अनुभव विपश्यनेचा


मी विपश्यना ध्यान शिबीराला जाण्याचा निर्णय तसा सहजच घेतला नव्हता. सात आठ वर्षापुर्वी माझ्या एका मित्राने त्याबद्दल सांगितले होते तेंव्हापासून तेथे एकदा तरी जाऊन बघावे असा विचार मनाच्या खोल कप्प्यात कुठेतरी दडून राहिला होता. माझ्यासाठी अजून एक महत्वाची गोष्ट ही होती की विपश्यना ध्यान भारतात आणणारे गुरूजी श्री. सत्यनारायण गोएंका यांनी त्यांचे अर्धशिशीचे दुखणे विपश्यनेद्वारे बरे केले होते. आणि मी फक्त अर्धशिशीच नव्हे तर इतर अनेक छोट्या आजार दुखण्यांनी सतत त्रस्त असतो तेंव्हा विपश्यना शिबीर करून काही फायदा झाला तर पहावा असा विचार करत होतो. त्याबद्दल इंटरनेटवर माहितीही मिळवली पण सलग १० दिवस बाह्यजगाशी कुठल्याही संपर्काशिवाय रहायचे म्हटल्यावर त्याचा विचार रहीत केला.
एका सकाळी परत एकदा विपश्यनेचा विचार मनात बळावला आणि ठरवले काही झालं तरी हे शिबीर एकदा तरी करायचंच आणि आताच काही दिवसात करायचं. बरेच शोधल्यावर ठाणे जिल्ह्यतील टिटवाळा येथील धम्म वाहिनी केंद्रामध्ये वेटींगवर जागा उपलब्ध दिसल्या. बऱ्याचश्या निराश अवस्थेत मी तिथे अर्ज केला आणि दुसऱ्याच दिवशी प्रवेश निश्चित झाल्याचा इमेल इनबॉक्समध्ये येउन थडकला. घरी सगळ्यांना सांगितले की मी विपश्यनेला चाललोय तेंव्हा कोणी फारसा विरोध केला नाही पण माझ्याच मनात बरेच किंतु वळवळत होते. माझ्या कन्सल्टन्सीच्या कामामधले काही महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता होती. मी माझ्या मुलाचा वाढदिवस चुकवणार होतो. सर्व शंका बाजूला सारत मी जाण्याचा निर्णय पक्का केला.
विपश्यना शिबीर ही अशी एक जागा आहे जिथे तुम्ही तुमचे मोबाईल फोन १० दिवसांसाठी पूर्ण बंद ठेवता. बाह्य जगाशी काहिही संपर्क ठेवत नाही. १० दिवसांसाठी आर्यमौनाचे पालन केले जाते. आर्यमौन म्हणजे बरोबरच्या ध्यानार्थी साधकांसोबत अजिबात बोलायचे नाही व एवढेच नव्हे तर त्यांच्याबरोबर खाणाखुणा किंवा डोळ्यांद्वारेही संपर्क साधायचा नाही. जो काही संपर्क असतो तो सोबतच्या सहायक शिक्षकांसोबत आणि धम्म सेवक यांच्याबरोबर फक्त गरजेपुरता म्हणजे अनुक्रमे साधनेतील शंका व अडचणी व व्यवस्थेतील अडचणींपुरता मर्यादीत असतो. जेंव्हा मी माझा मोबाईल तिथल्या लोकांकडे सुपूर्द केला तेंव्हा मला सुटका झाल्यासारखे वाटले. आता काही दिवस तरी डेडलाईनसाठी कॉल येणार नव्हते किंवा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक वगैरे सतत दिवसभर पहात राहण्याच्या व्यसनापासून दूर राहणार होतो. हे सूख फार काळ टिकले नाही.
दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता मोठ्या आणि छोट्या घंटानादांनी मला उठवले. हा क्रम पुढचे दहा दिवस चालू राहिला. जितके दिवस मी तिथे होतो तितके दिवस मला गजराच्या घड्याळाची गरज पडली नाही. पहिल्या दिवशी ’आनापान’ साधना शिकवली तेंव्हाच अडचणींची सुरुवात झाली. आनापान म्हणजे श्वास जसा आत येतो आणि बाहेर पडतो त्याच्यावर लक्ष देणे. मला मांडी घालून फार वेळ बसण्याची सवय नव्हती आणि त्यामुळे माझे गुडघे आणि पाठ दुखू लागले. आनापान तीन दिवस चालले. माझ्या दुखण्यात काही फरक नव्हता. मी सहायक शिक्षकांना त्याबाबत विचारले. ते फक्त एवढेच म्हणाले की काही झाले तरी तुमची साधना चालूच ठेवा. दुखणे तसेच चालू राहिले आणि भरीस भर म्हणून अर्धशिशीचा एक अटॅक आला. थोडावेळ शरीरात तो राहीला आणि गेला. एकदा मी असाच न संपणाऱ्या ध्यानसाधनेतुन विश्राम घेतला असताना एका क्षणी माझ्या मनाची द्विधा स्थिती करणारे विचार नाहीसे झाले आणि भविष्याच्या वाटांवरचा धुसरपणा बराच कमी झाला.
आनापान नंतर दोन दिवस नाकाच्या भागात होणाऱ्या संवेदनांची जाणीव घेत रहायला सांगण्यात आले. त्यानंतर विपश्यनेला सुरूवात झाली. विपश्यना म्हणजे पूर्ण शरीरात होत राहाणाऱ्या संवेदनांची जाणीव घेत राहणे. मला जरी संवेदनांची जाणीव होत असली तरी तिथे लक्ष केंद्रीत करणे माझ्या गुडघ्यांच्या दुखण्यामुळे अशक्य होत होते. मी सहायक शिक्षकांना त्याबाबत परत विचारले. त्यांनी सांगितले की हा एक आपल्यावर झालेल्या संस्कारांचा भाग आहे.  आतापर्यंत दबलेले हे संस्कार ध्यानामुळे संस्कार वर येत जातात. त्यामुळे आपली साधना न सोडता आपले काम करत राहणे महत्वाचे आहे. सहाव्या दिवशी एका निवांत क्षणी माझे गुडघ्याचे दुखणे बऱ्याच अंशी कमी झाले. हा चमत्कार आहे असे वाटणे साहजिकच आहे पण विपश्यनेच्या शास्त्रानुसार ते तसे नव्हते. ध्यानधारणेमध्ये संस्कार जेंव्हा बाहेर पडत असतात तेंव्हा शारिरीक किंवा मानसिक पीडेच्या स्वरूपात बाहेर पडतात. त्यांचा निचरा होत असताना जर नवीन संस्कार तयार झाले नाहीत म्हणजेच ह्या पीडेच्या संवेदनेशी आपण जोडून घेतले नाही तर आपण अधिक मुक्त होतो. त्या क्षणी माझ्यासाठीच इतकेच महत्वाचे होते की माझी वेदना कमी झाली होती.
आणि त्यानंतर अल्पसंतुष्टता आणि कंटाळा यांनी माझा ताबा घेतला. मी ध्यान गृहात ध्यान न करता माझे मांडी घातलेले पाय बदलत आणि वज्रासनासारखी आसने करत बसून राहीलो. डोळे उघडे ठेवत इतरांकडे बघत बसू लागलो. हे सगळे लक्षात आल्यामुळे असेल कदाचित मला सहायक शिक्षकांनी बोलावून घेतले. त्यांच्या हळूवार आवाजात त्यांनी मला समजावून सांगितले की आपले जुने संस्कार कसे आपली ध्यानामधली प्रगती रोखू शकतात. त्यातून आपल्या स्वप्रयत्नांनीच बाहेर पडावे लागते.
शिबीर संपले आणि माझी पुढे काही प्रगतीही झाली नाही. कदाचित नियमीत घरी साधना करून आणि एक दहा दिवसांचे शिबीर अजुन एकदा करुन मी अधिक काही करू शकेन. शेवटच्या दिवशी आर्यमौन संपल्यानंतर मी इतरांना त्यांचे अनुभव विचारले. एकाला आत्महत्येच्या विचारांमधून बाहेर पडायला त्याची मदत झाली होती. एकाने सांगितले की अश्लील वेबसाईट बघण्याच्या व्यसनापासून दुर जायला विपश्यना उपयोगी ठरू शकेल. कोणीही असे सांगितले नाही की त्याचा उपयोग झाला नाही. फक्त प्रत्येक व्यक्तीमध्ये त्याचे परीणाम वेगळे झाले होते कदाचित प्रत्येकाच्या संस्कारांप्रमाणे असेल.
आता ज्यांना विपश्यना म्हणजे काय हे माहित नाही त्यांच्यासाठी थोडेसे. विपश्यना हे गौतम बुध्दाने विकसित केलेले ध्यानाचे एक तंत्र आहे. त्याने फक्त स्वतःला ज्ञानप्राप्ती करून घेतली नाही तर अनेकजणांना हे तंत्र शिकवले. विपश्यना आपल्याला खोलवर मुळे पसरलेल्या संस्कारांपासून मुक्त करते आणि दिव्य ज्ञानाकडे मार्गक्रमणा करायला मदत करते. बौध्द धर्मासारखीच भारतातून ही विद्या लूप्त झाली असली तरी ब्रह्मदेशामध्ये ती टिकवून ठेवण्यात आली होती. सत्य नारायण जी गोएंका यांनी ही विद्या भारतामध्ये परत आणुन तिचा जगभरात प्रसार केला. आजमितीला २०० हुन अधिक केंद्रांद्वारे विपश्यनेचा प्रसार केला जात आहे. अधिक माहितीसाठी www.dhamma.org  ही वेबसाईट पहा.

Comments

Popular posts from this blog

A Psycho-financial Experiment

3 Commitments – Part II: Meditation

नित्यनेम २१ दिवसांसाठी