रत्नागिरी जिल्ह्यातील आत्महत्या
21-12-2023
साधारण दोन वर्षांपुर्वी सलग दोन तीन महिन्यात आजुबाजुच्या परिसरातुन आत्महत्यांच्या घटना एकामागोमाग ऐकिवात आल्या आणि एक विषय मनात चाळवला गेला. मी पुर्वी टाटा ट्रस्ट मध्ये नोकरी करत असताना विदर्भातील शेतकरी आत्महत्या ह्या विषयाशी संबंध आला होता आणि आपला परिसरही एखाद्या मानसिक महामारीच्या कडेलोटावर तर नाही ना अशी शंका मनाला चाटून गेली होती. साधारण विदर्भातील बऱ्याचश्या केसेस मध्यमवयीन पुरूष शेतकऱ्यांच्या होत्या. ज्यामध्ये शेतीचे कोसळलेले आर्थिक गणित आणि कुटूंबातील वाढते खर्च ह्यांचा ताळमेळ बसत नसल्याने होत असलेल्या ओढाताणीचे पर्यवसान आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यात होत होते. परंतु रत्नागिरीच्या परिसरातील ज्या केस ऐकल्या होत्या त्या सर्व तरूणांच्या होत्या.
नेमके काय होत आहे ह्याची अधिक जाण व्हावी ह्यासाठी आमच्याकडील एका स्थानिक
वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या गेले पन्नास दिवस पाहत गेलो आणि काही निश्चित कल
म्हणता येतील असे लक्षात आले. गेल्या पन्नास दिवसात रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत
घडलेल्या १३ आत्महत्यांची नोंद मिळाली. त्यामध्ये १८-३० ह्या वयोगटामध्ये ५ होत्या
तर ३१-६० ह्या वयोगटामध्ये ६ होत्या. १८ खालील वयाच्या १ तरूणाची बातमी होती तर ६०
पुढील १ वृध्दाची आत्महत्येची बातमी मिळाली. १३ मध्ये फक्त २ महिला होत्या. नावावरून
धर्म जर निश्चित केला तर त्यातील १२ हिंदू- बौध्द असावेत आणि १ मुस्लिम असावा. आत्महत्या
कश्याप्रकारे केली हे जर पाहिले तर सर्वाधिक लोकांनी गळफास घेतला होता.
त्याखालोखाल घटना ट्रेन खाली जीव देण्याच्या होत्या. इतर घटना जाळून घेणे, विषारी
द्रव्याचे प्राशन, विहिरीत उडी टाकणे अश्या होत्या.
आत्महत्येची कारणे काय असावीत ह्याचे फारसे तपशील बातम्यांमध्ये दिले नव्हते. वृत्तपत्राने
ह्या बातम्या एका बाजूच्या छोट्या रकान्यात कश्याबश्या बसवलेल्या आढळल्या. साधारण
३० वर्षांखालील युवकांमध्ये घरातील इतरांसोबत होणारी भांडणे हे कारण जास्त जाणवले.
एका युवकाने तर वडील कॉलेजला जाण्यासाठी सक्ती करतात व सतत बोलत राहतात त्याचा राग
येऊन आत्महत्या केल्याची बातमी वाचायला मिळाली. सगळ्यात हेलावून सोडू शकेल अशी
बातमी एका वृध्दाची होती. त्याने एकटेपणाला कंटाळून स्वतःची चिता रचून त्यामध्ये
जीव दिला होता.
ह्या सर्व विश्लेषणातून काय आढळतं. ह्याविषयावर विविध अंगाने संशोधन झालं तर
ह्या विषयाचे अनेक नजरेआड असणारे मुद्दे समोर आणता येतील. जे सध्या ग्रामीण भागात अजिबात
होताना दिसत नाही. तरूण वर्गामध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढते असणे कुठल्याही
समाजाला प्रचंड धोकादायक आहे आणि त्या समाजाच्या भविष्यावरच मोठे प्रश्नचिह्न उभे राहते.
रत्नागिरी जिल्ह्यातील आत्महत्यांमध्ये त्याचे सध्या असलेले ४०% प्रमाण एक खुप मोठी
धोक्याची घंटा आहे.
-------------------------------
Comments
एक वेगळा पण महत्त्वाचा विषय समोर आणलास. यावर नक्कीच खोलात जाऊन अभ्यास आवश्यक आहे.