फणसाचं काय करायचं?
प्रथम थोडासा स्वानुभव लिहितो.
आमच्याकडे फणसाची तीनच लागती झाडं आहेत. जेंव्हा सात वर्षापुर्वी मुंबई सोडून
आम्ही आमच्या गावाला कायमचे रहायला आलो तेंव्हा दोन झाडे लावून नुकतीच दोन वर्षे
झाली होती आणि एका जुन्या मोठ्या झाडाच्या फळांमध्ये भरपुर चीक होता आणि गरे इतके
लहान होते की ते काढायचाही आम्ही कंटाळा करत असू. भाजीसाठीही तो फणस इतका चांगला
नव्हता. त्यामुळे एकंदरीत फणसाच्या झाडांकडे आमचे दुर्लक्ष होते. एकदा लक्षात आलं
की त्या जुन्या झाडाच्या खोडाला किडा लागलेला आहे आणि त्यामुळे ते झाड अजुन खराब
होऊ शकतं. मग ती किड काढून टाकून त्या झाडाच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्याही
कापल्या कारण त्याची सावली बाजूच्या आंब्याच्या कलमांवर पडत होती. त्याच्या
दुसऱ्या वर्षी हे झाड फळांनी भरपुर लगडले. ह्यावर्षी त्याची फळे खुप सुधारली होती आणि
चवीष्टही होती. नवीन लावलेल्या दोन्ही झाडांनाही बरेच फणस धरले.
गावातल्या सर्वसाधारण शेतकऱ्यांना
पडतो तो पहिला प्रश्न आम्हालाही पडला तो म्हणजे ह्या इतक्या साऱ्या फणसाच्या
फळांचं करायचं काय? आम्हाला जसा काहीच अंदाज नव्हता तसाच दुर्दैवाने तो
आजुबाजूच्या शेतकरी लोकांनाही नव्हता. मग जेवढे माहितीचे स्रोत होते ते धुंडाळायला
सुरुवात झाली. मग जो माहितीचा प्रचंड महापूर आला त्यातून नेमकं काय करायचं ते
ठरवणंही कठीण गेलं. जेंव्हा आपण प्रत्यक्ष पाण्यात उतरतो तेंव्हाच आपल्याला पोहणे
म्हणजे नेमकं काय असतं ते शिकायला मिळतं तसंच काहीसं आमचं ह्या फणसाच्या बाबतीत झालं.
पण फणसाचा ज्या विविध प्रकारे वापर करता येतो तो पाहून मन अचंबित झालं. कोकणातल्या
नेहमीच्या फणस चिप्स म्हणजेच तळलेल्या गऱ्यांबरोबरच फणसाच्या गऱ्यांचे पीठ, पापड
असे अनेकविध प्रयोगांना सुरुवात झाली.
माहितीच्या शोधामध्ये मिळालेल्या
फणसाच्या फळांच्या विविध उपयोगांची ही यादी:
·
अतिकोवळा फणस: ह्याला कुयरी म्हणतात. बाहेरचे साल काढून उरलेल्या अख्ख्या
फळाची भाजी केली जाते.
·
कोवळा फणस: ह्याच्या मध्ये असलेला मधला दांडा ज्याला आमच्याकडे पाव म्हणतात ती
व बाहेरची साल वगळता अख्ख्या फळाचा भाजी साठी वापर करता येतो. ह्याचाच सध्या विविध
प्रकारे प्रक्रीयेसाठी वापर करून व्हिगन मीट अल्टरनेटीव्ह म्हणून वापर केला जातो.
·
कच्चा परंतु तयार फणस: ह्यातील गऱ्यांपासून चिप्स (तळलेले गरे), पीठ तसेच हे
शिजवून त्यापासून पापड, विविध पदार्थ उदा. वडे, भाजी (रत्नागिरीत त्याला उक्कडगरे
हे नाव आहे.) हे गरे विविध प्रक्रीया करून टिकवता येतात उदा. फ्रोझन स्वरूपात,
वाळवून, मिठाच्या पाण्यात.
·
पिका फणस: पिके गरे एक फळ म्हणून थेट खाण्यासाठी वापरले जातेच पण त्याच्या
जातीनुसार त्याच्यावर प्रक्रीयाही करता येते. बरका (सिंधुदुर्ग, गोव्यात ह्यालाच
रसाळ म्हणतात) जातीच्या गऱ्यांपासून पल्प तयार करून त्याचे विविध पदार्थ
आईस्क्रीम, फणसपोळी, सांदण, जॅम तयार करता येतात. हा पल्प कॅनिंग करून अधिक
काळासाठी टिकवून ठेवता येतो. जे कापे गरे असतात त्याचा थेट खाण्याबरोबरच मुरंबा,
खीर, आईसक्रीम वगैरेसाठी वापर करता येतो. हे गरे वाळवूनही वापरले जातात.
·
आठीळा: फणसाच्या बिया म्हणजेच आठीळा. ह्या आठीळा शिजवून खाता येतात. त्या
वाळवून त्याचे पीठ करूनही वापरता येते.
·
चारखंड: तयार फणसातील पात्या व चारखंड बऱ्याचवेळा शेतकरी गुरांसाठी चारा
म्हणून वापरतात. हा उन्हामध्ये वाळवून नंतर त्याचा उपयोग करता येतो. एका ठिकाणी
अशीही माहिती मिळाली की त्याची हिरवी काटेरी साल काढून उरलेल्या भागाची भाजी करता
येते.
·
पाने: फणसाच्या पानांचा शेळीपालनामध्ये चारा म्हणून चांगला उपयोग होतो. मंगळूर
भागात फणसाच्या पानांच्या द्रोणात वाफवलेली इडली ही एक खास रेसिपी आहे. फिलिपीन्स Mary May Dacanay ह्या एका कलाकाराने फणसाच्या पानांवर
सुंदर चित्रे कोरली आहेत. ती तिच्या MM Dacanay ह्या फेसबूक पेजवर पहायलाही
मिळतात.
·
लाकूड: फणसाचे लाकूड चांगले टिकाऊ व मजबूत असते त्यामुळे इमारती लाकूड तसेच
फर्निचरसाठी त्याचा वापर लोकप्रिय आहेच.
तर अश्या ह्या बहुगुणी फणसाच्या
वापराचे इतके पर्याय समोर आहेत की शेफ (रेस्टॉरंट चालवणारे आणि घरातलेही), शेतकरी आणि
उद्योजक ह्यांना करतील तितके विविध प्रकारचे काम उपलब्ध आहे. फक्त ग्राहकांपर्यंत
पोचणे, त्यांना ह्याचे महत्व पटवणे हे करणे गरजेचे आहे.
कोकणात असलेल्या फणसाच्या झाडांना उपयोगात कसं आणता येईल, त्यामध्ये काय अडचणी आहेत, त्यावर काही उपलब्ध असलेले उपाय ह्यावर पुढच्या भागात.

Comments