कथा: खाऊ
जब्या रत्नागिरी बस स्टँडच्या जवळ आला असतानाच त्याचा फोन वाजला. मोटरसायकल चालवताना फोन उचलला तर आता चालणार नाही हे त्याला माहित होते कारण थोडंसंच पुढे ट्रॅफिक हवालदार असणार होते. त्याने बाईक रस्त्याच्या कडेला थांबवली. “बोल मया! अरे भो...... गेले तीन वर्षं तुला शोधतोय! मित्रांची थोडी तरी आठवन ठेव. ठान्याला ग्येलास तो मला वाटला तुला तिथंच उचलून मेंटल मध्ये टाकला” जब्या गडगडला. कित्येक वर्षांनंतर मयाशी संपर्क झाला होता. त्या दोघांना बरंच काही बोलायचं होतं. गेल्या सात आठ वर्षात कोण कुठे होतं, काय करत होतं. लॉकडाऊन आधीचं आयुष्य, नंतरचं आयुष्य, लग्न, मुलं. त्यांच्या गप्पा रंगात येऊ लागल्या होत्या. तितक्यात एक मळकट लुगडं नेसलेली, खांद्याला तशीच मळकट, एक छोटं भोक पडलेली पिशवी लावलेली बाई जब्याच्या जवळ येऊन थांबली आणि तिने त्याला हाक मारली, “बावा!”. जब्याला वाटलं कि कोणीतरी भिकारी असेल. त्याने दुर्लक्ष करत आपल्या मित्राबरोबरच्या गप्पा तश्याच चालू ठेवल्या. “पत्या परत आला तुला माहित हाय काय? त्याने एक नशीब काढलान. हॉटेलची चांगली नोकरी गेली त्याची गोव्यातली पन हितं येऊन टपरी टाकलान. च्याय...