कचऱ्याची विल्हेवाट लावणारी केंद्रे मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये अस्तित्वात आहेत व तेथे हा कचरा देणे इष्ट असते. रत्नागिरीत गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे अश्या कचऱ्याचे संकलन वर्षातुन तीन वेळा केले जात असते.

 

जाता जाता हे आवर्जून नमूद करावेसे वाटते की आपल्याकडे ग्रामीण भागात स्वच्छतेवर बराच भर देण्यात आला आहे व विविध स्पर्धा, योजनांद्वारे ग्रामीण भागात स्वच्छता, सौंदर्य ह्याबाबतीत बराच बदल घडून आला आहे परंतु ह्यातले बरेच बदल हे वरवरचे ठरतात कारण ह्यातला कचऱ्याचे व्यवस्थापन हा मुद्दा बहुतांश बाजूला राहिला आहे. कचऱ्याकडे जोपर्यंत आपण एक वाया जाणारा मौल्यवान घटक म्हणून बघत नाही आणि त्याचा योग्य पुनर्वापर करत नाहीत तोपर्यंत सर्वत्र ही समस्या अशीच राहणार. तसेच एकंदरीत लोक व स्थानिक नेतृत्व त्या विषयामध्ये विशेष रस घेऊन काम करत नसल्याने विविध शासकीय योजनांद्वारे कचरा व्यवस्थापनासाठी निधी मिळूनही मूळ समस्येचे समाधान होताना अभावानेच दिसते असे श्री. परांजपे म्हणतात.

=========================================================

हि लेखमाला मी पुर्वी एका रेडिओ कार्यक्रमासाठी लिहिली होती. आता सोशल मिडीयावर शेअर करतोय. मुळ नावासह शेअर करायला हरकत नाही.

-    सचिन पटवर्धन

माझा ब्लॉग: spaceforexpressions.blogspot.com

Comments

परांजपे सर चे अभिनंदन 💐💐💐💐👌👌👌
Mandar b n said…
मस्त सचिन. छान लिहील आहेस

Popular posts from this blog

A Psycho-financial Experiment

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी