कोकणचं गुणी कार्टं - फणस (भाग १)



आपल्याकडे एक जुनी म्हण आहे. “आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्टं”. सध्याच्या आधुनिकतेच्या जमान्यात ती म्हण आपल्या अश्या अनेक जुन्या चांगल्या गोष्टींच्या बाबतीत आपण विरूध्द करून वापरत असतो. कोकणातला फणस हे असंच एक स्वतःचं गुणी पण सवतीच्या मुलाप्रमाणे वागवलं जाणारं कार्टं.

 

कोकणात, प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही फणसाचे वृक्ष लोकांनी तोडले नाहीत म्हणून खुप मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत. ह्यातल्या बऱ्याचश्या न तोडण्यामागे पुर्वजांची आठवण हा खुप मोठा भाग असतो. ज्यांच्या आठवणीसाठी हे वृक्ष तोडलेले नाहीत ते सध्याच्या कोकणवासीयांचे पुर्वज अश्याप्रकारे फणसाची लागवड उगीच करत नव्हते आणि मोठाले प्रचंड वृक्ष जीवापाड उगीच जपतही नव्हते. गावातल्या जुन्या जाणत्या लोकांना बोलतं केलं किंवा किमान त्यांच्या जुन्या जमान्याचं कौतुक सांगणाऱ्या, वरकरणी बोअरिंग वाटणाऱ्या गोष्टी नीट लक्ष देऊन ऐकल्या तरी फणस ह्या झाडाचे अनेक अनोखे पैलू समोर येत जातात.

 

हल्ली आपण अन्नसुरक्षा सरकारी रेशनशी जोडत असतो पण पुर्वीच्या जमान्यात ह्या लोकांनी फणसाचे अन्न सुरक्षेसाठी असलेले महत्व बरोबर ओळखले होते. हे वृक्ष एखाद्या वर्षी फळे देण्यास पुर्णतः विसरून गेले असे कधी ऐकीवात नाही. फणसाची फळं ही जुन्या जमान्यातल्या लोकांचा कार्बोहायड्रेटचा एक खुप मोठा स्रोत होता. त्याचे पिकलेले गरे आणि त्याच्यातल्या आठीळा म्हणजे विविध जीवनसत्व आणि खनिजद्रव्यांचा एक मोठा खजिनाच. वर्षाचे एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने आणि त्यानंतरही ह्या फळांचा एक खुप मोठा आधार ह्या लोकांना होता. बरेच लोक निव्वळ फणसाच्या पिक्या गऱ्यांवर अख्खा दिवस काढत असत. त्याच फळांच्या राहिलेल्या आठिळा थोड्या वाळवून माती लावून जमिनीत खड्डा करून पुरुन ठेवल्या जात आणि लागतील तश्या नंतर खाण्यासाठी वापरल्या जात असत. फणसाचे कच्चे गरे वाळवून त्याचा उपयोग नंतर भाजीसाठी, पिठ तयार करण्यासाठी केला जात असे. बऱ्याच घरांमध्ये कोवळ्या फणसाचा साकटा मीठाच्या पाण्यात ठेवून नंतर लागेल तशी भाजी तयार करण्यासाठी वापरला जात असे.

 

आपल्याकडे काही चुकीच्या संकल्पना कालपरत्वे तयार झाल्या त्यात ज्याच्याकडे तांदुळ, गहू, ज्वारी अश्या धान्याचा साठा जास्त त्याला श्रीमंत असे समजले जायला लागले आणि फणसावर राहणाऱ्या लोकांना गरीब म्हणून त्यांची अवहेलना केली जाऊ लागली. पुर्वी फणसाचे गरे खाऊन भुक भागवणाऱ्या लोकांकडे रोख पैसा फार नव्हता पण मधुमेह, कोलेस्टेरॉल, दंतविकार, रक्तक्षय अश्या आरोग्याच्या समस्याही त्यांना जास्त प्रमाणात भेडसावत नसत. आज लोकांकडे रोख पैसा आहे पण योग्य आहार पध्दती नसल्याने आरोग्यही बिघडले आहे. सध्या नवनवीन संशोधन होऊन तेच जुन्या लोकांना पटलेले फणसाचे गुण वैज्ञानिक भाषेत मांडून सांगितले जात आहेत. वेगवेगळे स्टार्ट अप तयार होऊन फणसावर प्रक्रीया करणारे उद्योग उभे राहत आहे. एकेकाळी भुकेल्या लोकांना जगवणारे हे अन्न सुपरफूड म्हणून युरोप, अमेरिका वगैरे देशात मान्यता मिळवत आहे. तो दिनही दुर नसेल जेंव्हा तुम्ही एखाद्या आंतरराष्ट्रीय पिझ्झा चेनच्या रत्नागिरी किंवा चिपळूणमधल्या दुकानात जाल आणि व्हीगन मीट टॉपिंगचा पिझ्झा मागवाल व त्यात दुसरं तिसरं काही नसून कोवळ्या फणसाचा साकटा असेल.

 

हे सगळं होत असताना कोकणात आपल्याकडे सामन्यतः काय परिस्थिती आहे? कोकणातल्या जवळपास प्रत्येक गरीब श्रीमंत शेतकऱ्याकडे फणसाची झाडे आहेत. माझ्या अंदाजाप्रमाणे आजमितिला ६० टक्के पेक्षा अधिक फणसाची फळे कोकणात कुठलाही उपयोग केल्याविना वाया जातात. सध्याच्या काळात बऱ्याच वेळा आपल्याकडे लोकांना ह्या फणसाच्या झाडांचा उपयोगापेक्षा जाचच जास्त होतो असं त्यांचं बोलण ऐकलं की जाणवतं. लोकांशी हा विषय छेडला तर पुढील प्रश्न समोर मांडले जातात.

  • ·         एवढ्या फणसांचं करायचं काय?🙅😞
  • ·         खाऊन खाऊन किती खाणार?
  • ·         गिऱ्हाईक आहे कुठे?
  • ·         त्याची पडलेली पानं आणि फळं पावसात कुजून घाण होते. डास चिलटं होतात घराजवळ त्याचं काय करणार?
  • ·         त्या झाडांची सावली इतर झाडांवर पडते आणि बाकी काही धरत नाही. इ. इ........

 

इतकंच काय अनेक लोक फणसाची नवीन झाडं लावायच्या आधीच जुनी झाडं तोडायच्या गोष्टी करत आहेत. किमान लाकडाचे तरी चांगले पैसे होतील हे त्यामागचे आर्थिक गणित! 

असं हे दुर्लक्षित कार्टं ठरलेला फणस कोकणच्या अर्थव्यवस्थेचा गेमचेंजर बनू शकतो का ह्या शक्यतेविषयी पुढच्या लेखात!

Comments

ABHIJEET said…
पुढच्या लेखाची आतुरतेने वाट पाहत आहोत. बाकी माझ्याकडे एक फणसाची मिश्किल आठवण आहे. आंध्राचे Finance secretary (रावत साहेब) बरोबर एक बागायती मूल्य वर्धनाच्या साखळी वर चर्चा चालू होती. साहेब आम्हाला कॉफी पिकाच काहीतरी कराच म्हणून सांगत होते आणि मग विषय इतर पिकांकडे गेला. ते म्हणाले फणस भरपूर आहे पण त्याला पुरेशी मागणी नाही, इतक्यात आमचे CEO साहेब उठले आणि म्हणाले आम्ही तो export करू. दोन मिनिटं सगळा हॉल शांत झाला. आणि नंतर जोरदार हशा पिकला. CEO साहेब खजील होऊन खाली बसले.

अर्थात मी तेंव्हा ज्युनिअर होतो आणि नक्की कोण बरोबर आहे आणि कोण चूक ह्याची पुरेशी जाणीव न्हवती. फणस पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर मुबलक आहे. परंतु त्याचे योग्य पणन होत नाही हे खरं.

Popular posts from this blog

A Psycho-financial Experiment

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी