कोकणी खाद्यकथा- ३

एका भल्या सकाळी संपर्कात असलेल्या एका जरा सुशिक्षित  आणि सामाजिक कार्यात रस असणाऱ्या माणसाचा फोन आला. “तुम्ही इतके दिवस येताय पण आमचे लोक काही साथ देत नाहीत. पण गावात काहीतरी चांगलं व्हायलाच पाहिजे. आज संध्याकाळी याच. गट स्थापनच करून टाकू. जेवायला आमच्याकडेच या.” “जास्त त्रास करून घेऊ नका.” इति मी. “अहो त्रास कसला आलाय त्यात. आम्ही कोकणातली माणसं तुम्हाला देऊन देऊन काय देणार कुळथाचं पिठलं आणि भात.” “येस. व्हेरी मच लूकिंग फॉरवर्ड टू युवर कुळथाचं पिठलं!” सध्या पुस्तकं वाचून मी मनातल्या मनात इंग्रजी बोलण्याचा आटोकाट सराव करत होतो. आणि तसंही मावशींच्या खानावळीतलं तथाकथित घरगुती फुळकवणी खाऊन आता कायमस्वरूपी कंटाळा आला होता.

त्यांच्या घरीच संध्याकाळी मीटींग सुरू झाली. इकडच्या तिकडच्या गप्पा, गावातले लोक जमा होईपर्यंत बराच वेळ गेला होता. रात्रीचे आठ वाजले होते. मीटींग शेवटी सुरू झाली. लोकांना उत्साह चढला होता. बाकीचे लोक कसे साथ देत नाहीत. राजकारण विकासाच्या कसं आड येतं वगैरे गोष्टींना ऊत आला होता. मी त्यांच्या स्वयंपाकघराच्या खिडकीबाहेरच बसलो होतो आणि मला कूकरची शिट्टी ऐकू आली. एकाबाजूला नारळ खवण्याचा आवाज येत होता. जरावेळानी मोहरी तडतडली. लसणीचा सुगंध नाकात शिरला. काही मिनिटांनंतर उकळत्या कुळथाच्या पिठल्याचा खास असा सुवास आसमंतात दरवळला. “आई म्हणते त्याप्रमाणे कुळीथ व्यवस्थित भाजून घेतलेले असणार पीठ तयार करण्याआधी.” माझी भुक व्यवस्थित पेटवली गेली होती.

“तुमी तां सगला म्हणता तां बराबर. आमी तुमांस गट तयार करून द्येव. बांबूपन लाव. पन हयां मरणी वांदरांचा काय करायचा?” धर्मा गुळेकरनी टाकलेल्या ज्वलंत प्रश्नामुळे मीटींग पुढे तासभर चालणार ह्याची निश्चिती होती. मी मनातल्या मनात सद्गुरूंचे विचार आठवून बघितले. ते म्हणतात त्याप्रमाणे तुमची कार्यक्षमता रिकाम्या पोटी सर्वाधिक असायला पाहिजे. स्वयंपाकघरातून आवाज आला. “ए तनू! आता अभ्यासाचं पुस्तक बाजूला ठेव. जेवून घे आधी.” मला असं म्हणणारं तिथे कोणीच नव्हतं. आसक्ती हे सर्व दुःखांचं मुळ आहे असे सद्गुरूंचे काही विचार नक्की असतील असं स्वतःला समजावत राहिलो.

शेवटी दिड तासाने मीटींग संपली. एक जण जाता जाता जखमेवर मीठ टाकत बोलला, “आम्हाला माहिती होतं ह्या मिटींगा कधी वेळेत संपत नाहीत त्यामुळे आधीच जेवून आलो आम्ही.” “चला जेवल्याशिवाय जाऊ नका.” यजमान म्हणाले. भुक आता मेली होती आणि परतायची घाई झाली होती. मी बळेबळेच थंड झालेला पिठलं भात कोंबला आणि तिथून कलटी मारली. साला आपलं नशीबच पांडू!
--------------

Comments

Popular posts from this blog

A Psycho-financial Experiment

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी