कोकणातल्या फणसाचं काय करायचं?

 


कोकणात फणसाची लागवड दोन प्रकारची आहे. एक म्हणजे नवीन होत असलेली कलमांपासून होत असलेली लागवड. ह्यामध्ये स्थानिक तसेच विविध एक्झॉटीक प्रकारतील मुख्यत्वे कापा प्रकारातल्या फणसाची छोटी तसेच मोठी लागवड होत आहे. लागवड करणारे शेतकरी काही हौशी आहेत तर काही लोकांची व्यावसायिक पातळीवरही आहे. त्यामागे काही व्यावसायिक गणिते नक्की असतील आणि त्याचा विचार लागवड करणाऱ्याने केला असेल असे आपण गृहीत धरू शकतो. जी दुसरी लागवड आहे ज्याचा फारसा व्यावसायिक विचार सध्या होताना दिसत नाही ती म्हणजे आपली जुनी झाडे. त्यांचे पर्यावरणीय आणि व्यावसायिक असे दोन्ही प्रकारचे मूल्य आहे ते समजून घेतले तर त्याचा खुप चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना उपयोग होऊ शकेल आणि नवीन लागवडीचा खर्च न करता, आहे त्या झाडांपासून अधिक उत्पन्न मिळवणे शक्य होईल.

 

कोकणातली सर्वच जुनी लागवड हि बियांपासून केल्यामुळे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वैविध्य आहे आणि एखाद्या मोठ्या मार्केटला जसे एकसारखे उत्पादन लागते तसे त्यापासून मिळू शकत नाही ही एक जुन्या लागवडीच्या फणसाबाबत समस्या आहे. अश्या परिस्थितीतही एखाद्या शेतकऱ्याकडे समजा ५ झाडे आहेत आणि एका झाडावर सरासरी २०० किलोपर्यंत एकूण फळे मिळत असतील तर किमान कष्टात ५रु/ किलो ह्या दराने गावामध्ये राहून त्यापासून सरसकट ५००० रु मिळवणे शक्य आहे. हे किमान कष्ट म्हणजे तीन गोष्टी करणे: एक- फणस व्यवस्थित तयार झाला आहे ते ओळखणे. दोन- तो झाडावर पिकू न देता वेळेत काढणे. तीन- त्या फणसाचा योग्य उपयोग कोणता आहे ते ओळखून त्यांच्यापर्यंत तो पोचेल असे बघणे. माझा स्वतःचा अनुभव असा आहे की हे वरवर किमान आणि सोपं वाटलं तरी ते प्रत्यक्षात बऱ्याच वेळा कठीण असतं कारण झाडावर चढणाऱ्या व्यक्ती सहजपणे मिळत नाहीत आणि अश्या व्यक्ती मिळाल्या तरी त्यांना फणसाची चांगली परीक्षा असतेच असे नाही. जर हे दोन्ही शक्य झालं तर त्या फणसाचा नेमका चांगला उपयोग कश्यासाठी होईल ते बऱ्याचवेळा झाडाच्या मालकांनाही सांगता येत नाही. ह्या तीनही गोष्टी जर शक्य झाल्या तर वर सांगितलेला आकडा गाठणे उत्पन्नाचा आकडा गाठणे सहज शक्य आहे. त्यापेक्षा जास्त काही करता आले तर हा उत्पन्नाचा आकडा दुप्पट किंवा तिप्पटसुध्दा करता येईल.

 

आपल्याकडे फणसाचे सहज प्रचलित असे तीन उपयोग आहेत. एक म्हणजे थेट विक्री. हि साधारणपणे काप्या फणसांची होते किंवा कोवळ्या भाजीच्या फणसाची होते. दुसरा फणसाचे चिप्स म्हणजेच तळलेले गरे. सर्व झाडांच्या फणसाच्या गऱ्यांचे चिप्स चांगले होतातच असे नाही त्यामुळे ह्यासाठी फणसांची पुर्वपरीक्षा आवश्यक असते. तिसरा म्हणजे फणसपोळी. ह्यासाठी साधारणपणे कुठलेही पिके बरके गरे वापरले तरी चालतात. आपल्याकडे नव्याने स्थानिक पातळीवर विकसित होणारे उत्पादन म्हणजे फणस भाजी. कोवळ्या फणसाची भाजी कॅन्ड स्वरूपात किंवा फ्रोझन स्वरूपात तयार करून विकली जाते. हे सर्व उद्योग चालवणाऱ्या व्यक्तींना नेहमी जाणवणारा प्रश्न म्हणजे योग्य प्रकारचा कच्चा माल मिळत नाही आणि मार्केटमध्ये मात्र मागणी चांगली आहे.

 

त्याशिवाय स्थानिक पातळीवर फणसांचा योग्य विनियोग करून उत्पन्न मिळवण्याचे काही सोपे मार्ग.

 

·         साधारणपणे आपल्याकडे गावांमध्ये कुठल्याही शेतीउत्पन्नाचे मार्केटींग म्हटलं की लगेच मुंबई, पुण्याचा विचार केला जातो. परंतु कोकणातल्या रत्नागिरी, चिपळूण, कुडाळ सारख्या छोट्या शहरांमधल्या ग्राहकांना पाहिजे असलेला फणसही आपले शेतकरी देऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि त्याचवेळेला शहरांच्या बाहेर चार पाच किलोमीटरवर गावांमध्ये फणस पडून फुकट जात असतात. संपूर्ण रत्नागिरी शहरामध्ये माझ्या पाहण्यात एकच व्यक्ती फणस सोलून त्याचे कापे गरे सुटे करून त्याची नियमीत विक्री करते. रत्नागिरी आणि त्याच्या बाजुच्या गावांतील मिळून नागरी वस्ती दीड लाखाच्या वर नक्की असेल. एवढ्या लोकवस्तीसाठी असे दहा जण सुद्धा कमी पडतील. हेच गरे जर फ्रोझन स्वरूपात विकले तर हंगाम संपल्यावरसुद्धा त्याची विक्री कित्येक महिने करता येईल. असेच कच्च्या गऱ्यांचेही करता येईल.

 

·         ज्यांचे मार्केटींग सहज करता येत नाही ते म्हणजे बरके फणस. ह्या फणसाच्या गऱ्यांचे पीठ करण्याचे तंत्र अतिशय सोपे आहे व ते प्रत्येक गावात पोचणे आवश्यक आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये ते उपलब्धही आहे. फक्त गावागावात ते पसरवणे आवश्यक आहे. त्याचा रक्तातील साखर नियंत्रण करण्यासाठीचा उपयोग आता सगळीकडे माहीत झाला आहेच आणि त्याची मागणीही आहे परंतु सध्यातरी पुरवठा नाही.

 

·         दुसरा सहजपणे उपलब्ध असलेला फळाचा भाग म्हणजे आठीळा. आपण जसे उकडवलेले शेंगदाणे खातो तश्या ह्या आठीळा जर सहजपणे शहरांमध्ये उपलब्ध झाल्या तर त्याचाही खप होऊ शकेल. सध्या आमच्या आजूबाजूच्या परिसरात मच्छिमार वस्त्यांमध्ये, जिथे लोकांकडे स्वतःची शेतजमीन नाही तिथे काही विक्रेते आठीळा शेतकऱ्यांकडून विकत घेऊन त्या शिजवून विकण्याचा व्यवसाय करतात. शेतकऱ्यांना आठीळांचा १२ रु प्रति किलो असा दर मिळतो. जर मागणी वाढली तर हा दर नक्की अधिक मिळू शकेल.

 

हा लेख वाचून काय वाटलं? आपली मते कमेंट बॉक्समध्ये जरुर व्यक्त करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि योग्य लोकांपर्यंत पोचवा. धन्यवाद!

Comments

Popular posts from this blog

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी

ध्वनीक्षेपकांचा उन्माद