खाणे पिणे अनपेक्षित वर्धा विशेष


खाणे हि माझी आवड असली तरी त्यामागे माझा विचार जगण्यासाठी खावे असाच असतो. त्यामुळे चांगले जगण्यासाठी चांगले खायला मिळावे अशी अपेक्षा जीवनात असते. दुसऱ्यांनी टाकलेले फोटो किंवा व्हिडीओ बघून तो पदार्थ कधीतरी एकदा खायला हवा आणि त्याच्यासाठी आपण वणवण फिरत बसावे असे कधी वाटत नाही. जे काही समयानुसार अन्न पुढे येते, ते जे अनुभव देते त्याचा आधीच त्यामुळे मानसिक स्वीकार केलेला असतो. परंतु माझ्या कामानिमीत्त होत असलेल्या प्रवासामुळे ह्या खाद्यसंस्कृतीच्या
विविधतेने नटलेल्या देशाचे वेगवेगळे पैलू अनुभवायला मिळत असतात हे माझे एक अहोभाग्यच म्हणायला हवे.
आपण ज्याठिकाणी गेलेलो असतो तिथे खाणे शोधण्यापेक्षा त्या दिवसाचे निश्चित केलेले काम पुर्ण करण्याचे लक्ष्य असल्यामुळे जेवण हा विषय तसा दुय्यम असतो. जे मिळेल त्याला नावे न ठेवता भुक भागवणे ह्या उद्देशाला प्राधान्य असते. त्यामुळे रात्री तरी चांगले आपल्याला हवे तसे खायला मिळावे, स्थानिक प्रकारच्या जेवणाचा स्वाद घ्यायला मिळावा अशी साधी अपेक्षा असते. पण तेही बहुतांश वेळा नशिबात नसते कारण बरीचशी राहण्याची हॉटेले आणि त्याला जोडलेली रेस्टॉरंट ह्यामध्ये मिळणारे जेवण संपुर्ण देशभरात एकसूरी असते. दिवसभर बाहेर फिरून झाल्यावर रात्रीच्या जेवणासाठी बाहेर पडण्याचा उत्साह नसतो. त्यामुळे त्या एकसूरी मेनूशिवाय गत्यंतर नसते. पंजाबी नावाखाली कुठल्यातरी ओशट ग्रेव्हीयुक्त भाज्या आणि रोट्या खाण्यापेक्षा मग सलाड, दाल खिचडी जवळ शरणागती पत्करावी लागते.
गेल्या आठवड्यात वर्ध्याला कामानिमीत्त जाणं झालं. हि टूर अनपेक्षित पणे चांगला अनुभव देऊन गेली. माझ्यासोबत एक तामिळभाषिक दिल्लीकर होता तोही विविध स्थानिक पदार्थांची चव घेण्याबाबत शौकीन होता त्यामुळे आमचे चांगलेच जुळले.
आम्ही पहिल्या दिवशी पोचलो तेंव्हा हाताशी थोडा वेळ होता तेंव्हा आम्ही सेवाग्रामला बापू कुटी पहायला गेलो. तिथून बाहेर आलो तेंव्हा तिथे एक मावशी विलायती चिंचा विकत होत्या. आमच्या शाळेच्या बाहेर हातगाडीवर ह्या मिळत असत. ह्याचे बरेच वृक्ष पार्ल्यात आहेत. शाळेची आणि त्या पार्ल्यातील वृक्षांची आठवण काढत त्या खाल्ल्या. विदर्भात त्याला चिजबील म्हणतात असं समजलं. विशेष म्हणजे खाऊन झाल्यावर उरलेल्या बिया आणि टरफले परत घेण्यासाठी मावशींकडे एक वेगळी पिशवी ठेवली होती. त्याबद्दल त्यांचे कौतुक केले तर मावशींनी सांगितले की ज्या ठिकाणाच्या बाहेर मी हा व्यवसाय करते त्यांच्याकडून किमान एवढं तरी शिकलंच पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे त्यासाठी त्या मावशींचं मनोमन अजुन थोडं कौतुक केलं.
ह्यावेळेला ज्या हॉटेलात उतरलो होतो त्याला रेस्टॉरंट जोडलेले नव्हते त्यामुळे जेवणासाठी बाहेर पडणे अपरिहार्य होते. एकाने जवळच असलेल्या मगन संग्रहालयाला जोडलेल्या रसोई नावाच्या रेस्टॉरंटची शिफारस केल्यामुळे तिथे गेलो. साधी झुणका भाकर थाळी घेतली. अतिशय अप्रतिम चव. लाल अंबाडीच्या पाकळ्यांचे सरबत सोबत घेतले. साधारण कोकम सरबतासारखी ह्याची चव असते. मजा म्हणजे आफ्रिकेत घानामध्ये असताना हे सरबत प्यायले होते त्याची आठवण झाली. त्याला तिथे बिस्साप म्हणतात. जेवणानंतर स्वीट डीश म्हणून मागवलेली पुरणपोळी आतापर्यंत विदर्भात खाल्लेल्या सर्व पुरणपोळ्यांची आठवण पुसून टाकणारी अशी होती.
दुसऱ्या दिवशी त्याच्या जवळच असलेल्या वरदा वर्धन नावाच्या रेस्टॉरंटला भेट दिली. साधारण सारखाच मेनू आणि ​फॉरमॅट आहे तिकडे. ह्यावेळेला पातोडी रस्सा, टोमॅटो चटणी आणि मिक्स भाकर मागवली होती. माझा सहकारी तिखट खाण्याची सवय नसल्यामुळे घामाने भिजून गेला होता तरीही ’टेस्ट बहुत अच्छा है' असं म्हणून सोडायला तयार नव्हता.’
तिसऱ्या दिवशी काम संपवून निघायला ​बराच उशीर झाला होता. वर्ध्यात परत आलो तेंव्हा संध्याकाळ झाली होती.​ मगन संग्रहालयाची रसोई बंद होती. पण एका बाजूच्या गल्लीत संत गजानन थालिपीठ सेंटरचा बोर्ड दिसला आणि आत शिरलो. काही हालचाल दिसत नव्हती आणि तिथे काम करणारे लोक आपल्यातच गुंग होते त्यामुळे येथे चांगले मिळेल की नाही ह्याबद्दल शंका वाटत होती. तरीही काकडी थालिपीठ आणि कांदा थालिपीठ मागवले. इथली थालिपीठ करण्याची पध्दत कोकण पश्चिम महाराष्ट्रात करतात त्यापेक्षा बरीच वेगळी आहे. मोठा बटरचा गोळा वर टाकून समोर आलेले थालिपीठ चवीला उत्तम होते. काकडी थालिपीठाचा विशेष उल्लेख केला पाहिजे.
“यार जाने से पहले पुरणपोळी खा लेते है. ये तो दिल्ली में नही मिलने वाली.” हे माझ्या सहकाऱ्याचे म्हणणे ऐकत परत एकदा आम्ही तुपात माखलेली ​खमंग भाजलेली एक एक पुरणपोळी फस्त केली.
विमान पकडण्यासाठी नागपुरला पळायची वेळ झाली होती. परतताना दोन स्थानिक पदार्थांची नावे पाहण्यात आली, केना भाकरी आणि लंबी पोळी. पण ह्यावेळेला त्यांचा आमच्या पोटात जायचा योग नव्हता. कारण वेळ नव्हता आणि पोट तुडुंब भरले होते. विमानतळावर पोचलो तेंव्हा तिथल्या स्टॉलवरचे पदार्थ आणि आतापर्यंत खाल्लेल्या गोष्टी यांची किंमत आणि चव यांची दुरूनच तुलना केली. विमानांच्या निर्गमनाची उद्घोषणा झाल्यावर आपल्या वाटेला लागलो.
-------------------------
ताजा कलम:
मगन संग्रहालयाच्या समोर वर्धिनी नावाचे एक जिल्ह्यातील बचत गटांनी बनवलेल्या वस्तूंचे एक दुकान आहे. आम्ही बाहेरून आलोय असं पाहिल्यावर तिथल्या ताईंनी आम्हाला सर्व वस्तूंची यथास्थित माहिती दिली. तिथे घेतलेले सरगुंडे आणि सांडगे यांची ट्रायल बाकी आहे.​ बायको जेंव्हा मनावर घेईल तेंव्हा ती होईल. सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या इंद्रायणी तांदळाचा कोकणी पध्द्तीने केलेला मऊ भात आणि सोबत विदर्भातील जवस चटणी असा संयुक्त महाराष्ट्र गेले काही दिवस रोज सकाळी अनुभवत आहे.

*फोटो फक्त थाळीचा काढला आहे. बाकीचे पदार्थ फोटो काढण्याची आठवण होण्याआधीच पोटात पोचले होते.

थाळीमध्ये भाकरी, झुणका, वांग्याचं भरीत, मसाले भात, कढी. वरच्या बाजूला ग्लासात जे लाल दिसत आहे ते अंबाडी सरबत.


Comments

050 5080094 said…
वर्धा विशेष वाचून मला माझ्या नागपूर visits ची आठवण झाली.मी '70 ते '76 पर्यंत दरवर्षी 2 ते 3 महिने audit साठी नागपूरला जात असे.
एकदा college od Agriculture at महाराज बाग, दुसर्यांदा Nagpur Veterinary college at Taleng Khedi, Third time Central Bank of India at Kingsway Nagpur.
अस्सल वैदर्भीय खाणे म्हणजे साखरेची पुरणपोळी आणि त्यावर तुप वहात असणे आणि दर घासागणिक उचकी लागेल असा नागपुरी रावण भात.
न विसरता येणाऱ्या आठवणी ....
खुपचं छान 💝💝💝💝💝
DS said…
Ekdam masta!!

Popular posts from this blog

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी

ध्वनीक्षेपकांचा उन्माद