पोषणाचा फॉर्म्युला

शाळेत, कॉलेजात पोषणाचे पिरॅमिड त्रिकोण शिकवले जातात. कार्बोहायड्रेट, प्रोटीन इ. चे प्रमाण कसं असावं ते घोकून घेतलं जातं. इंटरनेट, टिव्ही वरून दोन वेळा जेवा की चार वेळा खा ह्याबद्दल सल्ले, चर्चा, वाद झडत असतात. कुठल्या पदार्थांमध्ये कुठले व्हिटॅमीन, मिनरल, अँटी ऑक्सिडंट असतात वगैरे विषयावरून त्यांच्या भरभरून जाहिराती केल्या जात असतात. आणि तरीही ह्या सर्व गदारोळात एका बाजुला सुखवस्तू समाजात लोकांचे कमरेचे घेर वाढत चालले आहेत तर गरीब वर्गात कुपोषणाचं प्रमाण वाढत चाललं आहे. योग्य पोषणाचा काही एखादा सरधोपट फॉर्म्युला कुठे असेल कि ज्यासाठी दररोज किती खाल्लं त्याचं वजन, कॅलरी ह्यांचा ताण न घेता आयुष्य जगता येईल हा प्रश्न मला बरेच दिवस पडतोय.

 

खरं तर शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात स्वच्छ हवा, पाणी, वनराई वगैरे असल्यामुळे लोकांचं आरोग्य एकदम चांगलं असलं पाहिजे अशी लोकांची अपेक्षा असते परंतु मी जेंव्हा रत्नागिरी जिल्ह्यात आजुबाजूला बघतो तेंव्हा बहुतांश लोक विविध आरोग्याच्या समस्यांनी गांजलेले असतात. इथल्या बऱ्याच स्त्रिया व काही पुरूषही रक्तक्षयाने ग्रासलेले असतात. काम करायची शक्ती आणि इच्छा फारशी नसते. इथल्या अनेक स्त्रिया अश्या दिसतात की त्या कुठल्याही क्षणी मध्येच तोल जाऊन कोसळून खाली पडतील असं वाटतं. आणि त्यातील काहीजणींच्या बाबतीत खरोखर तसं होतंही.

 

आजमितीला शासन कृपेने रेशन व्यवस्थेत असलेला जो काही भ्रष्टाचार आहे तो जमेस धरूनही आमच्या गावातल्या बहुतांश दारिद्र्य रेषेखालील कुटूंबांना वर्षाला लागेल तेवढा स्वस्त धान्य पुरवठा होत असतो परंतु डाळी, खाद्यतेल आणि भाज्या ह्यांचे दर ह्या वर्गाच्या आवाक्याबाहेर आहेत असे काही काळ मानूया. परंतु अगदी काही वर्षांपुर्वीपर्यंत तर आर्थिक स्थिती आतापेक्षा अधिक वाईट होती. बाजारामध्ये भाजीपाला नव्हता, शेतीमध्ये पाण्याचे पंप नव्हते, गावामध्ये उद्योगधंदे नव्हते. मला आठवतंय माझ्या आजोळी अंजनवेल येथे तीस वर्षांपुर्वीपर्यंत स्त्रिया दुरच्या डोंगरांच्या सड्यावरचं गवत कापून त्याच्या मोठमोठ्या वरंडी बांधून डोक्यावरून घेऊन चढाव उतारांच्या कठीण पायवाटांनी पाच पाच किलोमीटर चालत घेऊन येत असत. सध्या असं काम करण्याची गरज राहिली नसली तरी तेवढी शारिरीक क्षमता आजच्या स्त्रियाच काय पुरुषांमध्येही शोधून सापडणार नाही. अधिक आर्थिक गरीबीतही त्या महिला रक्तक्षयग्रस्त नव्हत्या.

 

मला वाटतं की ह्याच्यामध्ये फक्त आर्थिक परिस्थिती नव्हे तर चांगल्या घटकांची उपलब्धता आणि आपल्या आयुष्यातले प्राधान्यक्रम हेही महत्वाचे घटक आहेत. रोजच्या जेवणासाठी डाळी, भाज्या खरेदी करायचे की मोबाईल, टिव्हीचे रिचार्ज मारायचे की आजची संध्याकाळची दारूच्या गुत्त्यावरची फेरी चुकवायची नाही असे प्रश्न बऱ्याच मोठ्या लोकसंख्येला पडत असतात. एक वर्ग असाही आहे की हातात पैसे आहेत आणि परवडतं, राहवत नाही म्हणून मैद्याचे पिझ्झे आणि तेलकट ग्रेव्ह्यांच्या भाज्या खात कित्येक दिवस काढतो. लोकांच्या ह्या वर्तनावर अनेक संशोधनात्मक पेपर लिहिले गेले आहेत पण त्याचा प्रत्यक्ष कृती करण्यामध्ये फार कोणी वापर करताना दिसत नाही. केलाच तर तो तयार खाद्यपदार्थांच्या कंपन्या नक्की करतात.

 

परवा माझ्या सासुरवाडीला जेवत असताना मला पडलेल्या सुरूवातीच्या प्रश्नाच्या उत्तराचा एक भाग आपल्या समोरच दिसत असल्याचं डोक्यात क्लिक झालं. मोठं एकत्र कुटूंब असल्यामुळे जेवणाचे वैयक्तिक चोचले ह्या घरात पुरवले जात नाहीत. सतत वेगवेगळे व्हिडिओ बघून दररोजच्या स्वयंपाकात नवनवीन प्रयोग करणे इथे परवडत नाही. आजी, पणजी कडून चालत आलेल्या ज्याला कुठलीही फाईव्हस्टार रेस्टॉरंट व्हॅल्यू नाही अश्या साध्या सोप्या कृती वापरून केलेले मोजके चार पाच पदार्थ दररोजच्या जेवणात असतात. सण वगळता गोड आणि तळलेल्या पदार्थांचा फाजिलपणा नसतो. मोकाट आग्रह नसतो आणि त्याचवेळेस जेवणारा व्यवस्थित पोटभर जेवेल ह्यावर कटाक्ष असतो. तांदुळ, नाचणी, कडधान्ये, भाजीपाला, दुध हे घरी खाण्याआधी स्वतःच्या जमीनीत पिकवलं जातं. घरातले लोक त्यासाठी लागणारे शारिरीक कष्टही करतात. मतभेद झाले तरीही सामंजस्य, खेळीमेळीचे वातावरण टिकवून ठेवण्यावर भर असतो. जे खाल्लं जातं ते अश्या चांगल्या शारिरीक आणि मानसिक सवयींमुळे व्यवस्थित पचवलंही जातं.

 

जेवणातला आणि जीवनातला असा समतोल साधणारी परिस्थिती असलेली आणि ती जपून ठेवणारी, पुढे त्याचा विकास करणारी अशी अगदी मोजकीच घरं उरली आहेत तीही फक्त ग्रामीण भागात. ह्या घरांमध्ये ज्याला आपण इंग्रजीत ’balanced nutrition’ म्हणतो त्याचे फॉर्म्युले परंपरेने चालत आलेले आहेत. रेटा नुसता शहरीकरणाचा नाही तर बदलणाऱ्या जीवनशैलीचाही आहे. फॉर्म्युल्यामधल्या व्हेरिएबल्सच्या त्याकाळातील प्रचलित व्हॅल्युज आपल्या आजीआजोबांच्या पिढीला कळत किंवा नकळत माहित होत्या. पण त्यांनी दिलेल्या फॉर्म्युल्यामधल्या ’क्ष’ चे आजच्या काळातील ’मुल्य’ शोधून काढायचे काम आपल्यालाच करावे लागेल.

---------------------------------

Comments

Amiy said…
विचार करण्यास भाग पाडणारा लेख लिहिला आहेस. Nutrition फॉर्म्युला आपआपल्या परीने शोधावा लागेल....
पूर्वापार चालत आलेल्या wisdom वर भर दिला आणी गोष्टी अमलात आणल्या तर काही प्रमाणात न्यूट्रिशन साधता येईल..
Unknown said…
वर लिहिल्याप्रमाणे हल्ली खूप ठिकाणी वेगवेगळी उपकरणाने माणसाची मेहनत करण्याची इच्छा आणि गरज कमी केली आहे.तसेच विविध योजनांधून मिळत जाणारे धान्य त्यामुळे काम करायची गरज कमी.पूर्वी स्वतः पिकवून खाणारे बिना खता च्यायापरिणामामुळे सकस अन्न खात होते.
Vineel said…

ग्रामीण भागातील लोक स्वतः चे परंपरागत शहाणपण आणि ओळख गमावत चालले आहेत आणि शहरी जीवन शैलीचे अंधानुकरण करण्याचा अर्धवट प्रयत्न करत आहेत असे दिसते. त्यामुळे त्यांची अवस्था त्रिशंकू सारखी झालेली आहे.
काही निरीक्षणे आणि त्या अनुषंगाने येणारे काही प्रश्न आणि विचार, हा लिखाणाचा फॉर्म छान आहे. मला आवडला. फार शास्त्रीय किंवा वैज्ञानिक किंवा तांत्रिक बाबीत न जाता, आजूबाजूला दिसणाऱ्या , घडणाऱ्या गोष्टींबद्दल ची निरीक्षणे नोंदवणे आणि त्यावरून काही विचार मांडणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतः विचार करायला प्रवृत्त करणे हे या लेखातून होत आहे.

Popular posts from this blog

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी

ध्वनीक्षेपकांचा उन्माद