बदललेल्या पार्ल्याच्या निमित्ताने
मी मुंबईकर आहे पण पक्का
नाही. मी मुंबईत वाढलो परंतु माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी हे शहर सोडले आणि तरीही
मुंबईचे माझे आकर्षण आणि प्रेम तसेच आहे. ह्या शहराचा आत्यंतिक अभिमान मला कधी
वाटला नाही तरीही मला येथे परत परत यावेसे वाटते. कदाचित त्याच ओढीने मी हा लेख
लिहितोय.
माझ्या आजोबा उन्हाळ्याच्या
दिवसांमध्ये गावाकडून आंबे, आंबापोळी, फणसपोळी, तळलेले गरे इ वस्तू ते आणत असत.
त्याच्या पार्ल्यातल्या डिलिव्हरीचे काम आम्हा नातवंडांकडे लागलेले असायचे. ते
करता करता पार्ल्याच्या रस्त्यांवरून वाट मिळेल तसे भटकणे हा माझा छंदच झाला. माझे
मित्रही असेच पायी भटकणारे मिळाले असावेत त्यामुळे बहुदा. पार्ल्यात आलो की मी
एकदा तरी भटकून येतोच.
तीस वर्षापुर्वी
रस्त्यावरून चालताना झाडांवरची जांभळे खाता येत होती. दारावर फेरीवाले, दिवाळीला
उटणं विकणारे काका अगदी सहज येत होते. मी ज्या पुर्व पार्ल्यात वाढलो तो बहुतांशी
सुशिक्षित मध्यमवर्गीय मराठी भाग होता. शासकीय नोकऱ्या करत आपल्या
शांतताप्रियतेच्या कोशात जगत राहणारी कुटंबे येथे स्थिरावली होती. आमच्यावर
संस्कार करण्याचे ध्येय असणाऱ्या शाळा आणि व्यायामशाळा होत्या. समाजसेवी संस्था
सेवा हेच व्रत घेउन काम करत होत्या. ह्या सर्वांचा आणि सहनिवासांमध्ये जपल्या
जाणाऱ्या सांस्कृतिकतेचा फार मोठा परिणाम आमच्या पिढीतल्या पार्लेकरांवर झाला आहे.
आता झाडावरची जांभळे खाता
येत नाहीत. वयामुळे नव्हे तर झाडांवर जांभळे जास्त धरत नाहीत म्हणून. आणि खाली
पडलेली जांभळे उचलण्याच्या लायकीचा रस्ता नसतो. रस्त्यावर आता व्यवस्थित चालता येत
नाही कारण वाहनांची गर्दी झाली आहे. दारावर फेरीवाले आता सहज येत नाहीत कारण
सुरक्षितता सांभाळावी लागते. उटणी आता राजकीय पक्षच वाटतात. त्यांच्या नावाने
आंघोळ करावी अशी त्यांची इच्छा असावी बहुतेक. आमच्यावर संस्कार करणाऱ्या शाळा,
संस्था, सहनिवासही बदललेत. कारण पुर्वीचे लोकच राहिले नाहीत. पार्ल्यात वाढलेली
आमची पिढी नव्या संधींच्या शोधात बऱ्याच मोठ्या प्रमाणात बाहेर पडली आहे. त्यांची
जागा नव्याने येणारे बाहेरचे लोक घेत आहेत. स्टेशनरीची आणि किराणा मालाची दुकाने
बंद होऊन त्यांची जागा नवविध खाद्यपदार्थांचे स्टॉल घेत आहेत.
"तुम कुछ भी कर. उसे
दारू पिला. और कुछ दे लेकीन मेरा पैसा मेरे को दिला दे." असे संवाद पार्ल्यात
सहज ऐकू येऊ लागलेत. नव्याने उदयाला येणाऱ्या एका नव्या जडवादी सांस्कृतिकतेचा
पार्ले हिस्सा बनतंय. जडवादाच्या पडद्यामागे नैतिकता झाकोळत जाताना दिसते.
आमच्यावर संस्कार झाले पण हे सर्व बदलण्याची शक्ती आम्हाला मिळाली नसावी कदाचित
त्यातून. पण अशी तक्रार करणेही त्या संस्कारी नैतिकतेच्या बाहेरच नव्हे का.
Comments