वेड्या भुलीचे रान

त्याच्या इमेलच्या अवजड अटॅचमेंटचा शेवटचा एमबी अपलोड होऊन अखेर इमेलही सेंड झाला तेंव्हा त्याने सुटकेचा एक दीर्घ सुस्कारा सोडला. रात्रीचे साडेअकरा वाजले होते. तो झोपडीच्या बाहेर आला आणि आपल्या मोटरसायकलवर टांग टाकली. घाईने कीक मारली आणि तो घराकडे निघाला. थोडंसं अंतर पुढे गेल्यानंतर सपाटीवरचा सरळ रस्ता सुरू झाला आणि त्याच्या मोटरसायकलने एकसमान गती पकडली. गेल्या थोडक्या दिवसात अतिशय वेगाने घडत गेलेल्या घटनांचा आलेख त्याच्या मनात आकार घेऊ लागला.

 

दुसरा लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबईत तीन खोल्यांमधल्या आयुष्याला कंटाळलेल्या सुमीतने आणि त्याच्या बायकोने त्यांच्या मुलीसह काही दिवस गावच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला. कित्येक दिवस बंद असलेले घर उघडून स्थिरस्थावर होईपर्यंत दोन दिवस पूर्ण होत होते तोच त्याच्या भावाचा फोन आला. करोना पॉझिटीव्ह झालेले त्यांचे बाबा अचानक ऑक्सिजन पातळी खाली येऊन निर्वतले होते. नवीन निर्बंधामुळे अंत्यविधीसाठी परत जाण्याचा प्रश्नच नव्हता.

 

त्यानंतर दोन दिवसांनी अर्जुन नावाचा एक साधारण उंच काटक माणूस त्यांच्या दरवाज्याबाहेर हजर झाला. “तुमचे वडील गेल्याचं कळलं. आमचा इतक्या वर्षांचा संबंध पण असे अचानक जातीलसे वाटलं नव्हतं. आज माझी मुलं चांगल्या मार्गाला लागली. माझं घर चांगलं झालं ते त्यांच्या मुळे. पण आता तुम्ही मला ह्या जबाबदारीतून मोकळं करा.” असं म्हणत एक चावी त्याने सुमीतच्या हातात दिली. “ही तुमच्या वेड्या भुलीच्या रानाच्या गेटची चावी. मी धाकल्या खोतांना तीस वर्षं व्यवस्थित लक्ष ठेवतो म्हणून शब्द दिला होता. तुमची जमीन आहे तशी ठेवली. आता ते वारले. आता हे तुमच्या हाती परत करतो. मला काही नको.” असं म्हणून तो तसाच मागे फिरून तरातरा चालू लागला.

 

चार डोंगरांच्या दऱ्याखोऱ्यामध्ये वसलेल्या ह्या गावाचा सर्वात उंच भाग म्हणजे हे वेड्या भुलीचे रान. हळूहळू उतरत जाणाऱ्या ह्या खडकाळ जमिनीवर पानगळ झालेल्या ऐन, किंजळ, कुंभिया अश्या वृक्ष्यांचं आणि करवंदी, तोरणं, बोरं ह्यांच्या काटेरी जाळ्यांचे साम्राज्य होते. एका खालच्या टोकाला कोणीतरी पुर्वजांनी लावलेले बरेच जुने आंब्याचे, फणसाचे मोठाले वृक्ष होते. आणि पडझड झालेलं काहीबाही होतं. ह्यांचाच सांभाळ अर्जुन दादांनी इतके दिवस केला होता. सुमीतला ह्या क्षणाला सगळ्यात जास्त आनंद मात्र अर्जुनदादांनी बांधलेली झोपडी पाहून झाला होता. ह्या सर्वात उंच ठिकाणी मोबाईलचा डेटा उत्तम वेगात चालत होता. एकदा का प्रोजेक्टच्या कामाचा शेवटचा इमेल इथून पाठवला की त्याला बरेच दिवस हवा असलेला काही महिन्यांचा ब्रेक त्याच्या बॉसकडे तो मागणार होता. न दिल्यास ह्या नोकरीलाच तो कायमचा ब्रेक देणार होता.

 

त्याच्या विचारांची ही मालिका खंड पावली ती समोर आलेल्या एका उंच सरळसोट सारडोळीच्या झाडाने. त्याचे पांढरे फटक खोड हेडलाईटच्या प्रकाशात डोळ्यात जास्तच भरत होते. इथेच रस्ता वळण घेत होता आणि उतार सुरू होत होता. आता रस्त्यावर लक्ष केंद्रीत करणं आवश्यक होतं. काही अंतर पुढे गेल्यावर त्याला एक कृश मध्यमवयीन स्त्री डोक्यावर अजस्त्र असा लाकडाचा भारा घेऊन जाताना दिसली. तिच्याकडे बॅटरी नव्हती आणि तरीही ती ताठ मानेने झपझप चालत होती. सुमीत थांबला. “ताई एवढ्या अंधारात कुठे चाललात लाकडं घेऊन?” सुमीतने विचारले. “अरे काय सांगू बावा तुस. दोन दिवसांनी तुमचा तो तौक्त्या का कायसा वादल येनाराय ना? मग लाकडां भरून ठिवाय नको. आमचा आपला हा रोजचाच काम. तु हितं थांबू नको. जा घरी पल.”

 

तो मोटरसायकल वेगाने मारत घरापर्यंत पोचला आणि घराचा दरवाजा जोराने ठोठावत बायकोला हाका मारू लागला. बायकोने दरवाजा उघडला आणि उत्साहाने विचारले, “झालं का काम एकदाचं. पण तुला एवढा घाम कसा काय आला. बरा आहेस ना?”

 

त्याला काही दिवसांपुर्वी अर्जुन दादांबरोबर झालेलं संभाषण आठवत होतं. सुमीतने विचारलं होतं की ह्या भागाला हे असं वेड्या भुलीचं रान का म्हणतात बुवा? ते म्हणाले होते की इथे एक वेडसर बाई होती भुली नावाची. ती सारखी लाकडं तोडायला येत असे ह्या भागात. तिच्यामुळे असं नाव पडलं. तुम्हाला हा भाग जास्त माहितीचा नाही. तुम्ही जास्त विचार करू नका. उगाच रात्री बेरात्री बाहेर फिरू नका.” “ही कधीची गोष्ट असेल.” सुमीतने विचारलं होतं. अर्जुनदादा म्हणाले होते, “माझ्या आज्याच्याही जन्माच्या आधीची.”

 

बायको सुमीतला गदागदा हलवत होती. “अरे बरा आहेस ना? काय झालं?” आपली शुन्यात लागलेली नजर हटवत सुमीतने मागे पाहिलं. घरावरच्या दिव्याचा प्रकाश दुरवर जिथेपर्यंत पसरला होता तिथेपर्यंत होती फक्त निश्चल स्तब्धता. सुमीत उत्तरला, “काही नाही. तिथे काही नाही!”

Comments

vaidya.vinayak said…
भन्नाट ....
vaidya.vinayak said…
भन्नाट ....

Popular posts from this blog

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी

ध्वनीक्षेपकांचा उन्माद