उद्योग पळवण्याचा उद्योग
सध्या महाराष्ट्रातील विविध राजकीय विरोधक राज्यातील उद्योग अन्य राज्यात कसे पळवून नेले जात आहेत त्यावर राळ उठवत आहेत. दोन मिनिटात वीस ब्रेकिंग न्युज आणि स्वघोषित तज्ञांनी काढलेल्या एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या ह्यापलीकडे फारसं काही देऊ न शकणाऱ्या मीडियाला असली भडक वाक्यं घेऊन परत परत दाखवणं खुप सोपं असतं कारण कोणाला फारसे प्रश्न विचारून त्याचा तपशील घेऊन मिळालेल्या माहितीचं विश्लेषण करण्याची तसदी घेण्याची गरज नसते. का, काय, कोणी, कुठे, कोणाला, कसे असे सहा प्रश्नार्थक शब्द आपल्या भाषेत आहेत. ते कुठल्याही घटनेच्या बाबतीत जर ते विचारता येत नसतील आणि सध्याची माध्यमे त्याबाबत माहिती पुरवण्यास असमर्थ असतील तर असल्या उपयोगहीन वस्तू व सेवांवर खर्च आणि वेळ कशाला खर्च करायचा हा मोठा प्रश्न आहे. तसंच काहिसं उद्योगांचंही आहे. उद्योग, व्यवसाय म्हणजे लोकांच्या चरितार्थाचं साधन असतं. एखादी मुलं पळवणारी टोळी असते किंवा दरोडे घालून वस्तू चोरून नेता येतात तसे उद्योग पळवता येत नाहीत हे ज्ञान एखादा अल्पशिक्षित अल्पभुधारक शेतकरी किंवा रस्त्यावरचा निरक्षर फुगेवालाही बाळगतो. व्यवसायासाठी निव्वळ कच्च्या मालाची ...