ग्रामीण भागातील कचरा समस्या- २
ग्रामीण भागातील कचरा समस्या- २
सर्वसाधारण पणे घरगुती कचऱ्यामध्ये काय असते? स्वयंपाकघरातील फळे भाजीपाल्यांची साले, देठे असे पदार्थ, जेवणातील उष्टे, विविध पॅकिंगला वापरलेले प्लास्टिक, कागद, पुठ्ठे, लाकूड आणि थोड्या प्रमाणात धातूचा कचरा. बऱ्याचश्या घरांमध्ये कचरा कोपऱ्यात ठेवलेल्या एखाद्या बालदीमध्ये साचवला जातो आणि बालदी भरली की मग वस्तीच्या बाहेर हा कचरा फेकला जातो. जेंव्हा असा ओला व सुका कचरा एकत्र ठेवला जातो तेंव्हा कालांतराने जसजसे त्या कचऱ्यामधल्या सेंद्रीय द्रव्याचे विघटन चालू होते तेंव्हा त्याला अतिशय घाणेरडा वास सुटतो आणि बुळबुळीतपणा तयार होतो. अश्या कचऱ्याकडे भटके प्राणी, उंदीर, घुशी आकर्षित होतात तसेच हा कचरा माणसाने हाताळणे त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असते.
शहरांमध्ये बऱ्याच अंशी असा कचरा घरोघरी जाऊन जमा करण्यासाठी कंत्राटी कामगार ठेवले जातात. हा कामगार वर्ग बहुतांश समाजाच्या शोषित घटकांमधून येत असतो आणि आजही त्यांना अतिशय कमी पगारावर काम करावे लागते. गावांमध्ये असे काम करणारेही नसतात त्यामुळे हा कचरा बहुतांशवेळा रात्री अंधार झाला की वस्तीच्या बाहेर टाकून दिला जातो. गावात एकंदरीत लोकसंख्येची घनता कमी असल्यामुळे त्याचे परिणाम लगेच लक्षात येत नाहीत. असा कचरा टाकणे सोपे वाटले तरी त्याचे तोटे आता गावांमध्ये दिसून येत आहेत. जे आपण आधीच्या भागात बघितलेच.
मग ह्या समस्येवर उपाय आहे का? जिथे कचरा व्यवस्थापनाची शासकीय व्यवस्था नाही अश्या परिस्थितीत हे काम कसे करता येईल? असे प्रश्न साहजिकपणे पुढे येतात. मला वाटतं आपण कचऱ्याकडे जोपर्यंत एक मुल्य असलेली गोष्ट म्हणून बघत नाही तोपर्यंत ती समस्या म्हणून कायम आपल्या समोर राहिल. आपल्याकडे जमा होणाऱ्या अश्या कचऱ्यामध्ये असे बरेच घटक असतात ज्यांच्यापासून आपल्याला थेट फायदा होऊ शकतो.
त्यासाठी घरगुती स्तरावर घरातल्या प्रत्येक सदस्याने एक सवय सर्व प्रथम लावून घेतली पाहीजे कि सेंद्रीय ओला कचरा आणि अविघटनशील सुका कचरा वेगळा करणे. असे केल्याने सर्वप्रथम कचऱ्याची हाताळणी सोपी, सुटसुटीत होते आणि त्याची किळस वाटत नाही. बराचसा सेंद्रीय कचरा हा सहज विघटन होणारा असतो व त्याचा स्थानिक स्तरावर उपयोग करणे सहज शक्य असते. जो कचरा सहज विघटन पावत नाही तो म्हणजे प्लास्टिक, काच आणि धातू. अश्या कचऱ्यामध्ये बराचसा काच व धातूच्या वस्तू आजमितीला गावांमध्ये येणारे भंगारवाले खरेदी करतात. बऱ्याचश्या घरांत लोक धातूच्या गोष्टी, रद्दी कागद अश्या वेगळ्या काढून त्याचे थोडे पैसे येतील म्हणून खास वेगळे ठेऊन देत असतात. जी गोष्ट भंगारवाले घेत नाहीत ते म्हणजे प्लास्टीक.
प्लास्टीकमध्ये ज्याला सिंगल युज प्लास्टीक म्हणतात त्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीकवर शासनाने बंदी आहे असे असले तरी अजुनही बऱ्याच ठिकाणी हे प्लास्टीक वापरात दिसते. साधारण भाजीपाला, धान्य, दुध पिशव्या वगैरे साठी दुकानांमधून हे प्लास्टीक वापरले जात असते. हे प्लास्टीक अतिशय हलके असल्याने वाऱ्याबरोबर सहज उडत जाते व इतस्ततः पसरते. हे किमान आपल्या घरात येऊ नये म्हणून प्रत्येकाने सोबत कापडी पिशवी बाळगण्याची सवय बाळगली पाहिजे. स्थानिक दुकानदार अद्यापही हे वापरत असतील तर ते त्यांना न वापरण्याबद्दल सांगितले पाहिजे.
तरीही अर्थात प्लास्टिकचा कचरा पूर्ण टाळणे सध्याच्या काळात शक्य नाही. त्यामुळे त्याच्या पुनर्वापरासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतील. परंतु सुका असलेला प्लास्टिक कचरा आपल्याला दीर्घकाळपर्यंत साचवून ठेवता येतो व पुनर्वापरासाठी देता येतो. यंत्राद्वारे अश्या कचऱ्याचा भुगा करून त्याचा आकार कमी करता येतो त्यामुळे असा कचरा साठवणे व त्याची वाहतुक करणे सोपे होते. टाकाऊ प्लास्टीक पासून इंधन तसेच डांबर तयार करण्याचे प्रकल्प काही ठिकाणी विकसित झालेले आहेत. असे कमी क्षमतेचे प्रकल्प ग्रामीण भागातही उभारणे शक्य आहे परंतु त्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर किंवा समुह पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. तयार झालेले इंधन ग्रामीण भागात जनरेटर तसेच शेतीची यंत्रे चालवण्यासाठीही वापरता येऊ शकेल.
=================================================================
हि लेखमाला मी पुर्वी एका रेडिओ कार्यक्रमासाठी लिहिली होती. आता सोशल मिडीयावर शेअर करतोय.
माझा ब्लॉग: spaceforexpressions.blogspot.com
Comments
Very nice 💐💐💐💐
💐💐💐💐👌👌👌👌