खाद्यसंस्कृती- ज्याची त्याची
मी ह्या विषयावर बराच विचार खऱ्या अर्थाने केला तो घाना ह्या आफ्रीकेच्या पश्चिम भागातील देशात घालवलेल्या एका वर्षात. माझा त्या देशातील तो दुसरा दिवस मी कधीच विसरणार नाही. पहिला दिवस, मी आम्हाला ज्या हॉटेलमध्ये ठेवले होते, तिथे उपलब्ध असलेले नुडल्स, सॅलड सारखे ओळखीचे पदार्थ खाऊन काढला होता. पण त्या पहिल्या आठवड्यानंतर माझी रवानगी त्या देशाच्या एका मागास अंतर्भागात होणार होती आणि मला ओळखीचे असलेले सर्व खाद्यपदार्थ मला नक्कीच आयते उपलब्ध होणार नव्हते. हे सर्व अनोळखी पदार्थ खा किंवा उपाशी रहा असे दोन पर्यायच माझ्यासमोर असणार होते. आजचं मरण किती दिवस उद्यावर ढकलत राहणार असा विचार करत मी माझा मोर्चा स्थानिक आफ्रीकन पदार्थांकडे त्या दिवशी वळवला. "तुला हे हवंय? नक्की हेच हवंय ना?" जेवणाच्या बुफे काऊंटरवरील वाढपी बाईने मला दोनदोनदा विचारत एका मोठ्या वाडग्यामध्ये फुफु नावाचा एक चिकट गोळा टाकला आणि त्यावर मटणयुक्त रस्सा ओतला. आजूबाजूच्या आफ्रीकन लोकांकडे मी पाहीलं. ते लोक त्यांच्या त्यांच्या वाडग्यांमधल्या मोठ्या गोळ्यांचे छोटे छोटे तुकडे काढून त्याचे गोल गोल गोळे करून आणि त्याच्या...