कथा: खाऊ

जब्या रत्नागिरी बस स्टँडच्या जवळ आला असतानाच त्याचा फोन वाजला. मोटरसायकल चालवताना फोन उचलला तर आता चालणार नाही हे त्याला माहित होते कारण थोडंसंच पुढे ट्रॅफिक हवालदार असणार होते. त्याने बाईक रस्त्याच्या कडेला थांबवली. “बोल मया! अरे भो...... गेले तीन वर्षं तुला शोधतोय! मित्रांची थोडी तरी आठवन ठेव. ठान्याला ग्येलास तो मला वाटला तुला तिथंच उचलून मेंटल मध्ये टाकला” जब्या गडगडला. कित्येक वर्षांनंतर मयाशी संपर्क झाला होता. त्या दोघांना बरंच काही बोलायचं होतं. गेल्या सात आठ वर्षात कोण कुठे होतं, काय करत होतं. लॉकडाऊन आधीचं आयुष्य, नंतरचं आयुष्य, लग्न, मुलं. त्यांच्या गप्पा रंगात येऊ लागल्या होत्या.

 

तितक्यात एक मळकट लुगडं नेसलेली, खांद्याला तशीच मळकट, एक छोटं भोक पडलेली पिशवी लावलेली बाई जब्याच्या जवळ येऊन थांबली आणि तिने त्याला हाक मारली, “बावा!”. जब्याला वाटलं कि कोणीतरी भिकारी असेल. त्याने दुर्लक्ष करत आपल्या मित्राबरोबरच्या गप्पा तश्याच चालू ठेवल्या. “पत्या परत आला तुला माहित हाय काय? त्याने एक नशीब काढलान. हॉटेलची चांगली नोकरी गेली त्याची गोव्यातली पन हितं येऊन टपरी टाकलान. च्यायला वायंगणी फाट्यावर मरायला त्या उन्हात कोण थांबंल. पन ह्याचा धंदा एकदम जोरात. माझ्या मुलाला दर बुधवारी पत्याकाकाच्या गाडीवरचा मंचूरीयन घेऊन जाय लागतो नायतर काय खरं नसतं. पोरांचे हट्ट आपण आता नाही पुरवणार तर कधी.”

 

“बावा जरा हिकडं बगशील.” ती मघाशी आलेली बाई तशीच थांबलेली होती. “जरा वायच सांगशील?” तिच्या कपड्यांसारखीच मळलेली दहाची नोट त्याच्यासमोर धरत तिने विचारलं. जब्याला वाटलं हा काहीतरी फसवाफसवीचा प्रकार असावा. तरीसुध्दा त्याने विचार केला कि ती नेमकं काय बोलते ते ऐकून तरी घ्यावं “एवड्या पैश्यात कोलंब्यास जायन काय मी?” तिने विचारले. “कुठला कोळंबा, रत्नागिरी कि संगमेश्वर?” तिचं थरथरणं बघून त्याने पुढे विचारलं, “हाप टिकटीचा कार्ड नाय काय तुज्याकडे?” ती लटपटत उत्तरली “संगमेश्वर!”. जब्याची खात्री पटली की ह्या बाईच्या डोक्यावर परिणाम झालाय. “धा रुपयात कोणी हाप टिकटात कधी गेलाय का संगमेश्वरास? काय बोलतेस मावश्ये तू?” हिला आता कसं आवरावं आणि आपली सुटका कशी करावी ह्याचा तो विचार करू लागला होता.

 

“काय सांगू तुला बावा! माज्या मुलीला मुलगा झाला म्हनून मी आला. हिकडं शिव्हीलला हाय म्हणून त्यानी सांगतलानी पण हितं बघता तर कोणच नाय. तिचा सासर तिकडं लांब चांदेराईत. तितं जायला आता गाड्या पन मिलत नायत. म्हटला आता परत घरीच जायन. पन गेल्या काय म्हयनांपासून कुठल्या नोटंचं किती पैसं त्येच मना समजत नाय. मी समोरच्यास विचारूनच काय ते घ्याय सांगता. ही एक श्येवटची ऱ्हायली होती.” जब्याने तिच्या चेहऱ्याकडे निरखून बघितलं. तिचा एक डोळा व्यवस्थित उघडत नव्हता. “डोळ्याला काय झाला?” जब्याने विचारलं. “मुलग्यान मारलान तेंव्हापासून तसाच हाय. त्याची नोकरी गेली नी परत आला तवापासून दारू पिऊन पडलीला असतो. बायकोला माराय लागला तवा ती ग्येली निंगून म्हायेरी. आता माजी विदवा पेन्शन हाय त्याला पियायसाठी. मी म्हनला मुलग्याच्या नाय तर मुलगीच्या तरी पोरास बगीन मंग मी जाय मोकली.” आपला थरथरता हात वर करत म्हातारी बोलली.

 

जब्याने आपले पाकीट बाहेर काढले आणि आपल्या मुलाचा खाऊचा हट्ट पुरवण्यासाठी वेगळी ठेवून दिलेली शंभरची एक नोट म्हातारीला दिली. “हि घे. येवढ्या पैश्यात पोचशील घरी.” म्हातारीच्या डोळ्यात पाणी आलं.  तिच्या मळक्या पदराला डोळे पुसत आपल्या पिशवीत तिने हात घातला आणि एक बिस्कीटचा पुडा जब्याच्या हातात बळेबळेच दिला. “नाय म्हनू नुको. माझा सख्खा नाय तर हा तरी नातू खायल.” असं म्हणून ती बस थांब्याच्या दिशेने चालू लागली.

 

जब्या म्हातारीच्या लटपटत्या पाठमोऱ्या आकृतीकडे आणि हातातल्या चकचकीत वेष्टणाच्या पुड्याकडे आलटून पालटून बघत राहिला.

----------------------------------------------

Comments

मस्त! आपल्या ब्लॅागवरिल कथा,विचार अनुभव काही औरच आहे.
मस्त! आपल्या ब्लॅागवरिल कथा,विचार अनुभव काही औरच आहे.
धन्यवाद सुशील जी!

Popular posts from this blog

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी

ध्वनीक्षेपकांचा उन्माद