Posts

Showing posts from September, 2022

ग्रामीण भागातील कचरा समस्या- ६

  मावलिन्नॉंग हे मेघालय राज्यातील एक साधारण ५०० लोकवस्ती असलेलं गाव आहे. डोंगराळ भाग आणि सुपारीच्या बागा असं कोकणासारखंच वातावरण असलेल्या ह्या गावात ३० वर्षांपुर्वी काविळीची साथ आली आणि काही गावकऱ्यांचा त्यात मृत्यूही झाला. ह्या घटनेनंतर गावकऱ्यांनी गाव पुर्णतः स्वच्छ करण्याचा वसा घेतला तो कायमचा. गावकऱ्यांनी त्यांच्या सवयी कायमच्या बदलून टाकल्या आहेत. गावात कुठेही उघड्यावर सार्वजनिक जागी कचरा टाकण्यास बंदी आहे. प्लास्टिकचा कोरडा कचरा रस्त्यावर विवक्षित ठिकाणी ठेवलेल्या बांबूच्या कुंड्यांमध्ये जमा केला जातो. घरांच्या आसपासचा पन्नास मीटरपर्यंतचा परिसर गावकरी नियमीत स्वेच्छेने साफ करतात व प्रत्येक घराच्या समोर एक सुंदर बाग केलेली असते. आज हे गाव आशिया खंडातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखले जाते आणि अनेक पर्यटक फार दुरून येथे येतात. बऱ्याच घरांमध्ये होमस्टे व घरगुती खानावळी सुरू झाल्या आहेत. पर्यटकांकडूनही गाव स्वच्छ राखले जाईल ह्याची काळजी गावकरी घेतात. आज ह्या स्वच्छतेचा फायदा चांगल्या आरोग्याबरोबर पर्यटनाद्वारे स्थानिक रोजगारनिर्मितीमध्ये झाला आहे.   अजुन एक विशेष उदाहरण क...

ग्रामीण भागातील कचरा समस्या- ५

दापोली शहरात श्री प्रशांत परांजपे हे कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात बरेच वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी त्यांच्या निवेदिता प्रतिष्ठान ह्या संस्थेतर्फे कचऱ्याच्या समस्येवर अनेक नावीन्यपूर्ण उपाय प्रचलित केले आहेत. त्यांच्याशी चर्चा करताना अनेक नविन कार्यपध्दतीविषयी समजते. कोकणाच्या परिस्थितीत काय केले पाहिजे त्याच्याबद्दल ते उपायही सुचवतात.   त्यांनी असे अनुभवले आहे की दापोली सारख्या शहरात जर ५० लोकांनी सलग ३० मिनिटे फक्त ५०० मीटरच्या परिघातील इतस्ततः पसरलेला कचरा जमा केला तर १५ पोती प्लास्टिक जमा होते. त्यांचे असे गणित आहे की एखाद्या गावाने ठरवले व सर्व लोकांनी सहभाग दिला तर ते गाव फक्त तीन महिन्यात पूर्ण स्वच्छ होऊ शकते. कोकणाच्या विखुरलेल्या वस्तीच्या परिस्थितीत एखादी वाडी वस्तीही स्वतःसाठी हे चॅलेंज घेऊ शकते. एखाद्या वस्तीने श्रमदानाने परिसर स्वच्छ करायचा ठरवला तर इतक्या कमी वेळात स्वच्छता करणे शक्य आहे. आफ्रिकेतील रवांडा ह्या एकेकाळी वांशिक युध्दाने ग्रासलेल्या देशात आज प्रत्येक नागरीकाला दर रविवारी दोन तास देशाच्या स्वच्छतेसाठी काम करणे सक्तीचे असते. एकदा ह्या सक्तीचे चांगले ...

ग्रामीण भागातील कचरा समस्या- ४

काही वर्षांपुर्वी दिल्ली विमानतळावर मी बसलो होतो. माझ्यासमोर आई, वडील व त्यांची तरूण मुलगी असे एक जपानी कुटूंब बसले होते. जवळच काही अंतरावर कचऱ्यासाठी एक मोठा स्टिलचा डबा ठेवला होता. तिथे काही लोक येता जाता हातातला कचरा टाकत होते. त्या जपानी कुटूंबाचे डिस्पोझेबल डिशमधून जेवण चालू होते ते संपल्यावर एकेक जण उठून कचऱ्याच्या डब्याजवळ जाऊन टाकून येत होता पण त्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ लागत असल्याचे माझ्या निरीक्षणात आले म्हणून मी जवळ जाऊन त्यांचे नेमके काय चालू आहे ते बघितले. ते लोक डिशमधील सर्व उष्टे व्यवस्थित एकत्र करून ओल्या कचऱ्याच्या भागात टाकत होते आणि बरोबरच्या खाद्यपदार्थांचे रॅपर, पाऊचच्या आतमध्ये चिकटलेले कणही वेगळे करून टाकत होते. त्यांचे झाल्यानंतर मी कचऱ्याच्या डब्यात बघितले तर प्रत्यक्षात तिथे ओल्या व सुक्या कचऱ्याचे जरी दोन भाग असले तरी दोन्ही भागात मिश्र कचराच दिसत होता. मी न राहवून त्या जपानी माणसाला विचारलं कि त्या डब्यात बाकीच्या लोकांनी कचरा वेगळा न करता तसाच टाकला आहे तर तुम्ही तो स्वतंत्र करून का टाकलात. त्याने मला उत्तर दिलं की एक तर आमच्या देशात आम्ही हे नियम कड...

ग्रामीण भागातील कचरा समस्या- ३

साधारण कुठल्याही दररोजच्या घरगुती कचऱ्यामध्ये एकुण वजनाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त भार हा सेंद्रीय कचरा असतो. हा कचरा जर इतस्ततः टाकला किंवा उघड्यावर जमा केला तर त्यामुळे बऱ्याच समस्या तयार होतात. अश्या कचऱ्यामुळे माश्या, डास, उंदीर, भटकी जनावरे ह्यांचा उपद्रव तर वाढतोच परंतु दुर्गंधीचीही समस्या तयार होते. ह्या कचऱ्याकडे टाकाऊ म्हणून न पाहता त्याच्याकडे एक चांगला स्रोत म्हणून बघता येते परंतु बहुसंख्य लोकांना त्याबद्दल जाणीव किंवा योग्य माहिती नसल्यामुळे हा आपल्या रोजच्या जीवनातला एक चांगला घटक फक्त वायाच जात नसतो तर आपल्या जीवनात विविध समस्या निर्माण करत असतो. ह्या कचऱ्याचे काही उपयोग आपण आता समजून घेऊ.  त्याचा सगळ्यात सोपा व सहज करता येण्यासारखा उपयोग म्हणजे त्याचे खत बनवणे. घरगुती कचऱ्यापासून केलेले खत हे विविध शेतीपोषक घटकांनी समृध्द असते. त्यामुळे शेतीच्या उत्पादकतेत त्याच्या वापराने प्रचंड वाढ घडवून आणता येते. जर एखाद्या कुटंबाची स्वतःची शेती नसेल तर असे खत बनवून ते अन्य शेतकऱ्यांना देऊन त्याच्या बदल्यात विषमुक्त अन्नधान्य, फळे, भाजीपाला मिळवू शकतात.  खत बनवताना ते विविध...

ग्रामीण भागातील कचरा समस्या- २

ग्रामीण भागातील कचरा समस्या- २ सर्वसाधारण पणे घरगुती कचऱ्यामध्ये काय असते? स्वयंपाकघरातील फळे भाजीपाल्यांची साले, देठे असे पदार्थ, जेवणातील उष्टे, विविध पॅकिंगला वापरलेले प्लास्टिक, कागद, पुठ्ठे, लाकूड आणि थोड्या प्रमाणात धातूचा कचरा. बऱ्याचश्या घरांमध्ये कचरा कोपऱ्यात ठेवलेल्या एखाद्या बालदीमध्ये साचवला जातो आणि बालदी भरली की मग वस्तीच्या बाहेर हा कचरा फेकला जातो. जेंव्हा असा ओला व सुका कचरा एकत्र ठेवला जातो तेंव्हा कालांतराने जसजसे त्या कचऱ्यामधल्या सेंद्रीय द्रव्याचे विघटन चालू होते तेंव्हा त्याला अतिशय घाणेरडा वास सुटतो आणि बुळबुळीतपणा तयार होतो. अश्या कचऱ्याकडे भटके प्राणी, उंदीर, घुशी आकर्षित होतात तसेच हा कचरा माणसाने हाताळणे त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असते.  शहरांमध्ये बऱ्याच अंशी असा कचरा घरोघरी जाऊन जमा करण्यासाठी कंत्राटी कामगार ठेवले जातात. हा कामगार वर्ग बहुतांश समाजाच्या शोषित घटकांमधून येत असतो आणि आजही त्यांना अतिशय कमी पगारावर काम करावे लागते. गावांमध्ये असे काम करणारेही नसतात त्यामुळे हा कचरा बहुतांशवेळा रात्री अंधार झाला की वस्तीच्या बाहेर टाकून दिला ...

ग्रामीण भागातील कचरा समस्या- १

उंच सह्यकडा आणि अरबी समुद्र ह्यांच्या मधला हिरवाईने नटलेला लाल मातीचा डोंगराळ असा आपला कोकण प्रदेश फार पुर्वीपासून मराठी साहित्यिकांचा फार आवडता विषय आहे. पण हे पुर्वीचं आपलं कोकण आता कधीच बदललंय. पुर्वी बोटींमधून, खाडीतल्या वल्ह्याच्या होड्यांमधून, बैलगाड्यांमधून लांबचे खडतर प्रवास करणारे आपले आजोबा, पणजोबा ंच्या सगळ्या गोष्टी, अनुभव आता इतिहासजमा झाल्या आहेत. नारळ पोफळीच्या बागा, भाताची खाचरे, समुद्राच्या लाटा, पाण्याचे झरे, गावातली निरव शांतता हे मात्र काही प्रमाणात अजुनही टिकून आहेत. ह्या सर्व गोष्टींचं आकर्षण शहरात स्थायिक झालेल्या चाकरमान्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांनाच नव्हे तर देशभरातल्या अनेक पर्यटकांनाही खेचून आणत असतं. आता इथला प्रवासही नवीन महामार्गांमुळे आणि रेल्वेमुळे सुकर झालाय. बरीचशी गावं आता मोबाईलच्या जाळ्याने जोडली गेली आहेत त्यामुळे संपर्क साधणंही खुप सोपं झालंय. आता मुंबईहुन सहजपणे जवळच फिरून यावं तसं वीकएण्डला, जोडून सुट्ट्या आल्या की किंवा असंच मनात आलं तरीही रत्नागिरीला जाऊन येता येतं. बऱ्याच शहरी लोकांनी गावागावात जमिनी विकत घेऊनही सेकंड होम बांधली आह...