हौ ना भौ!
हल्लीच मी अकोला जिल्ह्यातील काही गावात गेलो होतो. कामाच्या पलीकडे झालेल्या अनेक गप्पा बऱ्याच वेळा आपल्या देशाच्या दशेबद्दल बरंच काही सांगून जात असतात. आताच्या लेखातील सगळे प्रसंग मागासवर्गीय जातीच्या लोकांसोबत फिरताना अनुभवले आहेत. त्या वस्तीतील बहुतांश लोक मोलमजूरी करणारे आणि उर्वरीत गावापेक्षा अधिक गरीब असणारे. बचत गटाच्या महिलांसोबत माझा कामाचे विषय झाल्यानंतर एक तरूण मुलगी मला विचारू लागली, “सर, माझी डिग्री पुर्ण झाली आहे. मला ह्या बाकीच्या बायांसारखं शिवणकाम, शेती वगैरे काही करायचं नाही. मला माझ्या लायकीचं काम गावात राहून करता येईल का?” घरच्यांनी तिला आपल्या कोरडवाहू शेतीच्या जोरावर, मोलमजुरीच्या आधारावर शिकवले होते. पोरगी सुक्ष्मजीवशास्त्र घेऊन बीएस्सी झाली होती. मी तिला विदर्भात ग्रामीण भागातील शेती आधारीत असलेल्या मोठ्या अर्थव्यवस्थेत सध्याच्या परिस्थितीत विविध बॅक्टेरियल कल्चर, बायोकंट्रोल चा उद्योग एखाद्या छोट्याश्या गावात अगदी कमी जागेत, शहरापासून दुर ठिकाणीसुद्धा कसं करता येईल ह्याबद्दल सांगितलं. तीला त्या विषयाच्या डिग्रीमुळे हे सगळं आधीच माहित होते. माझं म्हणणं काही पटल...