रोझी
घरात कुत्रा पाळायचा की नाही ह्याविषयी दुमत होतं. प्राणी पाळायचा म्हटला तर त्याची जबाबदारी आली. मुंबईसारख्या शहरात बराच काळ ब्लॉकमध्ये राहिल्यामुळे आणि पायाला चक्र लावून फिरायची सवय असल्यामुळे मला ती अजिबात नको होती. मुंबईत असताना मला एकदा एक भटका कुत्रा चावल्यापासून प्राण्यांविषयीच काय प्राणीप्रेमी लोकांविषयीही मला फारसं प्रेम नव्हतंच पण भटक्या कुत्र्यांना पार्ले जी ची बिस्कीटं आणि कावळ्यांना शेव चिवडा घालत गावभर फिरणाऱ्या लोकांबद्दल तर माझ्या मनात तीव्र तिटकारा होता. आधीचा मांजरं पाळण्याचा अनुभव घेतल्यानंतर आता प्राण्यांची कौतुकं बस झाली असं माझं स्पष्ट मत होतं. आमच्या घरात कुत्रा पाळायचा अशी विचारधारा असलेल्या पक्षाकडे दोन आणि नाही मत असलेल्या पक्षाकडे तीन असे बलाबल होते त्यामुळे आमचेच सरकार स्थिर आहे असं समजून मी स्वस्थ होतो.
आणि ऑगस्ट २०१६ मध्ये ती
सरळ घरात आली म्हणजे विरुध्द पक्षाने आमच्या मताला सरळ सरळ ठोकरून तिला आणली. हीच
ती रोझी. दोन महिन्यांच्या ह्या पिल्लाचं बारसं त्याच्या जन्मघरातच झालेलं होतं. जिथे
कुत्राच नको होता तिथे ही कुत्री घरात आली. म्हणजे आता तिला जेंव्हा पिल्लं होतील तेंव्हा
हातातील कामं सोडून त्यांची फटावळ आम्ही सर्व सांभाळत बसलोय असं चित्र डोळ्यासमोर
तरळून माझी नाराजी अधिकच तीव्र झाली होती. कदाचित हे सर्व कमी होतं म्हणून एक दिवस
कोणीतरी एक मांजराचं पिल्लू आमच्या घराजवळ सोडून गेलं आणि तेही आमच्या घरात नांदू
लागलं.
तसं मांजर आणि कुत्र्याचं
वैर सगळ्यांना माहित आहे पण हे दोघे समवयीन भिन्न प्रजातींचे प्राणी आमच्या घरात
एकत्र वाढत होते आणि त्यांचे अनोखे मैत्र बघत माझी त्याबद्दल नाराजी कधी संपली मला
समजलंही नाही. साधारण स्वच्छ राहणाऱ्या मांजरीला घरात सर्वत्र संचाराला परवानगी
होती पण ह्या मैत्रिणीच्या नादाने रोझीसुध्दा घरात सगळीकडे फिरायला लागली आणि
एकदोनदा सरळ पलंगावर येऊन बसल्यामुळे तिच्या गळ्यात पट्टा आणि साखळी आणायची वेळ
आली आहे हे लक्षात आले. माझ्या मुलाला, चैतन्यला, ह्या दोन प्राण्यांचा प्रचंड लळा
लागला होता. त्या दोघींचे एकमेकांच्या खोड्या काढणे कौतुकाने बघत आमचे कित्येक तास
गेले असतील. मांजर रोझीवर गुरकावून झाडावर उंच जाऊन बसत असे आणि तिथून खाली
भुंकणाऱ्या रोझीला चिडवत असे. रोझी कधीकधी त्या मांजरीची शेपटी धरून गरागरा फिरवत
असे. आणि तरीही दुपार झाली की मांजरी त्याच रोझीच्या कुशीत बिनधास्त झोपून जात
असे.
काही महिन्यांनी मांजरी
गाभण राहीली आणि जसे रोझीचे ते शेपटीला धरून गरागरा फिरवणे असह्य होऊ लागले तसे ती
आमच्या जवळच्या दुसऱ्या घरात निघून गेली. मग रोझी एकटीच राहिली. हे पाळीव प्राणी
जेंव्हा खुल्या नैसर्गिक वातावरणात वाढत असतात तेंव्हा त्यांच्या अंगभुत प्रेरणा
कश्या आपसुकच विकसित होतात त्याचे मग भन्नाट दर्शन होऊ लागले. ती जसजशी मोठी झाली
तेंव्हा काही महिन्यांनी आजुबाजूच्या पाळीव तसेच वन्य प्राण्यांवर, पक्ष्यांवर
भुकू लागली. एकदा भल्या सकाळी घराजवळ आलेल्या रानटी सश्याचा ती दुरवर पाठलाग करत
गेली. सात आठ महिन्यांची असताना एकदा एका कोल्ह्याच्या कळपालाही तिने पळवून लावले.
एका कुठल्यातरी पक्ष्याची शिकार करून त्याला खाल्ले. बागेत येणाऱ्या वानरांनाही
सळोपळो करू लागली. तिची आता एवढी सवय झाली आहे की तिच्या भुंकण्याच्या वेगवेगळ्या
आवाजावरून ती नेमकी ज्या प्रकारच्या जीवावर भुंकत आहे म्हणजे पक्षी, प्राणी कि
मानव इतके आता आम्हाला सांगता येऊ शकते. एकदा एका भर दुपारी तिने एका फणाधारी
नागाला जवळजवळ अर्धा तास आमच्या घरात प्रवेश करण्यापासून रोखून धरले होते.
जी तिची गोष्ट मला अजिबात
नको होती ती रोझी घरात आल्यानंतर साधारण सव्वा वर्षानी झालीच. रोझीला पिल्ले झाली.
आम्हाला वाटलं गाईम्हशी वितात तेंव्हा जसं गोपालकांना दक्ष राहून वार पडली की नाही,
जागा स्वच्छ आहे कि नाही वगैरे गोष्टींची काळजी घ्यायला लागते तसे काही असेल की
काय पण रोझीला ज्या खोलीत बांधून ठेवतो तिथे तिच्याबरोबर अजुन डोळे न उघडलेले
इवलेसे चार जीव होते. मग एक वेगळंच रुप रोझीचं बघायला मिळालं. पिल्लं साधारण दिड
महिन्याची झाल्यावर रोझीने त्यांना कुत्र्यांची जी काही जीवनकौशल्यं असतात त्या
सगळ्याचे अनुभविक प्रशिक्षण चालू केले होते जणू. कधी दुरपर्यंत पळायला लाव तर कधी
एखादा उंदीर पकडून आणुन त्याची शिकार कशी करायची ते शिकव असे सगळे प्रयोग करायला
लावत असे. आणि जे पिल्लू हे व्यवस्थित करणार नाही त्याच्यावर रागाने भुंकणे,
त्याला दुध लुचायला न देणे असे सगळे साम, दाम, दंड वापरून हे केले जात होते.
Comments