आरक्षण, शिक्षण, रोजगार

 #puttingdownthoughts

महाराष्ट्रातील नोकरी व शिक्षणातील आरक्षणमर्यादा काही दिवसांपुर्वी पास झालेल्या अधिनियमानुसार आता पुर्वीच्या ५२ टक्क्यांच्या वर गेली आहे. आरक्षण मिळालं तर आपले सर्व प्रश्न सुटतात असं समाजातील खुप मोठ्या वर्गाला वाटत असतं. त्यामुळे तो एक सत्ताकारणाचा विषय झालेला आहे. सध्याचं मराठा आंदोलन आणि त्यावरील सर्व बाजूची चर्चा भाषणं पाहिली तर असं वाटत राहतं की आरक्षित नोकऱ्या, संधी हे एका मर्यादीत संख्येत आहेत आणि त्या मिळवण्यासाठी सर्वत्र झुंबड उडाली आहे. विविध जातीसमूह हे मर्यादीत गाठोडं आपल्याकडेच कसं मिळवता येईल किंवा आहे त्यापैकी आपल्याकडेच कसे अबाधित राहील ह्याविषयी भांडत आहेत. प्रत्येकाला आपापल्या ’सग्यासोयऱ्यांची’ चिंता भेडसावत आहे. 

तेंव्हा मनात आलं की आपणही आपल्या सग्यासोयऱ्यांच्या विषयी किमान विचार तरी करावा. तो विचार करता करता प्रत्यक्षात असं जाणवलं की ते विचार आपल्या खुल्या प्रवर्गातील तथाकथित साडेतीन टक्क्यामधल्या (प्रत्यक्षात दोन टक्केच असतील असं वाटतंय कारण लोकसंख्या प्रचंड कमी झाली आहे गेल्या दोन दशकात,) सग्यासोयऱ्यांपुरते मर्यादीत राहत नाहीत तर भारतातील कुठलीही अशी व्यक्ती जिला आरक्षणाचा फायदा होणार नाही त्याला थेट लागू होतात. ते विचार जरा मुद्देसुद मांडतोय.

१. शिक्षणाचे प्रमाण भारतात प्रचंड वाढले आहे. त्या शिक्षणाला गुणवत्ता नाही. पदवीधारक व्यक्तीला आज एखादे कार्यालयीन पत्र लिही असे सांगितले तर पन्नास टक्क्यांपेक्षा पदवीधारक ते व्यवस्थित विचार करून नेमक्या भाषेत लिहू शकतील असे वाटत नाही. शिक्षण आहे परंतु ज्ञान नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जर जगात कुठेही हमखास नोकरी मिळवायची असेल तर पदवीसोबतच विविध प्रकारे आपले विषयाचे ज्ञान व कौशल्ये मजबूत करणे महत्वाचे आहे. त्यासाठी उमेदवारी करून अनुभव मिळवणे व कॉलेजमध्ये जे मिळत नाही ते ज्ञान अन्य मार्गाने मिळवणे महत्वाचे आहे. 

२. शासकीय नोकऱ्यांची एकूण संख्या कमी आहे व समाजाच्या फक्त ३ टक्के जनतेलाच शासकीय नोकरीचा थेट फायदा मिळू शकतो हे लक्षात ठेवले पाहिजे. आरक्षणामुळे फक्त खुल्या प्रवर्गालाच नव्हे तर राखीव प्रवर्गालाही एखादी नोकरी मिळवायची असेल तर त्याची शक्यता (probability) अतिशय कमी होऊन जाते. त्यामुळे त्याच्या जास्त मागे लागून आपली तरूणपणाची मोलाची उमेदीची वर्षे वाया घालवू नयेत.

३. हा जरा क्लिष्ट व मोठा मुद्दा आहे. भारतामध्ये काही सरकारी अनुदानित शिक्षणसंस्थांमध्ये कमी शुल्कामध्ये शिक्षण उपलब्ध आहे. त्यात प्रवेशासाठी तीव्र स्पर्धा आहे. त्यामध्ये असलेल्या विविध स्वरूपाच्या आरक्षणांमुळे प्रवेशासाठी असलेली मार्कांची स्पर्धा त्याहून अधिक जीवघेणी होऊन बसलेली आहे. दुसऱ्या बाजूला विनाअनुदानीत खाजगी शिक्षणसंस्थांमध्ये तेथील शिक्षणासाठी आकारले शुल्क सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. एवढे शुल्क देऊनही तेथील शिक्षणाचा दर्जा अतिशय सुमार आहे. बऱ्याच संस्था पैसा देऊन पदवी खरेदी करण्याची दुकाने बनली आहेत. कमी खर्चाच्या शिक्षणाच्या असलेल्या टंचाईच्या आधाराने समाजाच्या अगतिकतेचा फायदा घेणारे शिक्षणसम्राट परिणामी तयार झाले आहेत. नवीन शैक्षणिक धोरण येऊन हि सर्व परिस्थिती बदलू शकेल असे अनेकजण म्हणत आहेत. असे झाले तरी हे सर्व बदल येत्या तीनचार वर्षात अमलात येतील व शिक्षण क्षेत्र आमूलाग्र बदलेल असे वाटत नाही. त्यामुळे तोपर्यंत जुन्या व्यवस्थेतच रहायला लागेल.

ज्यांना सरकारी सवलतींचा फायदा मिळत नाही परंतु गुणवत्ता आहे अश्या विद्यार्थ्यांसाठी खाजगी क्षेत्रातून योजना करणे गरजेचे आहे. जर भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात येथील राजकारण, भ्रष्टाचार व क्लिष्ट सरकारी नियम ह्या सर्वांमुळे चांगल्या शिक्षणसंस्था चालवणे शक्य नसेल तर आजूबाजूच्या राज्यांमध्ये व देशांमध्ये जाऊन हे काम करण्याची गरज आहे. सध्या तसेही वैद्यकीय शिक्षणासाठी येथील विद्यार्थी फिलिपिन्स, रशिया सारख्या देशांमध्ये जातच आहेत. त्याच धरतीवर अन्य अभ्यासक्रमांसाठी हे करता येईल का व त्याद्वारे शिक्षणाचा एकूण खर्च कमी करता येईल का हे पहाणे गरजेचे ठरेल.

४. ज्यांना उच्चशिक्षण घेणे विविध कारणांमुळे शक्य नाही त्यांनी त्यासाठी वेळ वाया न घालवता, आपल्या पालकांना खर्चात न टाकता व्यावसायिक अभ्यासक्रम करून लगेच कामाला लागले पाहिजे व स्वकमाईला सुरूवात केली पाहिजे. बरेच परप्रांतीय आपल्याकडे येऊन अतिशय कमी शिक्षण असूनही बक्कळ पैसा कमवू शकतात कारण त्यांच्याकडे एक उद्योजकतेची संस्कृती आहे. आपल्याकडे एकूणच समाजातच त्याविषयी उदासीनता आहे. आपण जर आपल्या अंगी हे उद्योजकतेचे गुण बाणवले तर आपण आपल्या स्वतःच्या गावात व शहरात राहूनही चांगली कमाई करू शकू. जर ज्ञान किंवा शिक्षण कमी पडते असे वाटत असेल तेंव्हा ऑनलाईन व कमी कालवाधीचे अभ्यासक्रम करता येतील. त्यासाठी गरज पडल्यास नोकरीमध्ये छोटे ब्रेक घेता येतील.

५. बऱ्याचवेळा आपली पालकांची मुलांबद्दल असलेली अपेक्षा आणि त्यांची असलेली क्षमता ह्यामध्ये प्रचंड तफावत असते. आजूबाजूचे लोक, नातेवाईक, मित्र ह्यांच्या अनुकरणामुळे चुकीचे करीयर मार्ग निवडण्याचे प्रमाण प्रचंड आहे. योग्यवेळी आपल्या पाल्यांची नेमकी क्षमता ओळखून त्यादिशेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी कल व क्षमता चाचण्या उपलब्ध आहेत त्या करून घेतल्या पाहिजेत.

मनोज जरांगे पाटील ह्यांचे सतत दाखवले जाणारे न्युज बाईट किंवा अन्य कुठलीही आरक्षण विषयक आंदोलने ह्याच्यापलीकडे जाऊन जर तुम्हाला तुमच्या सग्यासोयऱ्यांचा विचार करावा असं वाटत असेल तर वरील मुद्दे लक्षात घ्यायला लागतील. राजकीय व्यवस्था, सरकारी धोरणे बदलणे एका व्यक्तीच्या आवाक्यातील काम नाही पण आपल्यापुरते आपण वरील पध्दतीने विचार नक्की करू शकू व त्यानुसार कृती करू शकू असे वाटले म्हणून लिहिले.

- सचिन पटवर्धन

-------------------------------------

Comments

सचिन सर, अगदी बरोबर आहे. शेती कडे मोठ्या प्रमाणात शासन व युवक लक्ष देत नाहीत. त्यामुळे पुढे मोठ्या संकटांचा सामना करावा लागेलं

Popular posts from this blog

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी

ध्वनीक्षेपकांचा उन्माद