ग. म.

 

कोकणातील ग्रामीण भागातील खाद्यसंस्कृती भारताच्या इतर ग्रामीण भागातील लोकांप्रमाणेच साधी सोपी सरळ आहे. बहुतांश कोकणातल्या बाहेरच्या लोकांचा समज असतो तसा इथला ब्राह्मण समाज पांढरपेशा नाही तर शेती बागायतीची श्रमाची कामे करणारा आहे. प्रत्येक जातीची जशी स्वतःची खाद्य परंपरा (cuisine) विकसित झालेली आहे तशी इकडच्या ब्राह्मण समाजाचीही आहे. तिखट, मसाले, कांदा, लसूण, तेल ह्या घटकांचा कमीत कमी वापर ही त्याची पहिली ओळख आहे. तांदुळ, खोबरे ह्या दोन स्थानिक घटकांचा वापर जेवणात अपरिहार्यपणे असणे ही अर्थात त्याची दुसरी ओळख आहे. अर्थात मग त्यात पोटओळखी ही असतात विविध तालुके, जिल्हे, पोटजातींच्या अनुसार पण इथे सांगितलेले दोन मुद्दे किमान समान प्रकारचे असतात.

ब्राह्मणी भोजन ह्या नावाखाली बऱ्याचवेळा पेशवाईतला थाट, लग्नातल्या पंगती वगैरे गोष्टींची चर्चा घडत असते पण गावात उपजीविकेसाठी चार पाच आघाड्यांवर धावणाऱ्या, संयुक्त मोठ्या कुटूंबांमध्ये राहणाऱ्या समाजाला ही दहा बारा किचकट पदार्थांची गुंतागुंत रांधणे आणि खाणे परवडत नाही. हि पदार्थांची गुंतागुंत सण, उत्सव, लग्न, मुंज अश्या क्वचित प्रसंगीच असते. त्यामुळेच त्याची चर्चा जास्त होत असावी.

रत्नागिरी जिल्ह्यातील त्यातही प्रामुख्याने रत्नागिरी आणि संगमेश्वर ह्या दोन तालुक्यांमध्येच मला आतापर्यंत आढळलेला पदार्थ म्हणजे गरम मसाला आमटी. हा पदार्थ दररोज कोणी खात नाही आणि म्हणूनच इथले लोक त्याची आतुरतेने वाट बघत असतात. आमच्या परिसरात त्याचा ग. म. ह्या त्या शब्दाच्या लघुस्वरुपातच तो ओळखला जातो. जी गंमत ग.म. ह्या शब्दात आहेत ती गरम मसाला आमटी ह्या शब्दात येत नाही कारण ते एक ढोबळ सर्वसाधारण नाम होऊन जातं. ग.म. असं त्याला थोडं वेगळ्या नावाने हाक मारली की त्याच्यात त्याची खास चव, त्याभोवती खेळीमेळीने जमलेला माणसांचा गोतावळा, त्याची वाट बघणे अश्या अनेक गोष्टी व्यक्त होत असतात.

माझी ह्या पदार्थाची पहिली ओळख मुंबईत असताना झाली. माझी आजी आणि आई ह्या दोघीही मुळच्या रत्नागिरी तालुक्यातील नसल्याने असेल कदाचित पण त्यांनी कधी स्वतःहुन हा पदार्थ केल्याचे आठवत नाही. माझी आत्या मात्र ही आमटी दरवर्षी आवर्जुन करायची. मी नेहमी तिला विचारायचो की आमटी कधी तर साधारण उत्तर तयार असायचं, “अरे जरा थंडी पडू दे!” ३५-४० वर्षांपुर्वी मुंबईत स्वेटर घालायला लागेल इतपत थंडी काही दिवसांसाठी का होईना पण पडत असे. त्यामुळे साधारण डिसेंबर, जानेवारी आला कि मग एकदा हा कार्यक्रम ठरायचा. त्यामुळे वाट पाहिल्याशिवाय न मिळणारा पदार्थ अशी त्याची व्याख्या डोक्यात पक्की बसली होती.

पण ग.म.ची अधिक जवळून ओळख नऊ वर्षांपुर्वी रत्नागिरी जवळच्या आमच्या गावात येऊन स्थायिक झालो त्यावेळेला झाली. इथे ग.म. म्हणजे एक वेगळा समारंभच असतो. साधारण बाहेर थंड वातावरण असेल तर ग.म. ला चांगली धार चढते. त्यामुळे बाहेर तुफान पाऊस पडत असेल किंवा अर्थातच थंडीच्या मोसमात हटकून एकदा तरी करण्याचा हा पदार्थ आहे. लग्न, मुंज असे समारंभ, देवळातले उत्सव असे चार पाच घाई गडबडीचे दिवस गेल्यानंतर त्यात मदत करणारे सर्व सहभागी लोक एखाद्या रात्री परत एकदा बोलावले जातात. हि ग.म. पार्टी म्हणजे आतापर्यंत एकत्रित पणे केलेल्या कामाचा एक लॉजिकल एंड असतो. कधी कधी नातेवाईक, मित्र यांना बोलावून एकत्र गप्पा, धमाल करायची असेल तरीही ग.म. चा घाट घातला जातो.

साधारणपणे ग.म. पार्टीचा चार्ज पुरुष मंडळींकडे असतो. आमच्या गावातल्या अनंताकाकांना त्याची कृती विचारली की ते उत्साहाने लगेच सगळे तपशील सांगायला लागतात. कांदा, सुकं खोबरं कसं चुलीत भाजायचं, मग तव्यावर भाजलेल खडे गरम मसाले त्यात मिसळून ते मिश्रण कसं जाडसर वाटायचं. शिजलेल्या तुरीच्या डाळीत पाणी घालून ते मोठ्या पातेल्यात उकळवत ठेवायचं. मग मिरची पावडर, मीठ घालून झाल्यानंतर वाटलेला गोळा अलगद त्या उकळत्या मिश्रणात कसा सोडायचा हे सांगतानाच हेही सांगून ठेवतात की नेहमीच्या आमटीत घालतो तसे टोमॅटो, गुळ घालायचा नसतो. पण हे तिथेच संपत नाही, ते जाता जाता अजुन एक मोलाचा सल्ला देतात, “बडीशेप वगैरे अजिबात घालू नको हां त्यात. नायतर त्याच्यात काय मजा राहत नाय.”

आमटी उकळायला लागली की त्याचा सुवास आसमंतात पसरलेला असतो आणि तुमची भुक चाळवत असतो. आमटी व्यवस्थित तयार झाली अशी तज्ञ लोकांकडून निश्चिती झाली की मग ताटात गावठी तांदळाच्या वाफाळत्या भाताचा एक बरासा ढीग, त्यावर मुक्त हस्ते ओतलेली गरम मसाला आमटी आणि कांद्याच्या फोडी एवढेच मोजके पदार्थ असतात. गप्पांचे आवाज बंद होतात कारण तोंडं खाण्यामध्ये व्यस्त असतात. जेवण होऊन गेलं कि हात स्वच्छ धुऊन कोरडे केले तरी नंतर एक दोन तास आमटीचा वास हाताला येत राहतो. दुसऱ्या दिवशी ही आमटी अजून चढते आणि त्याचा स्वाद अजुन तीव्र होतो.

“ह्यावेळी ग.म.ला काय मजा नाय आली किंवा परवाची आमटी एकदम एक नंबर. काय खाशील? (म्हणजे खातच राहीला असतास)” अश्या चर्चा नंतर काही दिवस रंगतात. त्याही लवकरच थंडावतात कारण लोक नंतर आपल्या नेहमीच्या व्यापात बुडून जातात. परत पुढच्या वर्षी थंडी पडल्यावरच ग.म. होणार असते.



Comments

Popular posts from this blog

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी

ध्वनीक्षेपकांचा उन्माद