जबाबदारी तुमचीच

 माझ्या सध्या चालू असलेल्या एका कामाच्या निमीत्ताने गेल्या दोन दिवसात देशाच्या विविध भागात स्थायिक असलेल्या १३ जणांशी बोलावे लागले. त्यांच्या सद्यस्थितीबद्दल मला काहीच पुर्वकल्पना नव्हती. १३ जणांपैकी चार जण करोना पॉझिटीव्ह होते. त्यातील तिघाजणांना कोविड झाला होता. छत्तीसगड मधल्या एका माणसाला बोलता बोलता एकदम रडू कोसळले कारण काही तासांपुर्वीच त्याच्या बहिणीचे कोविड मुळे निधन झाले होते. पार दुर उत्तर प्रदेशातल्या ललितपुरमधल्या एका महिलेचे संपूर्ण कुटुंब कोविड बाधित होते आणि तिला स्वतःला बोलताना श्वास पुरत नव्हता आणि खोकल्यामुळे धड बोलता येत नव्हते. तिला एकदा ऑक्सिजन मिळाला पण परत कधी मिळेल, तिच्या नवऱ्याचं, लहान मुलांचं कसं निभावून जाईल ते तिला माहीत नव्हते. आमचे एक नातेवाईक कोविड मुळे रुग्णालयात अ‍ॅडमिट आहेत. सतत उत्साही, हसरी असलेली ही व्यक्ती फोनवर बोलताना पूर्णतः निराशेच्या गर्तेत गेल्यासारखी वाटली. करोनाची दुसरी लाट प्रचंड मोठी आहे आणि कोणीच त्यापासून सुरक्षित नाही ह्याची मुलभूत पातळीवर खोलवर जाणीव करून देणारे हे दोन दिवस होते.

 

इकडे रत्नागिरी जिल्ह्यातल्या एखाद्या आडगावात, स्वच्छ हवेत, कमी गर्दीत काही होणार नाही आणि हे ही दिवस जातील म्हणून थोडी निश्चिंतता होती. पण आता काही झालं तर हॉस्पिटल मध्ये बेड, ऑक्सिजन, औषधं तरी मिळतील का एवढंच काय आरोग्यसेवेपर्यंत नीट पोचता तरी येईल का ह्याचीही शाश्वती वाटत नाही. कदाचित लस घेतली तर फायदा होईल असं वाटून एखादा लसिकरण केंद्रावर पोचलाच तर तिथली प्रचंड गर्दी, नसलेलं सोशल डिस्टन्सिंग आणि न मिळालेल्या लसीमुळे संसर्गाचा धोका अधिकच वाटू लागतो. ह्या सगळ्या नकारात्मक मानसिक स्थितीला जोर देण्याचं काम टिव्हीवरच्या बातम्यांचे अ‍ॅंकर त्याच नकारात्मक बातम्या ओरडून ठासवून परत परत सांगत करत असतात आणि तिथल्या राजकीय चर्चांमधल्या एकमेकांवरील चिखलफेकीला उधाण आलेलं असतं.

 

मध्यंतरी शासनाने एक घोषवाक्य पसरवलं होतं “माझे कुटूंब माझी जबाबदारी.” सध्याची परिस्थिती बघता फक्त तेवढाच उपाय आहे ह्याची खात्री पटते. लॉकडाऊन आहे, बाहेर पडू नका, गर्दी टाळा, मास्क घाला ह्या मेसेजच्या पलिकडे ह्या देशात काही विशेष घडेल ह्यावरचा विश्वास उडून जाण्यासारखी परिस्थिती आहे. एकीकडे सामान्य जनतेच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर, अर्थार्जनासाठी केलेल्या वैध उद्योगांवर नियंत्रणं, बंदी आणत असताना विविध राजकीय कार्यक्रम, पार्टीबदलाचे मेळावे निर्वेध सुरू होते. त्यामध्ये मास्क नव्हते, सोशल डिस्टन्सिंग नव्हतं पण हे सर्व नियम तुम्हाला आम्हाला सामान्य व्यक्तींना रस्त्यावर फिरताना लागू होत होते. आता रोग पसरला तर हेच राजकारणी राज्यातील सामान्य जनता नियम पाळत नाही म्हणून रोग पसरला अशी वक्तव्यं करत आहेत.

 

कित्येक रोग आतापर्यंत मानव जातीवर आक्रमण करून आले. मध्यंतरी एकदा रेडिओ कार्यक्रमात एका त्वचारोग तज्ज्ञाच्या मुलाखतीमध्ये ऐकलं की देशातील जवळजवळ ८०% जनता वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीजन्य त्वचारोगांमुळे ग्रासली आहे. कदाचित प्राण जाण्याइतके घातक नसेलही परंतु माणसांचे आयुष्य असहाय्य करणारा ही व्याधी नक्कीच आहे. अश्या साध्या समस्येने जर देशातील ८०% जनता एकाच वेळेला ग्रस्त होत असेल तर त्याचा देशपातळीवर आर्थिक, मानसिक ताण किती प्रचंड असेल? आज ह्या देशात डॉ. अभय बंग ह्यांच्यासारखे जाणते तज्ञ आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमधल्या त्रुटी नेमकेपणाने दर्शवत आहेत. त्या सर्व व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने काहीच होताना दिसत नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या भुतपुर्व आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला निर्देशक असलेल्या डॉ. ग्रो ब्रंटलॅंड ह्यांनी “नजिकच्या भविष्यात एखादा श्वसनसंस्थेशी संबंधित विषाणूजन्य रोग जगातील ५-८ कोटी लोकांचं जीवन संपवू शकतो” असा नेमका अंदाज सप्टेंबर २०१९ मध्ये वर्तवला होता. त्यांच्या अहवालातील सुरुवातीचं एक वाक्य आहे “Disease thrives in disorder रोगांना अव्यवस्थेमुळे बळ मिळतं”

 

हिंदी चित्रपटांमध्ये एक डायलॉग बऱ्याच वेळा येतो तो म्हणजे “साला सब सिस्टमही सड गया है”. ह्या सडलेल्या व्यवस्था तश्याच ठेवण्यामध्ये सत्तेचे मोठे गणित असते. आज भारतामध्ये आपण एका चांगल्या लोकशाही व्यवस्थेत राहतो पण आपल्या स्वातंत्र्याबरोबर आलेली ही लोकशाही आपण युरोप, अमेरिकेसारखी भांडून हक्काची म्हणून मिळवलेली नाही ही कदाचित दुर्दैवाची बाब आहे असे वाटते. आपले लोक रेशनवर मिळणाऱ्या दोन चार किलो धान्यावर आणि निवडणुकीच्या आधी मिळणाऱ्या एखाद्या क्वार्टर दारूवर समाधानी असतात. मतदान करायला जातानाही आमच्याकडे कोकणात प्रत्येक वाडीवस्तीवर राजकीय नेत्यांची गाड्यांची व्यवस्था असते. ज्याच्या गाडीत बसायचं त्यालाच मतदान करून यायचं हा हिशेब पक्का असतो. मग रस्त्यात खड्डे असले तरी चालतात. अश्या रस्त्यांवरून खडतर प्रवास करून तुम्ही दवाखान्यात पोचलात तर तिथे डॉक्टरच काय, बेड, ऑक्सिजन, लसी, औषधं हे सगळं नसलं तरी चालतं.

 

शेवटी तुमचं आरोग्य ही तुमचीच जबाबदारी आहे रोग कितीही संसर्गजन्य असला तरी. कारण तुम्ही तुमची मतं कवडीमोल किंमतीला विकली आहेत!

----------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

A Psycho-financial Experiment

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी