कोकणातल्या फणसाचं काय करायचं?
कोकणात फणसाची लागवड दोन प्रकारची आहे. एक म्हणजे नवीन होत असलेली कलमांपासून होत असलेली लागवड. ह्यामध्ये स्थानिक तसेच विविध एक्झॉटीक प्रकारतील मुख्यत्वे कापा प्रकारातल्या फणसाची छोटी तसेच मोठी लागवड होत आहे. लागवड करणारे शेतकरी काही हौशी आहेत तर काही लोकांची व्यावसायिक पातळीवरही आहे. त्यामागे काही व्यावसायिक गणिते नक्की असतील आणि त्याचा विचार लागवड करणाऱ्याने केला असेल असे आपण गृहीत धरू शकतो. जी दुसरी लागवड आहे ज्याचा फारसा व्यावसायिक विचार सध्या होताना दिसत नाही ती म्हणजे आपली जुनी झाडे. त्यांचे पर्यावरणीय आणि व्यावसायिक असे दोन्ही प्रकारचे मूल्य आहे ते समजून घेतले तर त्याचा खुप चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना उपयोग होऊ शकेल आणि नवीन लागवडीचा खर्च न करता, आहे त्या झाडांपासून अधिक उत्पन्न मिळवणे शक्य होईल. कोकणातली सर्वच जुनी लागवड हि बियांपासून केल्यामुळे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वैविध्य आहे आणि एखाद्या मोठ्या मार्केटला जसे एकसारखे उत्पादन लागते तसे त्यापासून मिळू शकत नाही ही एक जुन्या लागवडीच्या फणसाबाबत समस्या आहे. अश्या परिस्थितीतही एखाद्या शेतकऱ्याकडे समजा ५ झाडे आहेत...