लगे रहो!

गेल्या दिड महिन्यात कामाच्या निमित्ताने फिरताना काही चर्चा गप्पा झाल्या. त्यांचा एकमेकांशी काही तसा संबंध नाही पण त्यातले बिंदू जोडत गेलो तेंव्हा एक समान धागा मिळाला.

प्रसंग- १

छत्तीसगड राज्यातील एक बऱ्यापैकी अंतर्भागातील गाव. मायनिंगमुळे विस्थापित झालेल्या बहुतांश बैगा आदिवासींची वस्ती. अगदी वीस वर्षांपर्यंत बाहेरच्या जगाशी अगदी थोडका गरजेपुरता संपर्क ठेवत, आपला तीर कमठा घेऊन जंगलात शिकार करणारे, कमीत कमी कपड्यात राहणारे हे लोक विस्थापित झाले आणि त्यांचा स्वतःला विकसित मानणाऱ्या लोकांशी अगदी जवळून संपर्क येऊ लागला. लोक सांगत होते, “पुर्वी आमच्याकडे लग्नं चार पाच हजार रुपयात होत होती. हुंड्याची पध्दत आम्ही अजुनही पाळत नाही पण आता आम्हाला पाहुण्यांसाठी विदेशी दारूचे खंबे, मटणाची महागडी जेवणं, डिजे पार्ट्या, गाड्या ह्या गोष्टींवर खर्च करावा लागतो. लाखभर रुपयेही पुरत नाहीत. पुर्वी रोख पैसा फारसा हाताशी नव्हता पण त्याबद्दल कधी दुःख वाटले नाही. आता गरीबीची लाज वाटायला लागली.”

प्रसंग- २

आकाराने झपाट्याने वाढणाऱ्या बंगलोर महानगराच्या छायेत असणाऱ्या कोलार जिल्ह्यात गेलो होतो. तिथे कसा दुष्काळ येतो, शेतीचं उत्पन्न कसं कमी झालं आहे, लोक कसे अतिशय कष्टाळू आहेत, येथे शेतकरी आत्महत्या होत नाहीत वगैरे कथा ऐकल्यानंतर जेंव्हा प्रत्यक्ष गावात गेलो तेंव्हा गावात शेतात राबणारे हात फक्त म्हाताऱ्याकोताऱ्यांचे मिळाले. तरणे, मध्यम वयीन पुरुष, स्त्रिया त्या दुपारच्या वेळेला गावात कुठेच दिसले नाहीत. ते कुठे आहेत असं विचारलं तेंव्हा समजलं कि तिथे दुरच्या ठिकाणी मजुरीसाठी जातात आणि रात्रीच घरी परत येतात. मजुरीचे दर दिवसाला पाच सहाशे रुपये. घरातील सर्वच जण कुठे न कुठेतरी कामाला जातात. महिन्याला तीस ते चाळीस हजार प्रत्येक घरात उत्पन्न येतंच. पण खर्च असे त्या गावात काय आहेत की स्वतःची शेती सोडून घरातील प्रत्येक माणसाला मजुरीसाठी जायला लागत ह्या प्रश्नाचं उत्तर डोळे उघडणारं होतं. आज मुलांना महागडे मोबाईल, गाड्या पाहिजेत, सरकारी नोकरीसाठी लाच द्यायला रोकड लागते,  समारंभात मिरवायला सोन्याचे दागिने हवे असतात. हे सगळं केलं नाही तर आजुबाजुच्या लोकांना काय उत्तर देणार आम्ही. मग लोक पत नसताना कर्ज देण्याचं काम करणाऱ्या, वसुलीचं काम निष्ठूरपणे करणाऱ्या खाजगी मायक्रोफायनान्स कंपन्यांकडे जातात. कर्जाची परतफेड करण्यासाठी काबाडकष्ट करत राहतात.

प्रसंग- ३

मुंबई शहरातील एक सुखवस्तू लोकांची कॉलनी. त्यात राहणारं एक जोडपं. नवऱ्याला त्याच्या आयटी फायनान्स सेक्टरमधील नोकरीमुळे बऱ्यापैकी पगार. जोडप्याला एक एकुलता पाच वर्षांचा मुलगा. त्याचा वाढदिवस होता. कॉलनीतील मुलाबरोबर खेळणाऱ्या त्याच्या सवंगड्यांना बोलावलं होतं. वाढदिवसाला चांगला महाग केक, आलेल्या मुलांसाठी खाऊ, गिफ्ट्स ह्यावर बऱ्यापैकी खर्च केला होता. सगळा समारंभ पार पडल्यानंतर तो मित्र सहज गप्पा मारत होता. “च्यायला, आपण किती साधे होतो रे! आपल्या लहानपणी घरात आपल्या आवडीचा एखादा पदार्थ केला आणि वर्गात पेन्सिली वाटल्या कि दिवस साजरा होत होता. आताची हि पोरं बघ. आली, केक कापला, टाळ्या वाजवल्या, मुलाला गिफ्ट दिलं आणि लगेच विचारायला लागली रिटर्न गिफ्ट कुठे आहे?”

आणि हाच तो समान धागा ह्या तीन प्रसंगांमधला:

आतापर्यंत तुम्ही फक्त शेजाऱ्यांशी बरोबरी करायला कमावत होतात. आता तुम्हाला शेजाऱ्यांच्या अवाजवी मागण्या पुरवायला कमवायचंय. रिटर्न गिफ्ट मागणाऱ्यांची नवीन पिढी तयार होत आहे.

मुन्नाभाय! लगे रहो!

-    सचिन पटवर्धन

११-८-२०२२

Comments

Unknown said…
So true. Worth introspecting!
Vineel said…
Very pertinent observations and connecting the dots. In fact the rural consumption story and aspirations of the rural people is projected as an economic growth engine. It may be a boosting factor for the rural economy yet is at direct conflict with the original lifestyle of Indian rural people which is based on respectful consumption and not on consumerism.
कॉमेंटसाठी धन्यवाद विनील. जेंव्हा आपण ग्रामीण आणि शहरी असा भेद करतो तेंव्हा ज्या गोष्टींचा मी विचार केला आहे त्यात प्रामुख्याने सर्व प्रकारचा व विविध भौगोलिक परिस्थितीतील समाज एकमेकांच्या संपर्कात अधिकाधिक येत आहे त्यामुळे साधारणतः श्रीमंत आणि powerful लोकांचे अंधानुकरण करण्याचे प्रमाण त्यामुळे वाढले आहे आणि त्यातही एकसुरीपणा आहे असा एक पॅटर्न दिसतो.

Popular posts from this blog

A Psycho-financial Experiment

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी