आर्थिक गोष्टी फणसाच्या
ह्या गोष्टी आपल्याकडे फारश्या माहित नाहीत. पण त्या वाचून आपल्याकडे कोकणात आपण केवढ्या मोठ्या सहजपणे उपलब्ध अश्या आर्थिक स्रोतावर फारसं काहीही न करता बसलो आहोत ह्याची जाणीव नक्की होईल.
• मुंबईमध्ये बऱ्याच जणांनी मोठमोठे कापे फणस त्यांचे गरे काढून रस्त्यावर विकले जात असताना पाहिले असतील. बरेचसे कोकणी लोक हे पाहतात तेंव्हा “एवढे महाग गरे कोण खाणार. गावाला जाऊ तेंव्हा पोटभर मिळतील ते सुध्दा फुकट!” असा विचार करून सरळ पुढे जात असतात. हे मोठ्या आकाराचे फणस एका छोट्याश्या परिसरातून येतात हे बऱ्याच लोकांना माहित नसते. पनरूती हे तामिळनाडूच्या कडलोर जिल्ह्यातील एक तालुक्याचे गाव. ह्या परिसरात साधारण १००० हेक्टरमध्ये फणसाची लागवड आहे आणि हेक्टरी सरासरी ४० टन उत्पादन ह्या शेतकऱ्यांना मिळते. शेतकऱ्यांना फणस फळाला अंदाजे १० रु प्रति किलो प्रमाणे दर मिळतो म्हणजे साधारण ४०० कोटी रुपयांची ह्या परिसरात निव्वळ फणसाच्या माध्यमातून उलाढाल होते. ह्यामधील पनरुती मार्केटमध्ये जो फणस येतो त्यातील २५% टक्के फणस एकट्या मुंबई शहरात पाठवला जातो असे येथील व्यापारी सांगतात म्हणजेच मुंबई शहर पनरुती परिसराला किमान १० कोटी रुपये दरवर्षी फणसाच्या खरेदीसाठी देत असते असे म्हणायला हरकत नाही.
• २०१२ मध्ये जेम्स जोसेफने आपली मायक्रोसॉफ्ट कंपनीमधली नोकरी सोडून आपल्या अलुवा ह्या केरळ राज्यातील गावी येऊन फणस ह्या फळाच्या मुल्यवर्धनावर काम सुरू केले. त्यातुनच उभा राहिला जॅकफ्रुट ३६५ हा उद्योग. वेगवेगळ्या प्रकारे काम करता करता त्याच्या लक्षात आले की फणसाच्या कच्च्या गऱ्याच्या पीठामध्ये मधुमेह नियंत्रीत करणारे गुणधर्म आहेत. त्यादृष्टीने त्याचे पीठ बनवण्याचा मोठा उद्योग उभा केला. ह्या उद्योगाची खाद्य विभागात सर्वोत्तम स्टार्ट अप म्हणून २०२० साली देश पातळीवर निवड झाली आणि पंतप्रधानांच्या कार्यक्रमात त्याची विशेष दखलही घेण्यात आली. आज जॅकफ्रूट ३६५ च्या फणस गरे पीठाची जवळपास सर्व ऑनलाईन स्टोअरद्वारे आणि अंदाजे २००० थेट विक्री करणाऱ्या दुकानांद्वारे विक्री करण्यात येते.
• सध्या पाश्चात्य जगतात आणि त्याचे अनुकरण करणाऱ्या आशिया खंडात एक नवीन ट्रेंडची हवा आहे ती म्हणजे व्हिगन मीट अल्टरनेटिव्ह्ज, कुठलेही प्राणीजन्य पदार्थ नसलेले मांसाहारी चवीचे पर्याय. त्याची फक्त अमेरिकेतील बाजारपेठच २०२५ पर्यंत २७०० दशलक्ष डॉलरची असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. भाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या फणसाची चव व घडण ही मांसाशी मिळतीजुळती असते. त्यामुळे त्याचा ह्या पर्यायी मांसाहारी चवीच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. करी, स्मोक्ड, बार्बेक्यु, तेरीयाकी अश्या वेगवेगळ्या स्वादामध्ये कोवळ्या फणसापासून तयार केलेले पदार्थ अमेरिका, युरोप, पुर्व आशिया अश्या जगाच्या प्रगत भागात लोकप्रिय होत आहेत. त्यासाठी अनेक कंपन्या जगाच्या विविध भागात तयार झाल्या आहेत. जवळचं उदाहरण द्यायचं झालं तर गोव्यामध्ये साईराज धोंड ह्या तरूणाची वाकाव फुड्स ही कंपनी हे कोवळ्या फणसाचे प्रॉडक्ट तयार करून विविध तारांकीत हॉटेल तसेच रेस्टॉरंटना व दुकानांना पुरवत आहे.
• व्हिएतनाम ह्या देशात फणसाची लागवड गेल्या काही वर्षात वेगाने होत आहे आणि ती सध्या २६ हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर पसरली असण्याचा अंदाज आहे. सर्व लागवड साधारण दोन तीन जातींचीच आहे. त्याचा फायदा हा होतो की एकसारख्या प्रतीची फणसाची फळे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. आजमितीला तीन लाख टनांच्या वर फणसाचे उत्पादन ह्या देशात होते. एक मजेशीर गोष्ट म्हणजे फणस काढण्यास योग्य आहे की नाही हे ओळखण्याचे कौशल्य असलेल्या लोकांचा खास कर्मचारी वर्ग तेथे काही उद्योगांमध्ये ठेवलेला असतो. फक्त पिकलेली फळेच नव्हे तर फणसाचे व्हॅक्युम फ्राईड चिप्स हे एक दुसरे मोठे उत्पादन येथे तयार होते आणि जगाच्या बऱ्याच देशांमध्ये निर्यात होते. आपल्याकडे दोन जिल्ह्यात मिळून कोकणात काही हजार तरी फणसाचे चिप्स बनवणारे सुक्ष्म उद्योग आहेत आणि गेली पन्नास वर्षे तरी हा उद्योग कोकणात अस्तित्वात आहे. असे असले तरी फणसाचा हंगाम संपल्यानंतर चार महिन्यांनी स्थानिक बाजारपेठेतही हे चिप्स मिळणे कठीण होऊन बसते. त्याच्याशी तुलना करता व्हिएतनाम सारख्या देशाने गेल्या फक्त वीस वर्षात फणस उत्पादनात केलेली प्रगती खुपच लक्षणीय आहे. एवढेच नव्हे तर तेथील फणसाच्या जाती सध्या येथे आणून त्याची लागवड केली जात आहे हे अजुन एक विशेष.
![]() |
| व्हिएतनाम मधील फणस प्रक्रीया प्रकल्प |


Comments