ग्रामीण भागातील कचरा समस्या- ३
साधारण कुठल्याही दररोजच्या घरगुती कचऱ्यामध्ये एकुण वजनाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त भार हा सेंद्रीय कचरा असतो. हा कचरा जर इतस्ततः टाकला किंवा उघड्यावर जमा केला तर त्यामुळे बऱ्याच समस्या तयार होतात. अश्या कचऱ्यामुळे माश्या, डास, उंदीर, भटकी जनावरे ह्यांचा उपद्रव तर वाढतोच परंतु दुर्गंधीचीही समस्या तयार होते. ह्या कचऱ्याकडे टाकाऊ म्हणून न पाहता त्याच्याकडे एक चांगला स्रोत म्हणून बघता येते परंतु बहुसंख्य लोकांना त्याबद्दल जाणीव किंवा योग्य माहिती नसल्यामुळे हा आपल्या रोजच्या जीवनातला एक चांगला घटक फक्त वायाच जात नसतो तर आपल्या जीवनात विविध समस्या निर्माण करत असतो. ह्या कचऱ्याचे काही उपयोग आपण आता समजून घेऊ.
त्याचा सगळ्यात सोपा व सहज करता येण्यासारखा उपयोग म्हणजे त्याचे खत बनवणे. घरगुती कचऱ्यापासून केलेले खत हे विविध शेतीपोषक घटकांनी समृध्द असते. त्यामुळे शेतीच्या उत्पादकतेत त्याच्या वापराने प्रचंड वाढ घडवून आणता येते. जर एखाद्या कुटंबाची स्वतःची शेती नसेल तर असे खत बनवून ते अन्य शेतकऱ्यांना देऊन त्याच्या बदल्यात विषमुक्त अन्नधान्य, फळे, भाजीपाला मिळवू शकतात.
खत बनवताना ते विविध पध्दतीने बनवता येते. ह्यामध्ये कंपोस्ट खत, द्रव खत तसेच गांडूळ खतही तयार करता येते. परंतु त्यासाठी घरगुती कचरा योग्य प्रकारे व वेगाने विघटीत करणे महत्वाचे असते तसे जर झाले नाही तर त्याचे वाईट परिणाम आपण आतापर्यंत पाहिलेच आहेत. असा कचरा कुजवण्यासाठी विविध जीवाणूंचे कल्चर वापरणे गरजेचे असते.
सध्या सेंद्रीय शेतीपध्दतीमध्ये जीवामृत नावाचे एक द्रव्य लोकप्रिय झाले आहे. हे एक प्रकारचे नैसर्गिक जीवाणुंचे कल्चर असते. ज्याचा वापर आपल्याला कचऱ्याच्या व्यवस्थापनामध्ये अतिशय उत्तम प्रकारे करता येतो हे वेंगुर्ल्यातील श्री अजित परब ह्यांनी विविध प्रयोगाद्वारे दाखवून दिले आहे. त्यांनी ह्या जीवामृताचा उपयोग निव्वळ खत निर्मितीतच नव्हे तर विविध कचऱ्याच्या ढिगांवर तसेच सांडपाण्याच्या प्रवाहांमध्येही केला आहे. सावंतवाडी शहराचे डंपिंग ग्राउंड हे त्याच्या दुर्गंधीमुळे व प्रदुषणामुळे जवळील परिसराच्या नागरीकांना धोकादायक बनले होते. जीवामृताच्या फवारणीने त्यातील जैव भागाचे वेगाने विघटन होऊन हा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटला. तसेच घरगुती सांडपाणी जे बऱ्याच वेळा नदी नाल्यांमध्ये सोडून देण्यात येते ते जर योग्य पध्दतीने वापरले तर त्याचा पुनर्वापर शेतीसाठी सहज करता येतो. ज्या पिकांना पाण्याची खुप जास्त आवश्यकता असते अशी केळी, पपई, अळू, चारापिके त्यावर घेता येतात.
जीवामृत बनवण्याची पध्दत ही फार सोपी असून गावामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या घटकांपासून ते बनवता येते. त्यासाठी १५ किलो ताजे शेण, ५ लिटर गोमुत्र, १ किलो गुळ, १ किलो बेसन, वडाच्या झाडाखालील सेंद्रीय पदार्थांनी युक्त अशी मुठभर माती घेऊन हे सर्व घटक २०० लिटर पाण्यामध्ये एकत्र केले जातात. त्यासाठी प्लास्टिकचे बॅरल वापरले जाते. हे मिश्रण दररोज दोनदा व्यवस्थित ढवळले व व्यवस्थित झाकून ठेवले की साधारण तीन दिवसात त्यातील जीवाणूंचे कल्चर तयार होते. हे कल्चर विविध प्रकारे कचऱ्यावर प्रक्रीया करण्यासाठी वापरता येते. सध्या केंद्र शासनाच्या नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग ह्या संस्थेने तयार केलेले वेस्ट डिकंपोझर हे कल्चरही कचऱ्यावर व सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी वापरता येते. अनेक खाजगी कंपन्या व स्वयंसेवी संस्थांनी त्यांची स्वतंत्र जीवाणू कल्चर तयार केली आहेत त्याचाही वापर करता येईल.
सेंद्रीय कचऱ्यापासून दुसरा थेट आणि फायदेशीर उपयोग म्हणजे बायोगॅस तयार करणे. बराचसा घरगुती सेद्रीय कचऱ्यापासून मिथेन तयार करता येतो व त्याचा वापर स्वयंपाकघरात इंधन म्हणून करता येतो. फक्त घरात नव्हे तर रेस्टॉरंट, खाद्यप्रक्रीया उद्योग ह्यांनाही असा बायोगॅस करणे शक्य आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे असे बायोगॅस आता अतिशय कमी जागेत घराच्या पडवीत, गॅलरीत किंवा एखाद्या कोपऱ्यात बसवणे शक्य असते. त्यामुळे होणारा एलपीजीवरील खर्च तर कमी होतोच परंतु कोकणातील बऱ्याच घरांपर्यंत थेट रस्ते नसल्यामुळे सिलिंडर वाहतुक करणे कठीण असते तिथे हा त्रासही वाचतो. लाकडामुळे होणारा धुराचा व भांडी काळी पडण्याचा त्रासही वाचतो. त्याशिवाय बायोगॅस स्लरीचा उपयोग शेतीमध्ये खत म्हणून थेट करता येतो.
तिसरा सेंद्रीय कचऱ्याचा थेट वापर म्हणजे पशुखाद्य. बऱ्याच वेळा ह्या कचऱ्यामध्ये पाळीव प्राणी जसे की कोंबड्या, गाई, शेळ्या, मेंढ्यांना खाण्यास योग्य असे भाज्यांची देठे, साले असे अवशेष असतात. ससेपालन हा उद्योगही अतिशय कमी जागेत अश्या भाज्यांचे अवशेष वापरून करता येतो. मुंबईजवळील वसई, भाईंदर वगैरे परिसरात घरगुती पध्दतीने वराहपालन करण्यात येते. जेवणातील उष्टे, खरकटे तसेच उरलेले अन्न पाळीव वराहांना देता येते व शास्त्रीय पध्दतीने व स्वच्छता बाळगुन वाढवलेल्या वराहांची चांगल्या किंमतीने बाजारात विक्री केली जाऊ शकते.
=========================================================
हि लेखमाला मी पुर्वी एका रेडिओ कार्यक्रमासाठी लिहिली होती. आता सोशल मिडीयावर शेअर करतोय. मुळ नावासह शेअर करायला हरकत नाही.
- सचिन पटवर्धन
माझा ब्लॉग: spaceforexpressions.blogspot.com
Comments