शाळा
जुन्या कागदपत्रांच्या
फायली आवरताना एक फाईल मी हमखास न बघता आतापर्यंत ठेवून देत असे ती म्हणजे
शाळेच्या प्रगतीपुस्तकांची. ते पिवळे पडलेले कागद डोळ्यासमोर नको वाटत आणि फाडून
फेकूनही देववत नसत. आज ठरवलं की ते एकदा बघायचेच. त्या जुन्या शाळेच्या आठवणींना
सामोरे जायचेच.
एक एक प्रगतीपुस्तक
बघताना त्यातले मार्क तपासून बघताना मला एक मजेशीर आलेख दिसत होता. इयत्ता सहावी
पर्यंत साधारण बरे मार्क. चौथीची शिष्यवृत्ती, सहावीला बालवैज्ञानिक परीक्षेत चांगले
यश वगैरे. सातवीपासून मार्कांमध्ये भरपूर घसरण. मग मधेच कुठेतरी गणित आणि इंग्रजी
सारख्या असंबध्द विषयांमध्ये चांगले गुण. दहावीपर्यंत मार्कांमध्ये सर्व विषयात घसरण
चालू असताना दहावीला अचानक राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात निवड
आणि संस्कृतमध्ये सर्वोच्च गुण. ह्या सगळ्यामध्ये तसं तार्किक संबंध लावणं कठीण
होतं.
त्या ६० मुलांच्या
वर्गामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणं कठीणच होतं. त्यातही त्यावेळी
आमची पार्ले टिळक विद्यालय ही शाळा दहावीच्या गुणवत्ता यादीमध्ये आपले विद्यार्थी
झळकवण्यात प्रसिद्ध होती. त्यामुळे मला वाटतं शाळेचं लक्ष नेहमी त्या मार्क
मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांवर केंद्रीत असायचं. आमच्यासारख्या अभ्यासाच्या परीघावर
राहणाऱ्या कधी तळ्यात मळ्यात असणाऱ्या मुलांचे फारसे महत्व कधी शाळेला वाटले
नसावे. परंतु त्या कमी वाटणाऱ्या मार्कांमुळे आणि शाळेने केलेल्या दुर्लक्षामुळे एक
न्युनगंड मात्र निर्माण झाला. त्यातुन बाहेर पडून आपण मोठे यश संपादन करू शकतो असा
आत्मविश्वास त्या वाढत्या वयात कधी संपादन करता आला नाही.
दहावी पास झाल्यानंतर शाळेला
विसरायचं ठरवून पुढे जात राहिलो तरी तो आधीचा गमावलेला शैक्षणिक आत्मविश्वास एम.
एस्सी. झालो तरी परत आला नाही. पार्ल्यात जवळ राहत असूनही शाळा सोडल्यानंतर मला कधी तिथे जाऊन कोणाला भेटावे असे
वाटले नाही. अपवाद जिथे मी पोहायला शिकलो त्या शाळेच्या विहिरीचा जी मी बऱ्याचवेळा
जाऊन बघायचो. बघता बघता शाळाच पुर्ण बदलली. एकाच परिसरात एकच संस्था आता तीन
वेगवेगळ्या शाळा चालवते. एकदा नोकरी,
व्यवसायाला लागल्यावर कळलं की आपल्या शैक्षणिक प्रगतीचा उपयोग फक्त काही थोडे भागच
आहे. तुमचे कामातले कौशल्य, सद्गुण अश्या गोष्टीच जास्त महत्वाच्या ठरत आहेत आणि
त्या तुम्हाला स्वतःलाच कमवाव्या लागतात. एकदा ही जाणीव झाल्यानंतर मग शाळेत
घालवलेल्या त्या दहा वर्षांचा विचार फारसा केला नाही. पण ती शाळेच्या मार्कांची
फाईल कधी हातात घ्यावीशी वाटत नसे.
मध्यम वयात मागे वळून
पाहताना, जर मी लहान असताना असताना मला माझ्या गुणांना, व्यक्तिमत्वाला विकसित करणारी
शाळा मिळाली असती तर मी कदाचित वेगळा असतो, असा विचार येतो आणि त्यातला फोलपणाही
लक्षात येतो. शाळा निवडणे हे तुम्ही विद्यार्थी असताना आणि बऱ्याच वेळा तुमच्या
पालकांच्याही हातात नसतं. प्राप्त परिस्थितीत जास्तीत जास्त योग्य निर्णय घेण्याचा
सगळे प्रयत्न करत असतात आणि तुम्ही त्या मोठ्या योजनेचा एक भाग असता. त्यामुळे जे
आहे ते सरळ स्वीकारा आणि पुढे जा.
It’s time to move on….
-
Comments