कोकणी खाद्यकथा- १

आमच्या आजीला विस्मरण होत चाललंय. चालणं फिरणं संपलंय. पलंगावर कायम बसून ती त्याच त्याच गोष्टी सांगत राहते कधीही गेलं तरी. त्यामुळे पहिलं वाक्य ऐकलं कि ती पुढे काय सांगणार ते आता माहीत असतं. मे महिन्यात पडवीत फणसाचे गरे तळण्याचा उद्योग चालू असतो. सगळीकडे चुलीच्या धुरामध्ये मिसळलेला गरम खोबरेलाचा, कच्च्या फणसाच्या गऱ्यांचा असा एक संमिश्र वास पसरलेला असतो.

आजी सांगायला लागते. “आमच्यावेळी तळलेल्या गऱ्यांचं एवढं फारसं काही (महत्व) नव्हतं. आम्ही कच्च्या फणसाचे गरे वाळवत असू. बरे एकदम असे खडखडीत वाळले की मग जात्यावर दळायचे आणि त्याचं पीठ करून ठेवायचं. श्रावणाचे सगळे उपास मुळी आमचे गऱ्याच्याच पीठावर. मग त्यात हे पीठ जरा तुप घालून भाजून घ्यायचं. गुळ पातळ करून घ्यायचा त्यात हे पीठ घालायचं आणि लाडू वळायचे. फारसं काही नाही. आम्ही त्यात अजुन काही घालत नसू. आधी मुळी काही फारसं नसायचंच त्यात आजच्यासारखे काजू बीजू घालायला. नुसते लाडू नाही हां आम्ही त्याची थालिपीठं पण भाजू. आणि कश्यावर माहितीये?” आजी रंगात आलेली असते. माझ्याकडे हात दाखवत म्हणते, “तुमच्या गोड्या तेलावर नव्हे. रातांबतेलावर. आमच्याकडे माहेरी दरवर्षी त्याचे गोळे करून ठेवत असत. थालिपीठं अशी थापायची.” हाताने गोल थापायची खूण करत ती बोलत राहते. “मग रातांबतेलाचा गोळा अस्सा तव्यावर फिरवायचा आणि थालिपीठ भाजायचं. काय खाशील?” म्हणजे तिला म्हणायचं असतं की तू खातच राहिला असतास.

कधी कोणीतरी मुंबई पुण्याचं इंग्लीश मिडीयम मध्ये शिकणारं पंतवंडं आलेलं असतं. ते आपल्या बाबाजवळ जाऊन हळूच म्हणतं. “पपा थिस ऑल साऊंड्स सो एक्झॉटीक!” पपा सुध्दा मान डोलवत म्हणतो. “या रिअली!”
-----------------

Comments

Vikram said…
फारच सुंदर लेख. अशा पाककृती जपून ठेवणे आणि त्या करत राहणे गरजेच आहे. हा ठेवा जपला पाहिजे.

Popular posts from this blog

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी

ध्वनीक्षेपकांचा उन्माद